राजगड किल्ला
Rajgad Fort information in marathi
राजगड किल्ला Rajgad Fort information in marathiस्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गणला गेलेला गिरिदुर्ग, जो आज ही पश्चिम घाट माथ्यावर इतिहासाची साक्ष देत उभा आहे तो म्हणजे राजगड होय.
'गडांचा राजा अन् राजांचा गड '
अशी उपाधी शोभून दिसणार गिरिदुर्ग हा राजगड आहे.
![]() |
राजगड किल्ला Rajgad Fort |
स्थान :
राजगडाला जायचे असेल तर पुणे शहरापासून नैऋत्येस ४८ कि.मी. अंतरावर कानद खोऱ्यात भोर पासून जवळ अंदाजे २४ कि. मी. या गडाचे स्थान आहे. या किल्ल्यास आपल्याला जायचे झाले तर त्याच्या सभोवती सह्याद्री पर्वताने त्यास एक वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण दिले आहे. ते म्हणजे त्याकडे जाताना कोणत्याही दिशेने जातेवेळी एखादी नदी किंवा छोटासा डोंगर हा ओलांडावा लागतोच.
राजगडाचे भौगोलीक वास्तव :
गडाचा विस्तार हा बारा कोसांचा आहे. एक कोस म्हणजे अंदाजे २ ते ३ कि. मी.
उत्तरेला गुंजवणी नदी व तिचे खोरे.
दक्षिणेला वेळखंड नदी व तिच्यावरील भाटघर धरण
पूर्वेला पुणे सातारा रस्ता, व पश्चिमेला उंच सह्याद्री घाट माथा. व काणद नदी खोऱ्यास लागून मधोमध मुरुंबदेवाच्या डोंगरावर वसलेला किल्ला राजगड होय.
उंची :
समुद्र सपाटी पासून या किल्ल्याची उंची सरासरी १३९४ मीटर आहे. तसेच पायथ्या पासून जवळ जवळ त्याची उंची अंदाजे ९०० मीटर आहे.
राजगडाला जायचे मार्ग:
पुणे सातारा रोडवरील नसरापूर गावापासून राजगडला जाता येते. राजगडाच्या पायथ्याशी आल्यावर
राजगडाला जायचे झाले तर दोन मार्गे जाता येते
एक मार्ग पाली दरवाजा मार्गे, अन दुसरा मार्ग हा गुंजवणी दरवाजा मार्गे राजगडला जाता येते. जवळ जवळ दोन ते तीन तासात आपण गडावर जाऊन पोहोचू शकतो.
गुंजवणी मार्ग :
पुण्यापासून गुंजवणे गावी आल्यावर तेथून रान वाटेने पुढे गेल्यावर जंगल लागते त्या जंगलातून जाणारया वाटेने ट्रेक करत आपण चोर दरवाजा मार्गे राजगड वर जाऊ शकतो.
पाली दरवाजा मार्गे :
हा तत्कालीन राज्य मार्ग आहे. चढण्यास सुकर व सोपा आहे.
राजगडावर राज्य करणाऱ्या राजवटी :
इतिहासामधील नोंदीवरून असे समजते की प्रथम पहिल्या शतकात महाराष्ट्रातील वैभवसंपन्न अशा सातवाहन राजवटीच्या काळात गौतमिपुत्र सातकर्णी या राजाने प्रथम या ठिकाणी मजबूत ठाणे ओळखून बांधकाम केले.
त्यानंतर शिलाहार व यादव राजवटीत हा प्रदेश ताब्यात राहिला. नंतर बहामनी काळात हा मुस्लिम शासकांच्या ताब्यात हा किल्ला होता. नंतर बहामनी सत्ता नष्ट झाल्यावर हा किल्ला निजामशाहीकडे काही काळ नंतर आदिलशाहीकडे, पुन्हा निजामशाहीत व आदिलशाहीत असा वेगवेगळ्या सत्तांच्या ताब्यात राहिला.
छत्रपती शिवरायांनी हा किल्ला इसवी सन १६४५ साली ताब्यात घेतला. व त्याचे भौगोलिक महत्त्व जाणून त्यांनी त्यास राजधानी योग्य रूपरेषा दिली. त्यांचे पूर्वीचे नाव मुरुंबदेवाचा डोंगर ही ओळख पूसून त्यास राजगड हे नामाभिधान दिले.
तोरणा किल्ल्याची डागडुजी करताना सोन्याने भरलेले हांडे सापडले त्या धनाचा उपयोग शिवरायांनी या किल्ल्याच्या बांधणीसाठी केला.
व स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान या किल्ल्यास मिळाला.
राजगडावर पाहण्या सारखी ठिकाणे :
राजगडावर पहाण्यायोग्य ठिकाणे म्हणजे पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बालेकिल्ला, तळी व पाण्याची टाकी, चिलखती बुरुज लहानमोठे दरवाजे यामध्ये गुंजपा, पाली, आळू, काळेश्वरी हे दरवाजे, बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी महादरवाजा, चोरवाटा, पद्मावती मंदिर, सदर, राजवाडा व इतर वास्तूंचे अवशेष, काही दगडी वस्तू, भग्न तोपा हे पाहायला मिळतात. तसेच उत्तुंग सह्याद्री शिखरे भोवताली वाहणाऱ्या वेळवंडी, काणद, गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांचे नयनरम्य दर्शन इथून घडते. तसेच विस्तृत राजगड जंगली अभयारण्याचे नयनमनोहर दर्शन घडते.
पाली दरवाजा :
राजगडाच्या पायथ्यापासून पायऱ्यांच्या मार्गाने वर चढून अडीच ते तीन तासांचा प्रवास करून आपण गडावर पोहोचतो. तेव्हा प्रथम दरवाजा जो लागतो तो आहे पाली दरवाजा. शिवरायांनी गडाचे बांधकाम करताना बाहेरून दगड आणण्यापेक्षा गडावरील काळया पाषाणाचा वापर गड बांधनिस केला. पाली दरवाजाचे बांधकाम देखील संपूर्ण काळया पाषाणात केले गेले आहे. याची बांधणी गोमुख पद्धतीची जाणवते. या परिसरात थोडे बांधकाम अजूनही शिवकालीन बांधकामाची साक्ष देताना दिसते आहे.
मुरुंबदेवाचा डोंगर या नावाने ओळखल्या गेलेल्या डोंगरास राजगडाचे स्वरूप छत्रपती शिवरायांनी दिले.
साकी मुस्तैदखान या व्यक्तीने राजगडाचे वर्णन त्याच्या मासिरे आलिमगीरे नावाच्या ग्रंथात केलेले आपणास पहावयास मिळते. तो म्हणतो, की
‘ राजगड हा अत्यंत उंच किल्ल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा किल्ला याचा घेर बारा कोसाचा असून याच्या मजबुतीची कल्पनाच करता येत नाही. याठिकाणी डोंगर दर्यातून फिरणार्या वार्याशिवाय कोणीही फिरकू शकत नाही. व पावसाच्या पाण्यालाच वाट मिळू शकते.'
महेमद हाशिम खालिखान आपल्या मुन्तखबुललुबाब ए महेमदाशाही या ग्रंथात त्याने वर्णन केले आहे ते असे की,
असे केले आहे.
पद्मावती माची :
माची म्हणजे किल्ल्यावर चढून गेल्यावर वरती नैसर्गिकरित्या तयार झालेली सपाट जागा.
चोर दरवाजाने वर आल्यावर आपल्याला पद्मावती माचीवर येता येते.
पद्मावती देवी मंदिर :
पद्मावती देवीचे मंदिर हे पद्मावती माचीवर आहे. आतमध्ये देवी पद्मिनीची मूर्ती पाहायला मिळते.
सईबाई समाधी :
![]() |
राजगड किल्ला Rajgad Fort |
छत्रपती शिवरायांची प्रथम पत्नी सईबाई यांचे निधन याच गडावर झाले. इथे आपल्याला सईबाईंची समाधी पद्मिनी देवी मंदिराजवळ पाहायला मिळते.
रामेश्वर मंदिर :
इथून जवळच एक रामेश्वर मंदिर देखील पाहायला मिळते.
पद्मिनी तलाव:
मंदिराच्या खालील भागात एक बांधलेला तलाव पाहायला मिळतो. त्याचे नाव या पद्मावती देवीवरून ठेवले. गडावर तलाव बांधत असताना कोठे बांधावा याविषयी अनेकांना विचारले. पण त्यांनी दाखवलेल्या जागा महाराजांना पसंत पडल्या नाहीत. शेवटी पावसाळा सुरू झाला. व अचानक जोरदार पाऊस बरसत असताना महाराज पद्मावती मंदिराच्या जवळील झाडाखाली जाऊन थांबले. तेव्हा त्यांना तिथे किल्ल्यावरील पाणी कड्यावरून पडताना दिसले तेव्हा त्यांनी तिथे तलाव बांधून घेतला. त्याचे नाव पद्मिनी तलाव ठेवले.
• पद्मिनी माची ही विस्ताराने मोठी असल्याने बऱ्याच ऐतिहासिक वास्तू इथे पाहायला मिळतात. ही टप्या टप्याने चढत गेलेली असल्याने इथे आपणास जुन्या सदरेचे, बांधकाम तसेच राजवाडे. व इतर निवास स्थानांचे अवशेष पाहायला मिळतात.
• पद्मावती माचीवर अंबारखाना आहे. या अंबारखान्याजवळ एक भग्न तोफ देखील आहे. तसेच दारूगोळा कोठराचे अवशेष देखील पाहायला मिळतात. काही पडलेल्या भिंतींचे अवशेष पाहायला मिळतात. याठिकाणी एक वास्तू आहे ती म्हणजे हवालदारांची सदर इथेच अनेक वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.
• हवालदाराच्या सदरे पासून पुढे दोन वाटा आपल्याला दिसतात. त्यातील एक वरील बाजूस बालेकिल्ल्याकडे तर दुसरी खालील बाजूस सुवेळा माचीकडे जाते.
संजीवनी माची :
पद्मिनी माचीवरील हवालदार सदरेपासून एक वाट थेट आपल्याला बालेकिल्ल्याच्या सुळक्याजवळून संजीवनी माचीकडे घेऊन जाते. लहान मोठ्या दरवाजातून पुढे चालत गेल्यावर पायवाटेने आपणास संजीवनी माचीकडे जाता येते. संजीवनी माची ही एक नागमोडी नागीण शिकार करण्यासाठी चालत आहे अशी वाटते. तिला जागो जागी टेहळणीसाठी चिलखती बुरुज बांधले आहेत. जवळजवळ अडीच कि. मि. लांब अशी ही माची तिहेरी तटबंदी असणारी आहे. अत्यंत अरुंद अशा भिंतीची ही तटबंदी शत्रूने जर हल्ला केला तर एकावेळी एक सैनिक इथून प्रवेशू शकतो. व एका एका सैन्याशी लढणे हे सोपेच असते. असे करण्यामागे या माचीचे स्थान यासाठी जबाबदार आहे. कारण माचीच्या बाजूने विस्तृत जागा आहे. तसेच इथे तुम्हाला अनेक दरवाजे व चोर वाटा पाहायला मिळतील. शिवकाळात इथे शिबंदीतील पहारा करणाऱ्या शिपायांसाठी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहेत. तसेच जागोजागी शरभ शिल्पे कोरलेली दिसतात. यामध्ये एक सिंह आपल्या पायात हत्ती दाबून ठेवत आहे. असे शिल्प. मावळ्यांना प्रेरणा देण्याचा यामागे उद्देश दिसतो. शरभ म्हणजे स्वराज्याचे मावळे. व हत्ती म्हणजे मदांध, माजलेली अन् सत्तेचा माज असणारे बादशहा, व शाह्या होत. तसेच या माचीजवळ आलू दरवाजापाशी देखील एक शिल्प पाहायला मिळते. तिथे दोन वाघांच्या पायात हरीण सापडले आहे. ते त्याची शिकार करत आहेत असे आहे. आजच्या काळात देखील या ठिकाणी असणारी तटबंदी चांगल्या स्थितीत आढळून येते. या माचीच्या टोकावरून आपल्याला तोरणा, तसेच भाटघर धरणाचा जलाशय पाहायला मिळतो.
* एखादे सुरक्षेच्या दृष्टीने बुद्धिकौशल्य वापरून बांधकाम कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजीवनी माची होय.
* एकदा तरी या ठिकाणी अवश्य भेट द्या.
सुवेळा माची :
बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला एक फाटा फुटलेला आहे. त्याने सरळ पुढे अरुंद वाटेने गेले असता एक सपाट भाग लागतो व त्यापुढे सुरवातीस एक भक्कम चिलखती बुरुज लागतो. त्याच्या बाजूने एका छोट्या दरवाजाच्या पायऱ्या उतरून गेल्यावर एक तटबंदीला लागूनच चिंचोळ्या वाटेने पुढे गेल्यावर थेट सुवेळा माचीकडे जाता येते. चिलखती बुरुजा पासून जाताना एक गणेश मूर्ती लागते. ती शेंदरी रंगात रंगवली आहे.
तिथेच जवळील खडकात वरील बाजूस तुटलेल्या खडकाची कमानाकृती आहे तिला निढे किंवा हत्ती प्रस्त, वाघाचा डोळा म्हणतात. इथून सह्याद्रीचे मस्त दर्शन घडते. मात्र जरा सावधपणे जावे लागते हे एक उंच काळ्या बेसाल्ट खडकाचे उभे पाषाण आहे. त्याला लांबून पाहिले की ते हत्ती सारखे दिसते.
![]() |
राजगड किल्ला Rajgad Fort |
. तिथून पुढे आपणास तटबंदीने बळकट बनवलेली तासीव कड्याची सुरेख माची दिसते. ती आहे सुवेळा माची. या माचीवर एकूण सतरा बुरुज आहेत. त्यातील सात चिलखती बुरुज आहेत. तसेच इथे बांधीव व चिंचोळ्या चोरवाटा देखील आहेत. पुढे टोकाकडे एक पिण्यासाठी सुंदर तलाव बांधलेला आढळतो का. इथे काही घरगुती वस्तूंचे अवशेष सापडतात. जसे तुटलेले दगडी जाते. ही माची सर करणे तसे अवघड आहे. यांच्या बाजूने खोल दरी आढळते.
बालेकिल्ला :
किल्ल्यातील सर्वात वरील सुरक्षित जागा म्हणजे ‘बालेकिल्ला'
पद्मावती माची वरून पुढे आल्यावर एक वाट वरती बालेकिल्ल्याकडे आपणास घेऊन जाते. ही अत्यंत अरुंद अशी पायवाट आहे. इथून जाताना आपण जरा सावध जावे. कारण इथे झाडीत एखादे मव्हाचे पोळे असू शकते. तिथून पुढे चढून गेल्यावर आपल्याला बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो.
महादरवाजा :
पाली दरवाजा प्रमाणेच हा देखील काळया पाषाणात बांधला आहे. अत्यंत उंच अन् भक्कम स्थितीत, येथून आपल्याला सुंदर सूर्योदयाच्या वेळी पूर्वेला सूर्याच्या उगवतानाचे दर्शन घडते. हे पाहण्यासाठी आपल्याला किल्ल्यावर वस्ती राहावे लागते. महादरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे संरक्षक कुलूप होय.
• अफजखानाच्या वधानंतर त्याचे शीर इकडे आणले गेले ते याच दरवाजाच्या एका बाजूस पुरले होते.
चंद्रतळे :
बालेकिल्ला अती उंच असल्याने बांधकामासाठी लागणारे दगड इथूनच खोदून काढले. व ते काढत असताना सुंदर तळ्यांचे स्वरूप त्या जागेला दिले त्या तळ्यांचा आकार एका चंद्र कोरीप्रमाणे आहे. म्हणून या तळ्यांना चंद्रतळी हे नाव मिळाले.
बाजारपेठ :
बालेकिल्ल्यावर बाजारपेठेचे अवशेष पहायला मिळतात. शिवकाळात इथे बाजार भरत असे.
ब्रह्मेश्वर मंदिर :
या ठिकाणी एक बांधलेल्या सुस्थितीत अवस्थेत असणारे ब्रहमेश्वर मंदिर आहे.
राजवाडा :
थोडे पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्याचे अवशेष पहायला मिळतात. या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनाचा बराच काल म्हणजे अवघा २५ वर्ष व्यतीत केला आहे. या ठिकाणी अनेक रहिवासी वस्तीचे अवशेष मिळतात.
• बालेकिल्ला वरून राजगडाच्या माच्यांचे सुरेख दर्शन तर घडतेच. शिवाय परिसरातील नद्यांच्या धरणाच्या पाण्याच्या व सभोवताली असणाऱ्या अरण्याचे लोभसदर्शन देखील घडते.
• या किल्ल्यावर तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, शिळमकर अशा अनेक सरदारांचे वास्तव्य होते. त्यांच्यासाठी बांधलेल्या वास्तूंचे अवशेष इथे पाहायला मिळतात.
• तानाजी मालुसरे कोंढाण्यावर धारातीर्थी पडल्यावर त्यांचा देह प्रथम या किल्ल्यावर आणला. इथून पुढे त्यांच्या उमरठे गावी नेला गेला.
• हा किल्ला स्वराज्याच्या बहुसंख्य गुप्त वाटाघाटी तसेच गड मोहिमा, व अनेक योजनांचा साक्षीदार आहे. अफजलखानाच्या विरुध्द मोहीम, पुरंदरचा तह, तसेच आग्ऱ्याहून सुटून प्रथम छत्रपती शिवराय प्रथम याच गडावर आले.
• छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म देखील याच किल्ल्यावर झाला. हे त्यांचे जन्मस्थळ आहे.
• या किल्ल्याची रचना एका सिलिंग फ्यान सारखी आहे. बालेकिल्ला हा मधील भाग व संजीवनी, सुवेळा, पद्मावती, या तीन माच्या म्हणजे त्याची पाती होत.
• स्वित्झर्लंड येथील म्युझियममध्ये जगातील सर्वोत्कृष्ट १४ किल्ल्यांच्या प्रतिमा तेथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये भारतातील एकमेव किल्ला आहे. अन् तो म्हणजे राजगड.
अशा या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला जीवनात एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
राजगड किल्ला Rajgad Fort
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l