मंगळगड ( कांगोरी किल्ला) माहिती
Mangalgad information in marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतातील कोकण विभागात असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील महाड पासून काही अंतरावर सह्याद्री पर्वतात मंगळगड म्हणजेच किल्ला कांगोरी वसलेला आहे.
उंची :
सरासरी समुद्र सपाटी पासून हा किल्ला ६६४ मीटर उंचीवर आहे.
• सर्वात जवळचे गाव पिंपळवाडी हे आहे.
• चढाई मध्यम स्वरूपाची असून विशेषत पायवाटेने जावे लागते.
• गडावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• पुणे या घाटी शहरापासून भोर तेथून वरंधा घाट मार्गे कोकण पठारावरून जंगल व डोंगरी वाटेने मंगळगडावर जाऊ शकतो.
• महाडकडून भोरला जाताना भिरवाडी पिंपळवाडी फाट्यावरून पिंपळवाडीला जायचे. तेथून थोडा रस्ता आहे. पूढे पायवाट आहे. त्या वाटेने मंगळगडावर जाऊ शकतो. महाड ते पिंपळवाडी बसेस आहेत.
• पोलादपूर येथून – सडेगाव तेथून वडघर गावातून मंगळगडावर जाता येते.
• पोलादपूर मार्गे ढवळे तेथून मंगळगडाला जाता येते.
• पिंपळवाडी मार्गे जाणारा मार्ग अत्यंत सुकर असा आहे.
• मंगळगड किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
महाड व अन्य मार्गे पिंपळवाडी जवळ आल्यावर गाडी पिंपळवाडी पासून थोड्या अंतरावर गेलेल्या रस्त्याला लावून पुढे आपण कच्या रस्त्याने पुढे गेल्यावर थोडे मध्यम झाडीचा व थोडा विरळ प्रदेश लागतो. तेथून पायवाटेने आपण मंगळगडावर जाऊ शकतो.
यामार्गाणे उत्कृष्ट ट्रेकिंगचा म्हणजेच गिर्यारोहणाचा अनुभव घेता येऊ शकतो. या पायवाटेने गडाच्या दिशेने जाण्याचा अनुभव घेत निसर्ग पहात आपण गडाच्या बुरुजाच्या दिशेने जाणे एकदम सुकर आहे.
• चौक्यांचे अवशेष :
टेक चढून वर आल्यावर आपणाला जागोजागी काही ठिकाणी बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. मंगळगड हा एका विशिष्ट भौगोलिक अनुकूल व उपयुक्त ठिकाणी असल्याने याची सुरक्षितता महत्वाची असल्याने या ठिकाणी किल्ल्यापासून काही अंतरावर चौक्या होत्या. गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांची शहानिशा करण्यासाठी व शत्रू चाल करून आल्यास प्रथम येथे सामना करण्यासाठी या उभा केल्या होत्या. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने त्यांचे आता चौथरे शिल्लक आहेत.
• बुरूजाखालील भाग :
चौक्यांचे अवशेष पाहून तेथून थेट आपण गडाच्या बुरुजाखाली येतो. येथून पुढे गडाची मुख्य वाट सुरू होते.
• रण मंडळ वाट :
बुरुजाच्या डाव्या बाजूने एक अरुंद पायवाट गडाच्या दरवाजाकडे जाते. ही अत्यंत बारीक पायवाट आहे. एका बाजूला बुरुज व गड तर दुसऱ्या बाजूला उतार येथून जर शत्रू चाल करून गडाच्या दरवाजाकडे निघाला तर त्यास किल्याच्या वरील बाजूने बुरुजावरुन दगड – गोट्यांचा मारा करता येत असे. या मार्गावरुन थोडं पुढे जाताना निखळलेला पायरी मार्ग लागतो. जोरात पडणारा पाऊस व पाण्याचे लोंढे यामुळे या मार्गाची बरीचशी हाणी झाल्याचे दिसते. पायऱ्या आढळतात. त्याही विस्कळीत आहेत.
• किल्याचा दरवाजा :
विस्कळीत पायरी मार्गाने आपण किल्याच्या दरवाजा पर्यंत येऊन पोहोचतो. हा दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झालेला आपणास पाहायला मिळतो. या दरवाजाचे थोडेफार बांधकाम शिल्लक आहे. पण या अवशेषांवरून हा दरवाजा किती भक्कम होता याची कल्पना येते. हा दरवाजा महादरवाजा होता. व याच्याआतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी ओवऱ्या बांधलेल्या होत्या. त्याला लागूनच दुसरा दरवाजा जवळच होता. त्याचे ही अवशेष पहायला मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने या दरवाजांची एकामागून एक रचना केलेली दिसून येते.
• माची :
दुसऱ्या दरवाजातून वर गेल्यावर आपणास किल्याची माची लागते.
• बुरुज :
माची पासून थोड्याच अंतरावर एक बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजावर जंग्या व फांज्या नाहीत. कारण हा अत्यंत उंच ठिकाणी असल्याने शत्रू माऱ्याच्या टप्यात सहज येऊ शकतो.
• नागदेवता शिल्प :
बुरुज पाहून पूढे चालत गेल्यावर एक लांबट अशी किल्याची रचना आहे. या वाटेने पुढे गेल्यावर आपणास एक छोटीशी नागदेवतेची मुर्ती व इतर मुर्त्या पाहायला मिळतात.
• पाण्याची टाकी:
नगदेवतेच्या मुर्तीपासून थोडे पुढे गेल्यावर आपणास दोन टाकी लागतात. त्यातील एक टाके कोरडे आहे. ज्यामध्ये पाणी साठत नाही. किल्ल्यावरील पाण्याच्या साठ्यावरून किल्यावर उपस्थित शिबंदीची कल्पना येते.
• कांगोरी देवी मंदिर :
थोडे पुढे गेल्यावर आपणास उंच चौथऱ्यावर एक मंदिर पाहायला मिळते. जे दूरावस्थेत आहे. किल्ल्यावरील बऱ्याच ठिकाणी अवकळा आल्याने बऱ्याच मूर्ती या ठिकाणी एकत्र ठेवल्याचे पाहायला मिळतात. या मंदिराच्या पायऱ्या चढून जाताना डाव्या बाजूला सुरेख तुळशी वृंदावन पाहायला मिळते. संपूर्ण दगडात कोरलेले वृंदावन तत्कालीन शिपकलेची आठवण करून देते.
• थोड वर चढून गेल्यावर आपणास मंदिराची छत व्यवस्थित नसलेली वास्तू पाहायला मिळते. बाहेरील बाजूस अनेक मुर्त्या ठेवलेल्या आहेत. आतील जागेवर छत आहे. आतील बाजूला कांगोरी देवीची मूर्ती पाहायला मिळते. या देवीच्या नावाने या मंगळगडाला कांगोरीगड म्हणून देखील ओळखले जाते.
गाभाऱ्यात शिवलिंग व भैरवनाथ देवतेची मूर्ती देखील पाहायला मिळते. पूर्वी येथे नियमित पूजा अर्चा केली जात होती. मंदिरास प्रदक्षिणा घालत पूर्व बाजूला आल्यास मंदिराच्या भिंतीत एक छोटीशी खिडकी आहे. पूर्व दिशेकडे असणाऱ्या या खिडकीतून ठराविक दिवशी देवीवर सूर्य कवडसे उगवताना पडतात.
• बुरुज :
मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक बुरुज पाहायला मिळतो उंचावर असल्याने जंग्या बांधलेल्या नाहीत. कारण ही जागा अती उंच आहे.
• या बुरुजाकडे व पुढील भागात जाताना तटबंदी पाहायला मिळते. थोडीफार या तटबंदीची नासधूस झालेली पाहायला मिळते.
• काही ठिकाणी तटबंदी मध्ये बांधलेले शौचकुप देखील पाहायला मिळतात. जे शिबंदीतील सैनिकांसाठी बांधलेले आढळतात.
• बुरुज :
पुढे एक बुरुज आपणास पाहायला मिळतो. त्यावर ध्वजस्तंभ आहे. तेथे भगवा ध्वज दिमाखात फडफडत आहे.
• पाण्याचे मोठे टाके :
गडाच्या वरील बालेकिल्ल्याकडे चढून जाताना आपणास एक मोठे पाण्याचे टाके लागते. त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या पाहायला मिळतात. आतील पाणी शेवाळलेले आहे.
• चोर दरवाजा :
पुढे आपणास एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. जो आजकाल काळाच्या ओघात नष्ट होत आला आहे. जेथून खाली दरीत उतरता येईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गडावर संकटकाळी चोरवाटेचा उपयोग होत असे.
• बांधकाम केलेली भिंत :
थोडे वर गेल्यावर आपणास दरीच्या टोकाला एक भिंत बांधलेली पाहायला मिळते. जी पाणी साठवणीसाठी बांधली गेली असावी. भिंतीच्या मागील बाजूस भराव पडला आहे. तर दुसरीकडे खोल दरीकडे जाणारी उतरती खाच आहे. येथे पूर्वी पाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले जात असे.
• खोदीव टाके :
• बालेकिल्ल्याच्याकडे जाताना आपणास एक खोदीव टाके लागते त्यामध्ये वरील भागातील पाणी येऊन साचते.
• कुंड टाके :
किल्याच्या पुढील भागात आणखी एक कुंड असणारे टाके पाहायला मिळते. गडाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांची खाण या ठिकाणी जागोजागी उतारावर काढून या टाक्यांची उतारावर पाणी वाटेवर निर्मिती केल्याचे दिसते.
• बांधलेल्या इमारतींचे व वाड्यांचे अवशेष :
बालेकिल्ल्याच्या परिसरात भग्न जोत्यांचे व वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात या ठिकाणी एके जागी शिवलिंग देखील पाहायला मिळते. बहुदा येथे एक शिवमंदिर असावे. काळाच्या ओघात ते नष्ट झाले आहे.
• किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष :
या अवशेषांवरून किलेदार व शिबंदीतील मावळ्यांसाठी बांधलेल्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही भागात फरसबंदी केलेली दिसून येते.
• कोठार वास्तू अवशेष :
पुढे काही अंतरावर एका मोठ्या खोलीचे अवशेष पहायला मिळते. ते एखाद्या कोठराचे असावेत असे म्हंटले आहे. ज्या ठिकाणी धान्य किंवा दारूगोळा ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा.
• बुरुज :
समोर एक बुरुज पाहायला मिळतो. त्याठिकाणी एक ध्वजस्तंभ आहे. ज्याठिकाणी उभे राहिल्यावर आपणास रायगड, दूर राजगड, तोरणा किल्याची बुधला माची, लिंगाणा किल्ला, पलीकडे डोंगराच्या मोहनगड, व दूरवर जावळीचे विस्तिर्ण खोरे पाहायला मिळते.
तसेच या किल्ल्यावरून प्रतापगड देखील पाहायला मिळतो.
• हा किल्ला अत्यंत मोक्याच्या जागी आहे. ज्यावरून स्वराज्याच्या बऱ्याच भागावर लक्ष ठेवता येत असे. तसेच साखळी किल्यातील एक महत्वाचा किल्ला मंगळगड आहे.
• खांब टाके :
किल्याच्या पुढील भागात एक खांबटाके पाहायला मिळते. ज्यातील खांब तुटलेला आहे. हे खोल असून सूर्यकिरण येथे पोहोचत नाहीत. त्यामुळे शेवाळ निर्मिती येथे होत नाही. व पाणी पिण्यायोग्य राहते.
या टाक्यास कुलूप योजना आहे. त्यामुळे त्यातील पाणी काढून टाकता व स्वच्छ धुवून काढता येते.व पुन्हा साठवण करता येते.
• अशी अनेक टाकी या किल्यावर पाहायला मिळतात.
• काळाच्या ओघात या वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने अवकळा आल्याचे दिसून येते. या किल्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
• मंगळगड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• मंगळगड अत्यंत मोक्याच्या जागी असल्याने त्यावरून रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, मोहनगड, लिंगाणा मधूमकरंदगड, जावळीचे खोरे पाहायला मिळते.
• घाटावरील भोर भागातून कोकणात वरंधाघाट मार्गे महाडला उतरत असताना या किल्याजवळून अस्वलखिंडीमार्गे जावे लागत असे. या मार्गावर टेहाळणी करण्याचे काम मंगळगडाद्वारे केले जात असे. हा मार्ग पुढे सावित्री नदीच्या खाडी प्रदेशात जातो. तेथून परदेशी व्यापार चालत असे.
• मंगळगड हा जावळी खोऱ्यातील एक किल्ला आहे.
• मंगळगडाचे बांधकाम जावळीवर राज्य करणाऱ्या मोरे घराण्याच्या कालखंडात झाले असे मानले जाते.
• छत्रपती शिवराय यांनी १६४५-४६ साली मोर्यांची जावळी जिंकून स्वराज्यात आणली. तेव्हा कांगोरीगड स्वराज्यात दाखल झाला.
• कांगोरी देवीच्या नावावरून या गडाला कांगोरीगड असे म्हंटले जात असे.
• छत्रपती शिवराय यांनी या किल्याचे नाव मंगळगड ठेवले.
• या गडावर गोळे – गायकवाड या सरदारांची नेमणूक होती. त्यांनी या किल्याचे बराचकाळ शत्रू पासून रक्षण केले.
• इसवी सन १६७८ ते १७०३ या काळात या गडाचा वापर स्वराज्याच्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी केला गेला.
• संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर मुघलांचा रायगडला वेढा पडला. त्यावेळी राजाराम महाराज वेढ्यातून निसटून वाघ दरवाजा मार्गे मंगलगडावर प्रथम आले. व येथून पूढे प्रतापगडाला गेले. तिथे पुन्हा शत्रूशी झुंज देवून पन्हाळगडाला गेले. व पुढे तामिळनाडू राज्यातील स्वराज्याच्या तिसऱ्या राजधानी जिंजीला गेले. मंगळगड हा स्वराज्यातील साखळी किल्ल्यातील एक पायरी आहे.
• स्वराज्याचा खजिना मुघलांच्या हाती सापडू नये म्हणून प्रथम वाघ दरवाजा मार्गे मंगळगडावर आणला व पुढे पन्हाळगडावर नेला गेला.
• इसवी सन १८१७ साली बापू गोखले या मराठा सेनापतीने इंग्रजांचे मद्रास रेजिमेंट कर्नल हंटर व मॉरिसन या अधिकाऱ्यास अटक करून येथे मंगळगडावर ठेवले होते.
• इसवी सनाच्या १८१८ साली मराठा साम्राज्य नष्ट झाल्यावर मंगळगड स्वारीवर आलेल्या ब्रिटिश कर्नल पॉथर याने हा किल्ला जिंकून ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात घेतला.
• भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे हा किल्ला आहे.
• अशी आहे मंगळगड किल्ल्याची माहिती. • Mangalgad Fort information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l