पन्हाळा किल्ला :
Panhala Fort information in marathi
![]() |
पन्हाळा किल्ला संपूर्ण माहिती panhala Fort information in marathi |
पन्हाळगड स्थान :
महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहराच्या उत्तर बाजूस साधारण २० कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वतात हा किल्ला स्थित आहे. याच्या उत्तरेला वारणा नदीचे खोरे, पश्चिमेस कासारी नदी खोरे. व सह्याद्री पर्वत, तर दक्षिणेस भोगावती,तुळशी, कुंभी, कासारी, व गुप्त सरस्वती संगम होऊन निर्माण झालेली पंचगंगा नदी आहे.व नदी पलीकडे कोल्हापूर शहर आहे. तर पूर्वेस वाडी रत्नागिरी डोंगरात ज्योतिबा हे हिंदूंचे प्रसिद्ध दैवत आहे.
उंची :
या किल्ल्याची सरासरी उंची ही समुद्र सपाटी पासून ९७७.२मी. /४०४०फूट आहे.
तर जमिनीवरील पायथ्यापासून उंची ही साधारण ४०० मीटर आहे.
पन्हाळगडाची इतर नावे :
ब्रह्मगिरी, पन्नंगालय, शहानबीदुर्ग, पननालगड, पनाला, पन्हाळा, पूनाला.
पन्हाळगड तटबंदी :
अत्यंत भक्कम अशी दुहेरी तटबंदी असणारा किल्ला म्हणजे पन्हाळगड होय. तसेच ८२ मैलाचा घेर असणारा हा किल्ला. जांब्या व काळया अशा दगडात असणारी १५ ते ३६ फूट उंच तसेच तटाची रुंदी ही ५ फुटापर्यंत नागमोडी आकाराची जागोजागी बुरुज असणारी अशी तटबंदी आहे.
पन्हाळा किल्ला : Panhala Fort information in marathi
पन्हाळगडावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• कोल्हापूर या ठिकाणी रेल्वेने , बसने, आल्यावर तेथून पन्हाळगडाल जाता येते. कोल्हापूर ते पन्हाळा हे अंतर २० किलोमीटर आहे. जवळील हवाई मार्ग उजळाईवाडी विमानतळावरील तेथून कोल्हापूर व पुढे पन्हाळा असे जाता येते.
• पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर आहे.
पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी योग्य ठिकाणे :
बाजीप्रभू देशपांडे पुतळा :
बस थांब्या पासून थोड खाली आल्यावर एक चौक लागतो. त्या ठिकाणी भव्य असा बाजीप्रभू देशपांडे यांचा लढावू वृत्तीत तलवारी दोन्ही हातात घेतलेला पुतळा पाहायला मिळतो. पन्हाळ्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवराय यांना बाहेर काढण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे व बांदल सैन्याने लढाई केली व शत्रूला घोडखिंडीत रोखून ठेवले. तेव्हा बाजीप्रभू व काही बांदल धारातीर्थी पडले. त्या घटनेचे स्मरण हा पुतळा पाहताना होतो.
• पन्हाळगड तीन दरवाजा :
बाजीप्रभूच्या पुतळ्यापासून पुढे चालत गेल्यावर आपल्याला पश्चिमेस तीन दरवाजा लागतो. सुंदर व चांगल्या स्थितीत असणारा हा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत भक्कम अशी बांधणी असलेला हा दरवाजा एकामागून एक असे शत्रूला थोपवून धरण्याचे व गड रक्षण्याचे काम या दरवाजाने केले.
पन्हाळ्याला वेढा दिल्यावर सिद्धीजोहरने या दरवाजावर तोफांचा मारा केला होता.
तीन दरवाजा विहीर:
तीन दरवाजाच्या आतील बाजूस एक विहीर आहे. तिचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. वर्षातील बाराही महिने तिला पाणी असते.
हनुमान मंदिर :
तीन दरवाजा समोरच एक हनुमंताचे छोटेखानी मंदिर पाहायला मिळते. हनुमान ही बलोपासनेची देवता. तिची उपासना मावळे करत.
अंधार बाव :
पन्हाळगडावर असणारी तीन मजली बांधकाम केलेली व तळाच्या मजल्यात बंदिस्त विहीर असलेली वास्तू म्हणजे अंधार बाव होय. काळया दगडात बांधलेली तीन कमानाकृती रचना इथे पाहायला मिळते.
पहिल्या मजल्यावर पहारेकरी राहत असतं. दुसऱ्या मजल्यावर चोर वाट असणारा खिडकी दरवाजा आहे. यातून गडाखाली जाता येते.
तिसऱ्या तळाकडील मजल्यावर विहीर आहे. अशी रचना अंधार बावेची आढळते.
अंबारखाना :
बालेकिल्ल्याच्या आतील भाग तिथून एक मोठी धान्याच्या कोठीची वास्तू म्हणजे अंबरखाना. या ठिकाणी तीन धान्य कोठ्या आहेत. यामध्ये शिवकाळात वरी, नागली, भात या प्रकारचे धान्य साठवले जात असे. त्यांची नावे गंगा, यमुना अन् सरस्वती अशी आहेत. या मध्ये एकूण २५ खंडी धान्य साठवले जात असे.
तसेच इथे सरकारी कचेरी, दारूगोळा कोठार व नाणी करण्याची टाकसाळ देखील या ठिकाणी होती.
अंबाबाई ( महालक्ष्मी) मंदिर :
राजवाड्याबाहेरील नेहरू उद्यानापासून पुढे हे मंदिर आहे. पन्हाळगडावरील अती प्राचीन वास्तू मध्ये हे मंदिर गणले जाते. जवळ जवळ १००० वर्ष जुने असे हे मंदिर आहे. शालिवाहन राजा गंडारीत्य भोज याने ते बांधले असून ते त्यांचे कुलदैवत आहे.
पराशर गुहा :
प्राचीन काळी महान ऋषी पराशर इथे राहत होते. तत्कालीन जवळजवळ २२ गुहा या परिसरात पाहायला मिळतात. तत्कालीन काळाची आठवण या गुहा आहेत. इथे एक शिवमंदिर देखील पाहायला मिळते.
• छत्रपती शिवाजी मंदिर :
छत्रपती शिवराय यांची संगमरवरी मूर्ती असणारे मंदिर देखील इथे आपणास पाहायला मिळते. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज यांनी बांधले.
महाराणी ताराबाई यांचा वाडा :
महाराणी ताराबाई यांचा वाडा अत्यंत भव्य असा इथे पहायला मिळतो. या ठिकाणाहून त्यांनी सर्व मराठा राज्याचा कारभार पहिला. इथलं देवघर पाहण्यासारखे आहे. हल्ली या वास्तूमध्ये नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल, व मिलिटरी बॉईज हॉस्टेल आहे.
सज्जाकोटी :
राजवाड्यापासून पुढे एक कोठी असणारी इमारत आहे. ती आहे सज्जाकोठी. दोन मजली ही इमारत चुना व दगडात बांधलेले आजही सुस्थितीत आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा या विभागाचा कारभार पहाणेसाठी या ठिकाणी संभाजीराजांना ठेवले होते. या ठिकाणी गुप्तचर्चा देखील होत असतं. याच गडावर वास्तव्यास असताना संभाजी महाराजांवर विष प्रयोग करण्यात आला होता पण ते सुदैवाने बचावले.
ही वास्तू इसवी सनाच्या १५ व्या शतकात इब्राहिम आदिलशहा यांनी बांधून घेतली होती. याची बनावट विजापूर शैलीची आढळून येते. या ठिकाणी उर्दू भाषेतील शिलालेख देखील पाहायला मिळतो.
सोमाले तलाव :
पन्हाळगडावरील पेठेस लागूनच एक मोठा तलाव आहे तो आहे सोमाले तलाव. याची उत्पती ब्रह्मदेवाने केली असे मानले जाते.
सोमालेश्वर मंदिर :
सोमाले तलावाच्या शेजारी सोमालेश्वर मंदिर आहे. प्रजा उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाने या ठिकाणी सोमालेश्वर महादेवाची स्थापना केली असे मानले जाते. व या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. ते हे मंदिर सोमालेश्वर मंदिर होय.छत्रपती शिवराय व मावळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी महादेव पिंडिस सहस्त्र चाफ्याची फुले वाहून या पिंडीची पूजा केली होती.
रामचंद्रपंत अमात्य समाधी :
स्वराज्याचे अमात्य रामचंद्रपंत यांचे वास्तव्य इथे होते. त्यांची समाधी आपणास इथे पाहायला मिळते.
तसेच त्यांच्या पत्नीची समाधी देखील इथे एका बाजूस आहे.
रेडे महाल :
पन्हाळगडावर एक घोड्याची पागा होती. त्या ठिकाणी नंतरच्या काळात जनावरे बांधली जाऊ लागली. ती इमारत आज रेड्यांची वास्तू असे म्हंटले जाते.
छत्रपती संभाजी महाराज मंदिर :
छत्रपती दुसरे संभाजी महाराजांचे वास्तव्य या ठिकाणी होते. त्यांच्या पश्चात त्यांचे एक मंदिर इथे बांधले आहे.
धर्म कोठी :
संभाजी मंदिरापासून पुढे गेल्यावर आपल्याला धर्म कोठी लागते. शिवकाळात सरकारातील धान्य घेऊन ते गरिबांना दान धर्माच्या स्वरूपात या ठिकाणी वाटले जात होते.
दुतोंडी बुरुज :
पन्हाळगडावर न्यायालयाजवळच दोन्ही बाजूंनी पायऱ्या असणारा दुतोंडी बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही बाजूने पायऱ्या असल्याने त्यास दुतोंडी बुरुज असे म्हणतात.
कलावंतीण महाल :
बहामनी सुलतानाच्या काळात बांधलेली ही वास्तू ही नाचगाणे करणाऱ्या कलावंतीणींसाठी बांधलेली होती. नंतरच्या काळात या ठिकाणी स्त्रियांसाठी राहण्याची व्यवस्था केली जात असे.
पिसाटी बुरुज :
गडाच्या मागील बाजूस एक बुरुज आहे. त्यास पिसाटी बुरुज असे म्हणतात. बुरुज हे आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त असत.
• चार दरवाजा :
पन्हाळगडाच्या पुर्व भागात एक दरवाजा होता तो म्हणजे चार दरवाजा. इंग्रजांनी इसवी सन १८४४ साली या बाजूने हल्ला केला तेव्हा यावर तोफेच्या गोळ्यांचा मारा करून हा दरवाजा नष्ट केला. आज त्याचे अवशेष पहायला मिळतात.
नरवीर शिवा काशीद स्मारक :
पन्हाळ्यावर चार दरवाजा जवळ तुम्हास एक पाटी दिसेल नरवीर शिवा काशिद यांचे स्मारक या नावाने त्या वाटेने गेल्यावर नेबापुर नावाचे गाव आहे. तिथे नरवीर शिवा काशिद यांचे स्मारक आहे. या ठिकाणी बाहेरील बाजूस सूचना फलक व मावळ्यांची स्मृती शिल्पे दिसतील. त्यावरून घडलेल्या घटनेची आपणास संपूर्ण माहिती मिळेल. व आतील बाजूस शिवा काशिद यांची समाधी पाहायला मिळते.
वाघ दरवाजा :
पन्हाळा गडावर वाघ दरवाजा देखील आपणास पाहायला मिळतो. अत्यंत भक्कम असे बांधकाम असणारा एखाद्या वाघाप्रमानेच किल्ल्याचे रक्षण करणारा हा दरवाजा आहे.
राजदिंडी दरवाजा :
विशाळगडाच्या दिशेला असणारा हा दरवाजा येथून पुढे अती दुर्गम वाटेने कासारी खोऱ्यातून, मसाई पठार मार्गे विशाळगडाला जाता येते. येथून विशाळगड ४५ मैल अंतरावर आहे. छत्रपती शिवराय याच वाटेने विशाळगडाला गेले होते.
तबक उद्यान :
पन्हाळ गडावरील एक विस्तृत अशी झाडीने नटलेली. विविध खेळण्याची साधने असलेली, मुलांसाठी खेळण्यास उपयुक्त अशी बाग. उंच सखल अशा झाडीतून सुरेख सुंदर शितल छाया देणारे हे उद्यान आहे.
पन्हाळा किल्ल्यावर घडलेल्या ऐतिहासिक घडामोडी :
• पूर्वी या ठिकाणी ब्रह्मदेवाने प्रजा उत्पतीसाठी सोमेश्वर पिंड स्थापना व तलाव निर्माण केला. व तपश्चर्या केली. म्हणून या ठिकाणास ब्रहमगिरी असे म्हणतात.
• पराशर ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली. या ठिकाणी नागांची वस्ती होती. इंद्रदेवाने पराशर ऋषींची तपश्चर्या भंग करण्यास नागांना सांगितले. त्यांनी उपद्रव देताच पराशर कोपले. तेव्हा नाग शरण आले. नागांना पन्नग असे म्हणतात. पन्नग म्हणजे नाग व आलय म्हणजे घर. म्हणून या जागेस पन्नंगालय असे म्हणतात.
• पन्हाळा किल्याचे प्रथम बांधकाम कोणी केले असेल तर इसवी सनाच्या ११७८ ते १२०९ या कालखंडात शिलाहार राजा नुर्सिंह भोज याने केले.
• यानंतर काही काळ हा किल्ला यादवांच्या ताब्यात राहिला.
• यादवांची राजवट नष्ट झाल्यावर या ठिकाणी इसवी सन १४६९ या साली बहामनी शाहीच्या काळात त्यांचा वजीर महमूद गवान हा अत्यंत हुशार होता. पावसाळी दिवसात बेसावध असताना व किल्ल्यावरील पहारा कमी असताना त्याने छावणी दूर ठेवून किल्ला हुशारीने जिंकला.
• इसवी सनाच्या १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने आपल्या ताब्यात हा किल्ला घेतला. व किल्याच्या दरवाजाचे व चबुतर्याचे बांधकाम त्याने करून घेतले.
• १६५९ साली शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
पन्हाळा किल्ल्यावर घडलेल्या ऐतिहासिक घडामोडी :
• शिवरायांनी पन्हाळगड ताब्यात घेताच आदिलशहाने आपला सरदार सिद्दी जौहर यास किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाठवले. त्याने २ मार्च १६६० ला किल्ल्यास ४०,००० सैन्याच्या मदतीने कडेकोट वेढा दिला. जवळजवळ सहा महिने हा वेढा चालला. गडावरील रसद संपत येताच शिवरायांनी तहाची बोलणी सुरू केली. व वेढा ढिल्ला होताच ते राजदिंडी दरवाजाने किल्ल्याच्या बाहेर वेशांतर करून बाजीप्रभू देशपांडे व बांधल मावळ्यांच्या मदतीने निसटले. त्या वेळी सिद्दी जौहरला फसवणेसाठी शिवरायांचे रुप घेतलेला शिवा काशीद हा कामी आला.
![]() |
पन्हाळा किल्ला संपूर्ण माहिती panhala Fort information in marathi |
सिद्दी जोहरला बहुरूपी शिवाजी आहे हे समजताच त्याने शिवा काशीदला ठार मारले. व सिद्दी मसूद या अधिकाऱ्यास छत्रपती शिवराय यांच्या मागे पाठवले. तेव्हा गनिमास पांढर पाणी ओढ्यावर पुढे असणाऱ्या घोडखिंडीत थोपवून बाजीप्रभू देशपांडे व बांदल यांनी निकराचा लढा दिला व शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यास मदत केली. या लढाईत अनेक बांदल युवक व बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू यांनी आपल्या प्राणांचे लढताना बलिदान दिले ही लढाई इतिहास प्रसिद्ध आहे.
• या घटनेवेळी उत्तरेस स्वराज्यावर मोघल आक्रमण आल्याने दक्षिण बाजूचा शत्रू शांत करण्यासाठी छत्रपती शिवराय यांनी आदिलशहाशी तह करून पन्हाळा किल्ला त्याच्या ताब्यात दिला
• पुढे ६ मार्च १६७३ साली कोंडोजी फर्जंद यास किल्ला जिंकण्यास पाठवले. अवघ्या ६० मावळ्यांच्या मदतीने कोंडोजी फर्जंद यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला.
• छत्रपती संभाजी यांनी काहीकाळ येथील कारभार पाहिला. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांची अखेरची भेट याच किल्ल्यावर झाली.
• महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीत इसवी सन १७१० साली मराठ्यांची राजधानी म्हणून मान्यता पावला. व महाराणी ताराबाईंनी येथूनच स्वराज्याचा कारभार चालवला.
• पुढे हा किल्ला इसवी सन १८४४ साली ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला.
• स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता दिली गेली असून आज या ठिकाणी पन्हाळा नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल, मिलिटरी बॉईज हॉस्टेल आहे.
• आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. व हे एक तालुक्याचे ठिकाण आहे.
कोल्हापूर शहरापासून जवळ असणाऱ्या या ठिकाणास पर्यटक नियमित भेटी देऊन शिवराय व त्यांच्या राजकीय घडामोडींची माहिती घेत असतात.
Panhala Fort information