मुल्हेर किल्ला माहिती
Mulher Fort Information in Marathi
• स्थान :
भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात मुल्हेरगड हा सह्याद्री पर्वतात वसलेला आहे.
• याठिकाणी जोडकील्यांची एक जोडी दिसून येते. एक मुल्हेर व दुसरा मोरागड.
• उंची :
या किल्ल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून ४२८४ फूट /१३०६ मीटर आहे.
• मुल्हेर गडावर जाण्यासाठी मार्ग :
• नाशिक शहरापासून थेट – दिंडोरी – वणी – साल्हेरवाडी – वाघांबे मार्गे मुल्हेरला जाता येते.
• नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मार्गे मालेगाव - वडनेर – नामपूर – ताहाराबादमार्गे – मुल्हेर
• मुल्हेर किल्याची माहिती :
• नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुल्हेरगड आहे. गडाच्या पायथ्याशी आल्यावर आपणास समोर दोन जोड किल्याची जोडी दिसते. त्यातील एक आहे मुल्हेर तर दुसरा मोरागड.
• मुल्हेर जवळ एक धर्मशाळा आहे. उद्धव महाराज धर्मशाळा या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी उत्तम सोय आहे. सकाळी उठून आपण गड भ्रमंतीसाठी जाऊ शकतो.
• पहिली तटबंदी व गडाचा भग्न दरवाजा :
किल्याच्या दिशेने चालू लागल्यावर आपणास प्रथम एक तटबंदी लागते. व किल्याचा प्रथम दरवाजा लागतो. याची बरीचशी मोडतोड झाली असून सध्या उभ्या चौकटीचे स्तंभ पाहायला मिळतात.
• पुढे एक वाटेत छत्री लागते. तिथून पुढे गेल्यावर आपणास काही पडक्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात.
• भव्य तलाव :
![]() |
मुल्हेर किल्ला माहिती Mulher Fort Information in Marathi |
पुढे गेल्यावर आपल्याला एक भव्य बांधकाम केलेला तलाव लागतो. त्यामधे पाण्याची उंची मोजण्यासाठी एक स्तंभ पाहायला मिळतो.
• महादेव मंदिर :
तलावाच्या शेजारी सुरेख महादेव मंदिर पाहायला मिळते. या मंदिरासमोर भव्य सभामंडप असून आतील बाजूस एक शिवलिंग पाहायला मिळते. त्या मागे एक गणेशमूर्ती देखील पाहायला मिळते. सभामंडपात स्तंभ व कमानाकृती महिरप पाहायला मिळते.
• सोमेश्वर मंदिर :
पुढे पायवाटेने गेल्यावर आपणास सोमेश्वर मंदिर पाहायला मिळते. तळ्याकाठी असणाऱ्या मंदिरासारखेच या मंदिराचे देखील बांधकाम आपणास पाहायला मिळते. या मंदिरा जवळील माहितीवरून असे समजते की या मंदिराचे बांधकाम इसवी सन १४८० साली झाले आहे. आतील बाजूस खोलवर गाभारा आहे. गाभाऱ्यात महादेव पिंड आपणास पाहायला मिळते हे मंदिर बाभुळराजे यांनी बांधले असावे. गाभार्या समोरील सभामंडपात नंदी विराजमान आहे. सभामंडपातील वरील कमानरुपी महिरपी मध्ये सुरेख जाळीकाम केल्याचे दिसून येते. यातून रोज सकाळी सूर्य किरणे थेट महादेव पिंडीवर पडतात. हा एक उत्कृष्ट बांधकामाचा नमुना दिसून येते.
• सोमेश्वराचे दर्शन घेऊन वरील दिशेने गेल्यावर आपण मोरागड व मुल्हेर गडास जोडणाऱ्या मध्यभागी असणाऱ्या खिंडीत पोहोचतो.
• खिंडीतील भिंत :
मुल्हेर व मोरागड हे एकमेका जवळ असल्याने ते एकमेका सहाय्यक आहेत. एखादा शत्रू एका गडाच्या साहाय्याने दुसरा सहज जिंकू नये यासाठी जेव्हा हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला तेव्हा या खिंडीत शिवरायांनी एक भक्कम भिंत उभी केली. जा भिंतीच्या वरील बाजूस जंग्या व फांज्या बनवल्या गेल्या आहेत. शत्रूशी पहिली चकमक इथेच उडू शकते. हे जाणून भक्कम भिंत बांधली गेली आहे.
• बुरुज व त्याजवळील कात्याळ डोंगर :
भिंत ओलांडून आपण जेव्हा पलीकडे जातो. तेव्हा आपल्याला एक थोडे वरील भाग चढून जाताना एक बुरुज लागतो. काळाच्या ओघात याचा भाग थोडा ढासळलेला दिसतो. बाजूला उंच कात्याळ डोंगर व एक अरुंद वाट या वाटेने पुढे गेल्यावर आपणास एक बांधकाम आढळते. तिथे एक दरवाजा आहे. जो वरील बाजूची दरड कोसळली व त्यामुळे तो मुजला आहे.
• महादरवाजा :
या मुजलेल्या दरवाजापासून वरील बाजूस चढून गेल्यावर आपणास महादरवाजा पाहायला मिळतो. जो आजही सुस्थितीत आहे. ज्याची भव्यता आजही किल्याच्या वैभवाची साक्ष देते. या दरवाजावर कमळ पुष्प व गणेश मूर्ती कोरलेली आहे. जी हिंदू संस्कृतीच साक्ष देतात.
• पाण्याचे टाके :
किल्याचे बांधकाम करताना लागणारे दगड जेथून काढले गेले. त्याठिकाणी पाण्याची टाकी निर्माण केली. ते पाण्याचे टाके आपणास इथे पाहायला मिळते.
• देवीचे मंदिर :
पाण्याच्या टाक्यापासून पुढे गेल्यावर आपणास एका वृक्षाच्या खाली आपणास एक छोटेसे देऊळ पाहायला मिळते. तेथे हिंदू देवतेची मुख प्रतिमा पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरात दगडी फरसबंदी पाहायला मिळते.
• तलाव :
मंदिरापासून थोड्या अंतरावर एक तलाव पाहायला मिळतो. असे या ठिकाणी दोन ते तीन तलाव पाहायला मिळतात. यातील दोन तलाव कोरडे पडलेले आहेत. या तलावांच्या सभोवती चिरेबंदी बांधकाम आढळते. तसेच तलावातील पाण्याची उंची मोजण्यासाठी खडा स्तंभ देखील पाहायला मिळतो. काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेले आहेत. या तलावातील पाणी पिण्यासाठी तसेच अंघोळ करण्यासाठी व व इतर खर्चासाठी वापरले जात असे.
• राजवाडा अवशेष :
गडावर एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले बांधकाम देखील आढळते. पुढे गेल्यावर आपणास एका राजवाड्याचे अवशेष आढळतात. या ठिकाणी त्या काळात राजे राजवाडे व त्यांचं कुटुंब व नोकर चाकर यांना राहण्याच्या सोयीने केलेली वास्तू रचना आढळते. सध्या तिथे एक कमानरूपी चौकट सोडल्यास पडलेले अवशेष पाहायला मिळतात . या कमानरूपी चौकटीवरील कलाकुसर व बारीक नक्षी तत्कालीन बांधकामाची माहिती देते.
• अकरा पाण्याची टाकी :
किल्याच्या आतील भागात आपणास अकरा पाण्याची टाकी पाहायला मिळतात. किल्ल्यावरील वास्तूंचे बांधकाम करताना जे खाणीतून दगड काढले. त्या मध्ये टाकी तयार होतील असे खनन काम केले गेले. या टाक्यांमधून मोठ्याप्रमाणात येथील पाण्याची गरज भागवली जात होती. आजही यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळते.
• कात्याळ गुहा :
गडाच्या वरील भागात आपणास कात्याळ गुहा पाहायला मिळतात. संपूर्ण छिन्नी हातोड्याने खोदून केलेल्या या गुहा आहेत. या अत्यंत प्राचीन असून या ठिकाणी फार पूर्वीपासून लोकांचे राहणीमान होते.
लागोपाठ खोल्या असणाऱ्या या गुहा आजही राहण्यायोग्य आहेत.
तसेच यांची निर्मिती शालिवाहन व सातवाहन कालीन असल्याचे आढळते.
• गडाची संपूर्ण पाहणी करून उतरताना आपणास एकेठिकाणी डोंगरात कोरलेली हनुमंताची मूर्ती देखील पाहायला मिळते.
• मुल्हेर किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती :
• मुल्हेर किल्याच्या परिसरात असणाऱ्या अनेक ठिकाणांचा उल्लेख हा महाभारत काळाशी जोडला जातो.
• शालिवाहन व सातवाहन काळात या ठिकाणी अनेक गुहांची निर्मिती केली असावी असे मानले जाते.
• इसवी सनाच्या १३ व्या शतकात बाभुळराजे या राजाची राजवट या ठिकाणी होती. बाभुळ राजा व सम्राट अकबर यांची मैत्री होती. बऱ्याच वेळा लष्करी मदत ही सम्राट अकबराने केल्याचे दिसून येते.
• शहाजहान जेव्हा बादशहा झाला त्यावेळी त्याने या प्रांतात इसवी सन १६३८ आली औरंगजेब या आपल्या मुलाची नेमणूक केल्यावर त्याने या भागावर आक्रमण करून हा प्रदेश मुघल साम्राज्यास जोडला.
• इसवी सन १६७२ साली सुरतेची दुसरी लूट केल्यावर परत स्वराज्यात येत असताना छत्रपती शिवराय यांनी हा प्रदेश जिंकून घेतला.
• पुढे हा किल्ला पेशवाईत गेला.
• इसवी सन १८१८ साली ब्रिटिशांनी जेव्हा पेशवाईचा अस्त केला. तेव्हा मराठ्यांकडून हा किल्ला इंग्रकानी जिंकून घेतला. त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असणाऱ्या बांधकामाची नासधूस केली.
• इसवी सन १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या अखत्यारीत आला..
• अशी आहे मुल्हेर किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती.
maharashtrakillevsthaledarshn.blogspot.com