कुलाबा किल्ला माहितीKulaba Fort information in marathi
कुलाबा किल्ला माहिती Kulaba Fort information in marathi

मध्ययुगीन काळातील मराठी आरमारात मोक्याच्या स्थानी असणारी व अरबी समुद्राला लागून असणाऱ्या उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर आपले वर्चस्व गाजवणारी शिवकालीन आरमाराची शान म्हणून मान्यता पावलेली भूमी म्हणजे कुलाबा किल्ला होय.
स्थान :
भारत देशातील पश्चिमेस असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या समुद्रकिनारी असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलीबाग शहरापासून जवळील समुद्रात कुलाबा किल्ला आहे.
• रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागातील या समुद्र किनारी प्रदेशास अष्टागर या नावाने ओळखले जाते. हा किनारा जवळ जवळ ३० ते ३५ किलोमिटर एरियात पसरलेला आहे.
‘ अष्टागरचा राजा म्हणजे कुलाबा किल्ला होय.’
अलिबागचा पाणकोट म्हणजे कुलाबा किल्ला होय.
उंची : कुलाबा किल्ला हा जलदुर्ग असल्याने समुद्र सपाटी पासून त्याच्या तटबंदीची उंची ही १०० फूट आहे.
कुलाबा किल्ला पाहण्यासाठी जाण्याचा मार्ग :
• कुलाबा जलदुर्ग पाहण्यास जाण्यासाठी रस्ते मार्ग :
• महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबई येथून ९५ किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे अलिबाग शहर आहे. येथून समुद्रात दोन किलोमीटर अंतरावर कुलाबा किल्ल्यास बोटीने किंवा ओहोटी काळात पायी जाता येते.
• अलिबागला जाण्यासाठी पुणे, मुंबई, तसेच रत्नागिरी, कोल्हापूर येथून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत.
• गोवा मुंबई हाइवेवरून पुढे अलिबाग व तेथून कुलाबा किल्यावर जाता येते.
• समुद्र मार्गे :
मुंबई बंदरातून गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून स्पीड बोटीने किंवा फेरी चार्टर द्वारे समुद्रमार्गे अलिबाग तसेच कुलाबा किल्ल्याला जाता येते. गोवा येथून देखील समुद्र मार्गे कुलाबा किल्यावर व जवळील अलिबागच्या बंदरावर जाता येते.
• मुंबई हे विमानतळ येथून जवळील विमानतळ असून तेथून रस्ते किंवा जलमार्गाद्वारे कुलाबा किल्ल्याच्या जवळील अलिबागला जाता येते.
• कुलाबा किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• अलिबाग किनाऱ्यापासून दीड किलोमिटर अंतरावर कुलाबा किल्ला एका खडकावर भुखंडमंचावर बांधला गेल्याचे दिसून येते. या ठिकाणी पाहायला जाताना समुद्राची भरती ओहोटीची वेळ पाहून आपण जायला हवे.
• समुद्रास जेव्हा भरती येते तेव्हा नावेन जावे लागते. मात्र ओहोटी असताना पायी देखील जाता येते.
• पडकोट :
कुलाबा किल्यावर येताना प्रथम आपणास पडकोट लागतो. हल्ली या पडकोटाची बरीच नासधूस झालेली दिसते. पडकोटामुळे किल्याच्या आतील भागावर शत्रूस वेगाने जहाजावरील तोफेच्या गोळ्यांचा मारा करता येत नाही. व जलदुर्गाचा बालेकिल्ला सुरक्षित राहतो.
• महाद्वार :
पडकोटास लागूनच आतील बाजूस वळलेल्या धक्यावर उतरून जाताना प्रथम आपणास एक दोन बुरुजांच्या मध्ये असलेला भक्कम असा दरवाजा पाहायला मिळतो. या द्वारावर गणेश देवता, कमळ पुष्प, हत्ती व शरभ शिल्पे पाहायला मिळतात. भक्कम असा हा दरवाजा असून आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधलेल्या आहेत.
• दुसरा आतील दरवाजा:
मुख्य महाद्वारातून आत गेल्यावर आपणास एक उभी चौकट असणारा एक भग्न दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाचा वरील भाग पडलेला असून, प्रथम महाद्वार ओलांडल्यावर लागणारा हा दरवाजा किल्याच्या सुरक्षेसाठी बनवला गेल्याचे दिसते. एखादेवेळी शत्रूने प्रथम दरवाजावर नियंत्रण मिळवले तरी हा दरवाजा आतील बालेकिल्ल्याची सुरक्षा करु शकेल अशी रचना या दरवाजाची आहे.
• भवानीदेवी मंदिर :
दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर डावीकडील वाट ही भवानी देवी मंदिराकडे जाते. अत्यंत साध्या पद्धतीने हे मंदिर असून आतील बाजूस भवानी देवीची सुरेख मूर्ती पाहायला मिळते.भवानिदेवी ही कोळ्यांची तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकांची कुलदेवता असल्याने येथे मंगळवारी व शुक्रवारी लोकांची गर्दी असते.सुरेख भवानी देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती व तिच्या बाजूला वेताळाची मूर्ती पाहायला मिळते.
- ध्वज बुरुज व नगारखाना :
भवानी देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर तटावर जाणारा पायरी मार्ग लागतो. त्यावरून वर गेल्यावर आपणास मुख्य दरवाजाच्या वर तसेच शेजारील बुरुजावर जाता येते. तसेच दुसऱ्या बाजूने पुढे गेल्यावर आपणास एक ध्वजस्तंभ लागतो. तसेच नगारखाना लागतो. नगारखाण्यात पूर्वी शिवकाळात वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी धून वाजवली जात असे. मंगलप्रसंगी वेगळी, धोक्याच्या वेळी वेगळी, राजे आल्यावर निराळी धून वाजवली जात असे.
• महाद्वार असणाऱ्या तटावरील बाजूने फिरत जाताना आपल्याला अलिबाग कडील सागराचे व किनाऱ्याचे मनमोहक असे दर्शन घडते. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते.
• तटबंदी :
इतर किल्ल्याप्रमाणे या किल्याची बांधणी नसून येथे आपणास एक वेगळे वैशिष्ट्य पाहायला मिळते. येथील बांधकाम हे बेसाल्ट खडकात केलेले असून ते एकमेकांत चुन्याने न जोडता. फक्त विशाल खडक एकमेकावर ठेवून रचना केल्याचे दिसते. यामुळे तटबंदीवर समुद्री लाटांची धडक बसल्यावर दगडातील फटीत पाणी जाऊन लाट दुभंगते. व त्यामुळे लाटेची ताकद कमी होऊन तटबंदीचे नुकसान होत नाही. तसेच तटबंदी वरून आतील बाजूने रुंद मार्ग तटावर बनवला गेला आहे. त्यावरून चालत जाता येते. तसेच तटावर चढून जाण्यासाठी जागोजागी पायरीमार्ग देखील बांधला होता. हे देखील पाहायला मिळते.
• बुरुज :
जागोजागी आपणास विशाल अशा दगडांची रचना करून नालाकृती बुरुज जागोजागी केल्याचे पाहायला मिळतात. असे एकूण १७ बुरुज आपणास पाहायला मिळतात. या बुरुजांमध्ये जागोजागी तोफा ठेवण्यासाठी फांज्या व गोळीबार करण्यासाठी जंग्या दिसून येतात. त्याचप्रमाणे शिवकालीन व त्यानंतरचा काळातील तोफा पाहायला मिळतात. काही जंग्यामध्ये ठेवलेल्या दिसतात. बुरुज तसेच तटबंदी मध्ये दगडात खोबण्या केल्याचे दिसतात. ज्यामध्ये दिवे लावले जात. समुद्री वाऱ्याने ते विझू नये म्हणूनच या खोबण्या तयार केल्या होत्या.
कुलाबा किल्ला माहिती Kulaba Fort information in marathi
• ब्रिटिश कालीन तोफा :
तटबंदीवरून पुढे चालत गेल्यावर अलिबागकडील बाजूच्या तटबंदी शेजारी आपणास चौकोणी पिंजऱ्यात ठेवलेल्या दोन ब्रिटिशकालीन गाड्यावर ठेवलेल्या तोफा पाहायला मिळतात. त्या घडीव पोलादात बनवलेल्या असून आजही सुस्थितीत आहेत. त्या बनवणाऱ्या कंपनीची माहिती, तसेच त्यांचे वजन व मारक क्षमता देखील त्यावरील ब्रिटिश शिलालेख व तोफेवरील इंग्रजी शब्दावरून मिळतो.
‘ डॉसन हार्डी फिल्ड, लो मुर आयर्न वर्क्स, यॉर्कशायर इंग्लंड' अशा प्रकारचा मजकूर आढळून येतो. लोखंडी चक्रावर योग्य जॉइंट असणारी प्रमाण बद्ध अशी बांधणी या तोफांची दिसून येते.
• कान्होजीची घुमटी :
किल्ल्यावरून फिरत जेव्हा आपण दर्या दरवाजाकडे जातो. तेव्हा तिथे अर्ध कमान असणारी देवळी सारखी रचना पाहायला मिळते. संपूर्ण दगडात चूना भरून जोड देवून बांधलेली ही जागा पहारेकरी तसेच शिबंदीतील मावळ्यांना विसावा अथवा भोजन करण्यासाठी बांधली गेली असावी. याच्या वरील थरातील दगड कोरून बसवलेले जाणवतात.
• दर्या दरवाजा / यशवंत दरवाजा :
कान्होजीच्या घुमटी पासून पुढे जवळच एक अरबी समुद्राकडे लागूनच एक दरवाजा पाहायला मिळतो. त्यास दर्या दरवाजा किंवा यशवंत दरवाजा या नावाने ओळखले जाते.
या दरवाजा वर सुरेख शिल्पाकृती केलेली पाहायला मिळते.सुरेख फुलांची नक्षी. विघ्नहर्ता गणेश देवता, संकट मोचन हनुमान देवता, कमळ पुष्प, व दर्यातील विशाल अशा मगरीचे शिल्प पाहायला मिळते. या दरवाजा जवळील तटबंदी देखील चूना न वापरता हेमाडपंथी बांधणी रचना असणारी एकमेकावर विशाल शिला ठेवून केलेली दिसते.
• पुष्करणी तलाव :
किल्यावर गणपती मंदिरा शेजारी आपणास एक पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. या किल्ल्यावरील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा साठा म्हणून या पुष्करणी तलावास ओळखले जाते.
• सिद्धिविनायक मंदिर :
पुष्करणी तलावाच्या जवळच आपणास एक सुरेख दीपमाळ व गणपतीचे मंदिर पाहायला मिळते. सभामंडप व गाभारा अशी दालने असणारे मंदिर यावरील कळस अत्यंत सुरेख आहे. आतील गाभारा चौकटीवरील नक्षी अत्यंत सुरेख असून त्यातून प्राचीन कलाकुसर दिसून येते. सिद्धिविनायक मंदिरात गाभाऱ्यात संगमरवरी सिद्धिविनायकाची मूर्ती तिच्या शेजारी विष्णू, शंकर, देवी, सूर्य अशा देवतांच्या मूर्ती म्हणजेच पंचायतन पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुरेख अशी दीपमाळ कोरीव दगडात तयार केलेली पाहायला मिळते.
• मंदिर आवारात छान तुळशी वृंदावन पाहायला मिळते.
• शिवमंदिर :
सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी एक शिव मंदिर आहे. बाहेरील बाजूस नंदी असून आतील बाजूस तांब्याच्या पत्र्याने मढवलेली शिव पिंडी आहे. त्यावर नाग ही आहे.
• हनुमंत मंदिर :
सिद्धिविनायक मंदिरा शेजारी दुसऱ्या बाजूस आपणास हनुमंत मंदिर पाहायला मिळते. हनुमंताची सुरेख शेंदरी रंगात रंगवलेली मूर्ती आपणास पाहायला मिळते.
• मंदिराच्या बाहेर आपणास सुरेख दगडी होम पाहायला मिळतो.
• उध्वस्त वाड्याचे अवशेष :
सिद्धिविनायक मंदिरा पासून थोड्या अंतरावर आपणास पडक्या भग्न वाड्यांचे व वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. ते कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याचे तसेच अन्य सरदारांच्या वाड्यांचे अवशेष असून तेथे दगडी बांधकाम सुरेख नक्षीकाम तसेच अनेक खोल्या पाहायला मिळतात. इंग्रजी सत्तेच्या ताब्यात आल्यावर या वास्तूंची मोडतोड झाल्याचे जाणवते.
- अंधारबाव :
कुलाबा किल्यावर दगडी चिरेबंदी बांधकाम असणारी एक विहीर पाहायला मिळते. त्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. आजही लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज ती भागवते.
• जहाज बांधणीची गोदी :
या किल्याच्या दर्या दरवाजा जवळ जहाज बांधणीची गोदी होती. या ठिकाणी तटाची रचना वक्राकार असून किल्याच्या आतील बाजूस काटकोन स्वरूपात बांधकाम दिसते. येथे आतील बाजूस जहाज येऊ शकेल इतके पाणी तटबंदी जवळ समुद्राच्या भरतीवेळी असते. ही एक कृत्रिम रचना जाणवते. या ठिकाणी जहाज बांधणी होत असे.
• पद्मावती मंदिर :
गडफेरी पूर्ण करून परतताना भग्न वाड्यापासून पुढे चालत आल्यावर आपणास बाहेर पडण्यापूर्वी दोन छोटीशी मंदिरे लागतात त्यातील एक पद्मावती मंदिर आहे.
तसेच आणखी एक देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते.पद्मावती देवी शेजारी असणारी गोळावती देवीचे मंदिर काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. तिची काळया पाषाणात असणारी मूर्ती सुरेख आहे. यामध्ये देवीच्या पायात महिष असून हाती त्रिशूळ धारण तिने केले आहे. ती एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेली दिसते. या देवीची स्थापना इसवी सन १६९८साली कान्होजी आंग्रे यांनी केली.
सर्जेकोट :
कुलाबा किल्यापासून एक बांधीव वाट एका शेजारील सर्जेकोटाकडे घेऊन जाते. हा सर्जेकोट कुलाबा किल्याच्या संरक्षणासाठी बांधला गेला असल्याचे जाणवते. याच्या मुख्य दरवाजाची पडझड जरी झाली असली तरी तटबंदी व्यवस्थित आहे. याच्या आतील बाजूस एक विहीर देखील आहे. जिचे पाणी पिण्यायोग्य आहे.
• कुलाबा किल्याबाबत ऐतिहासिकदृष्ट्या माहिती :
• कुलाबा किल्याच्या बांधणीपूर्वी या ठिकाणी एक बेट होते. व तेथे एक तपासणी चौकी होती.
• समुद्री व्यापारी जहाजांवर नजर ठेवण्यासाठी तसेच सिद्दी, इंग्रज. पोर्तुगीज या सागरी शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी हे ठाणे उपयुक्त हे छत्रपती शिवराय यांनी ओळखले व इसवी सन २९ मार्च १६८० साली त्यांनी कुलाबा किल्याच्या बांधकामासाठी परवानगी दिली.
• इसवी सन १६८० साली छत्र पती शिवरायांच्या मृत्यूनंतर या किल्याचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांनी इसवी सन १६८२ साली पूर्ण करून घेतले.
• कुलाबा किल्ला हे सागरी व्यापारी मार्गावरील ठाणे असल्याने सिद्दी, व इंग्रज व पोर्तुगीज यांवर वचक ठेवण्याचे काम होत होते.
• इसवी सन १७०० साली कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटिश जहाजांची नाकेबंदी करून ब्रिटिश व पोर्तुगीज यांना व्यापार करण्यासाठी तसेच इतर व्यापाऱ्यांसाठी मराठी आरमाराची परवानगी असणारा दस्त जारी करून घेतला.
• इसवी सन १६९५ साली मराठी आरमाराचे मुख्य केंद्र कुलाबा येथे कान्होजी आंग्रे यांनी हलवले.
• इसवी सन १६९८ साली जंजिऱ्याच्या सिद्दीने कुलाबा किल्यावर हल्ला केला. तो हल्ला मराठ्यांनी परतवून सिद्दीच्या थळ या ठिकाणी हल्ला करून त्याला हरवले.
• इसवी सन १७१३ साली जॉन क्यास्टो याने वसई येथून येऊन कुलाब्यावर हल्ला केला. तेव्हा खाडीच्या उथळ भागात आरमार हलवून कान्होजी हल्ला निष्प्रभ केला.
• इसवी सन १७१३ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी मराठा अंतर्गत कलह टाळण्यासाठी कान्होजी आंग्रे यांकडे कुलाबा व इतर मराठी आरमारी किल्याची जबाबदारी कान्होजी आंग्रे यांकडे करारानुसार दिली.
• कान्होजी आंग्रे यांनी सरदार दर्या सारंग व मायनाक भंडारी यांकडे कुलाबा किल्याचा कारभार सोपवला.
• कुलाबा किल्यावरून मराठी दस्त न मानणाऱ्या ब्रिटिश जहाजावर हल्ले करून लूट मिळवण्यासाठी केला जाऊ लागला.
• इसवी सन १७ नोव्हेंबर १७२२ साली ब्रिटिशांनी पोर्तुगीज फिरंग्याच्या मदतीने मराठी आरमाराची उत्तर राजधानी कुलाबा किल्यावर हल्ला केला. यामध्ये ब्रिटिश व पोर्तुगीज आरमाराचे ६००० सैन्य सहभागी झाले होते. ब्रिटिश १० जहाजे कुलाबा किल्याच्या परिसरात खडी करून आव्हान उभा केले. व १००० पायदळ ओहोटीच्या फायदा घेत किल्यावर चाल करून ब्रिटिशांनी पाठवले. यावेळी कान्होजी आंग्रे यांनी पेशवे थोरले बाजीराव यांकडे मदत मागितली. पेशव्यांनी २५००० फौज कुमक पाठवली.
• पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या घोडदळाने चपळाईने हल्ला करून ब्रिटिश सैन्य कापून काढले. व मराठी फौज चालून येताच पोर्तुगीजांनी माघार घेतली. व मराठ्यांचा विजय झाला.
• ४ जुलै १७२९ साली कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यनंतर गृहकलह निर्माण झाला. त्यांना सीखोजी, मानाजी, तुळाजी, संभाजी अशी चार मुले होती.
• १७२९ ते ३३ पर्यंत सिखोजी आंग्रे सरखेल झाले. ते निपुत्रिक होते.
• इसवी सन१७३३ साली तुळाजी आंग्रे सरखेल झाले. पण मनाजीकडे कुलाबा व परिसरातील प्रदेश सोपवला गेला.
• इसवी सन १७५६ साली तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यातील विजयदुर्ग येथील मराठी आरमार ब्रिटिश नौदल व पेशव्यांनी नष्ट केले. व त्यामुळे फक्त मानाजीच्या देखरेखीत असणारे मराठा कुलाबा आरमार तेवढे शिल्लक राहिले.
• इसवी सन १७५९ ते इसवी सन १७९३ काळ मानाजी पुत्र राघोजी सरखेल होते. त्याने आपल्या कारकीर्दीत पद्मदुर्ग व उंदेरी किल्ला पुन्हा जिंकून घेतला.
• इसवी सन १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले.
• इसवी सन१७८७ साली लागलेल्या आगीत आंग्रे वाडा जळला होता.
• बऱ्याच वेळा कुलाबा किल्यावर आग लागल्याने येथील इमारती जळाल्या होत्या.
• इसवी सन १७९३ ते इसवी सन १७९६ पुन्हा सत्तेसाठी गृहकलह आंग्रे कुटुंबात झाला.
• इसवी सन १७९६ साली दुसरा मानाजी सरखेल पदाच्या गादीवर आला.
• इसवी सन १८१८ नंतर मराठी साम्राज्य लयास गेल्यावर ब्रिटिश नियंत्रणात आंग्रे सत्ता आली. ब्रिटिशांनी पुढे दत्तकपुत्र नामंजूर करून आंग्रे यांची सत्ता नष्ट केली.
• इसवी सन १८४२ साली आंग्रे वाड्यातील लाकूड सामान काढून ब्रिटिशांनी त्याचा वापर आलिबाग नगरपालिका इमारतीसाठी वापरले. तर काही लिलावात काढले.
• सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.
![]() |
कुलाबा किल्ला माहिती Kulaba Fort information in marathi |
ही आहे कुलाबा किल्ल्याची माहिती
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l