लोहगड किल्ला माहिती व इतिहास
Lohgad Fort information in marathi
सोने चांदी मौल्यवान रत्ने व वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी जर का भक्कम तिजोरी हवी ती लोखंडी धातूचीच, म्हणजेच लोहाची. तसेच स्वराज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी असा सुरक्षित किल्ला म्हणजे लोहगड किल्ला होय.
![]() |
लोहगड किल्ला माहिती इतिहास Lohgad Fort information in marathi |
सूरत शहरातून आणलेली लूट छत्रपती शिवरायांनी सुरक्षित कोणत्या ठिकाणी ठेवली असेल तर ती सुरक्षित जागा आहे लोहगड किल्ला. त्या लुटिचा वापर पुढील काळात स्वराज्यातील किल्ले बांधताना त्यांनी केला.
लोहगड किल्ल्याचे स्थान :
पुणे जिल्ह्यातील पश्चिमेस असणाऱ्या सह्याद्री पर्वतात असणाऱ्या मावळ तालुक्यात पवना नदी खोऱ्यात, नाणे मावळ व पवन मावळ यामध्ये असणाऱ्या पर्वतराजीत लोहगड किल्ला वसलेला आहे.
लोहगड किल्ल्याची उंची :
लोहगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची सरासरी ३४२० फूट असून हा एक भक्कम, उंच असा गिरिदुर्ग आहे.
लोहगड किल्यावर जाण्यासाठी असणारा मार्ग:
• लोहगड किल्ला पुणे शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई पासून ९० किलोमीटर अंतरावर आहे.
• लोणावळा जवळील मळवली गावात रेल्वे स्टेशन आहे तिथे आपण मुंबई -पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्या पेसेंजर अथवा लोकल रेल्वेने उतरून एक्स्प्रेस हायवे वरून भाजे गावाहून पुढे लोहगड वाडीपासून पुढे गायमुखखिंड तेथून उजवीकडे असणार्या वाटेने लोहगडाच्या पायथ्याशी जाता येते. इथे पार्किंग व आहाराची सोय आहे. इथून पायरी वाटेने गडावर जाता येते.
• लोणावळा येथून स्वतःच्या चारचाकी किंवा मोटारसायकलने आपण भांगरवाडी- दुधीवरेखिंड मार्गे लोहगडवाडी मार्गे पुढे गायमुख खिंडीतून लोहगडला जाता येते.
• पुण्याहून पोंड कोळ वण मार्गे - तिकोना- पेठदुधीवरे खिंड – लोहगडवाडी मार्गे लोहगडला जाता येते.
• किल्याच्या पायरी मार्गाच्या सुरवातीला पार्किंगची सोय आहे. तसेच या ठिकाणी अल्प उपाहार देखील करता येतो.
• येथून पुढे पायरी मार्गाने जाताना २५ रुपये माणसी शुल्क पर्यटन स्थळ कर तेथील तिकीट खिडकीतून द्यावे लागते.
लोहगड किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
लोहगड किल्ला पाहताना पायरी मार्ग, गणेश दरवाजा, महादरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, दर्गा, लोहार शाळा, चुना बनवण्याची घाणी, लक्ष्मी कोठी, महादेव मंदिर, धान्य कोठार, अष्टकोनी तलाव, सोळाकोनी तलाव, विंचुकडा,
• लोहगड किल्याच्या परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे :
भाजे लेणी, बेडसा लेणी, पवना धरण, तिकोना किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला.
• पायरी मार्ग :
गायमुख खिंडीतून लोहगडाच्या पायथ्यापासून पायरी मार्ग लागतो. अत्यंत भक्कम असा काळया दगडांचा सुरेख असा हा पायरी मार्ग आहे. त्या मार्गाने आपण गडावर जाऊ शकतो.
• गणेश दरवाजा :
पायरी मार्गाने वरती चढून आल्यावर चिरेबंदी भिंतीत सुरेख नक्षीदार असा गणेश दरवाजा लागतो. या दरवाजाच्या दारावर लोखंडी सुळे लावलेले आहेत. दरवाजा ओढण्यासाठी गोलाकार कडी असून दरवाजा भक्कमपणे बंद करण्यासाठी लोखंडी साखळी देखील आहे. आतील बाजूस पहारे कर्यांना विसावा घेण्यासाठी कट्टा असणाऱ्या देवड्या आहेत. तसेच आतून बांधीव चिरेबंदी बांधकाम पाहायला मिळते. आतील बाजूस एक शिलालेख देखील आहे. या दरवाजाच्या उजव्या व डाव्या बाजूस बुरुजाखाली नरबळी दिला गेल्याचे म्हंटले जाते. सावळे नावाच्या दाम्पत्याचा इथे नरबळी दिला गेला. त्याबदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडी गावाची पाटीलकी दिली गेली. असे सांगितले जाते. नरबळी देणे ही एक अघोरी विधी आहे.
• ऐतिहासिक तोफा :
गणेश दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपणास आतील प्रांगणात काही भग्न तर काही सुस्थितीत असणाऱ्या तोफा पाहायला मिळतात. त्या गंजू नये म्हणून त्यांना तेल लावलेले आपल्याला पाहायला मिळते.
• बुलंद तटबंदी :
या किल्ल्यास बुलंद अशी चिलखती तटबंदी बांधली आहे. जागोजागी जंग्या व चौकोनी गवाक्षे ठेवली आहेत. त्यांची रचना वाटेवरील तसेच परिसरात टेहळणी करण्यासारखी केली होती. तसेच जसजसे तटावरून चालावे तसे आजूबाजूचा परिसर व विसापूर किल्ला दर्शन घडते.
• भुयारी मार्ग :
शत्रूने हल्ला केल्यावर संकट काळी किल्याच्या बाहेर जाण्यासाठी येथे भुयारी मार्ग देखील पाहायला मिळतात. पण अशा अंधारी मार्गाने जाणे आज काल धोक्याचे वाटते. पण त्या काळी ते धाडस त्यावेळचे लोक करत असत.
चोरवाट :
गणेश दरवाजा पासून पुढे वरील बाजूस एक चोरवाट देखील पाहायला मिळते.
• महादरवाजा :
गणेश दरवाजातून पुढे पायरी मार्गाने वर गेले असता भक्कम स्तंभ व बांधीव पायऱ्यांनी बांधलेला व पुढे उंचावर असणारा महादरवाजा पाहायला मिळतो. आजही भक्कम स्थितीत असणारा हा दरवाजा त्यातून पुढे खडा मार्ग दिसतो.
• महादरवाजा तून आत गेल्यावर तटावरून सुरेख विसापूर किल्ला दिसतो. व तिथे गुहेच्या स्वरूपाची खोली दिसते. त्यात छोटे पाण्याचे टाके आहे.
• महादरवाजाच्या आत चढून वर गेल्यावर एका ठिकाणी स्वच्छतागृह देखील पाहता येते.
नारायण दरवाजा :
नारायण दरवाजा हा तिसरा दरवाजा आहे. तो पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी बांधून घेतला असे मानले जाते. इतर दरवाजा प्रमाणे हा ही दणकट व त्या स्वरूपाच्याच बांधणीचा आहे.
हनुमान दरवाजा :
लोहगड किल्यावरील अती प्राचीन दरवाजा हा हनुमान दरवाजा आहे. इतर दरवाजा सारखाच चिरेबंदी तटामध्ये बांधलेला. दरवाजावर लोखंडी सुळे आहेत व हनुमंताची मूर्ती कोरलेली असलेला हा दरवाजा किल्याचे सर्वात वरील प्रवेशद्वार आहे.
शिवकालीन सभागृह अवशेष :
हनुमान दरवाजातून पुढे गेल्यावर थोड्या अंतरावर आपणास उंच ज्योत्याचे अवशेष पहायला मिळतात. ते शिवकालीन सभागृहाचे अवशेष मानले जातात.
दर्गा :
हनुमान दरवाजाच्या आतील बाजूस थोड्या अंतरावर एक दर्गा देखील पहायला मिळतो.
महादेव मंदिर :
लोहगडावर आपणास अत्यंत प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले महादेव मंदिर पाहायला मिळते.
• महादेव मंदिराबाहेर मागील बाजूस एक तळे पाहायला मिळते.
चुना बनवण्याची घाणी व तोफ :
दर्ग्या जवळच वाड्याच्या अवशेषा शेजारी आपणास लोहार शाळेचे अवशेष देखील पाहायला मिळतात. तिथेच जवळ ध्वज स्तंभ आहे. तिथे बांधीव चौथरा आहे. त्यावर एक छोटीशी तोफ ठेवलेली आहे. व चूना बनवण्याची घानी पण आहे.
सोळाकोनी तळे :
पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी सोळा कोनातून एक तळे बांधले होते. त्याला दगडी पायऱ्या ही उतरण्यासाठी आहेत.
लक्ष्मी कोठी :
लोहगड किल्यावर ध्वज स्तंभापासून उजव्या बाजूने चालत गेल्यावर आपणास उंच कात्याळात खोदलेल्या खोल्या दिसतात. आतील बाजूस विस्तृत अशी दालने असणारी ही जागा अती प्राचीन काळी खोदली गेली असल्याचे दिसते. ती आहे लक्ष्मीकोठी. छत्रपती शिवराय यांनी जेव्हा औरंगजेब बादशहाला अद्दल घडवण्यासाठी त्याच्या राज्यातील सधन संपन्न सूरत शहर लुटून आणले. तेव्हा ती संपत्ती त्यांनी या लक्ष्मी कोठीत ठेवली होती. तेव्हापासून या ठिकाणास लक्ष्मी कोठी म्हणतात.
घोड्यांची पागा :
किल्यावर उंच कड्याच्या आतील बाजूस कात्याळात खोदलेली घोडी बांधण्यासाठी पागा पाहायला मिळते.
अंबरखाना /धान्य कोठी:
लक्ष्मी कोठी पासून जवळच धान्य कोठी आपणास पाहायला मिळते. एक भुयारा सारखी रचना असणारी ही वास्तू आज मात्र दुर्लक्षित आहे.
धान्य ठेवण्याचे भुयार :
लोहगड किल्यावर धान्य ठेवण्यासाठी एक भुयार देखील आहे. ज्यामध्ये वरी, नाचणी, भात ठेवले जात असे. ते बंधिवलेले आढळून येते.
विंचूकडा :
लोहगडाचा आकार एखाद्या विंचवा सारखा आहे. विंचवाला जशी नांगी असते. तसीच रचना या गडाला लागून असणाऱ्या कड्याची आहे. त्यास विंचूकडा असे म्हंटले जाते. अरुंद वाटेने या कड्याकडे जाणे सोपे वाटते. पण परत येताना दमछाक होते. वाटेत या कड्याकडे जाताना छोटे अरुंद पाण्याचे टाके लागते. या कड्याजवळ असणारे बांधकाम व त्यातील पायवाटेने पुढे गेल्यावर कमानाकृती दरवाजाची रचना खडकात केलेली पाहता येते.
या कड्याखाली घनदाट जंगल आहे. विंचवाची नांगी सारख्या रचनेमुळे यास विंचू कडा असे म्हणतात.
लोहगड किल्याबद्दल ऐतिहासिक माहिती:
• लोहगड परिसरात तसेच किल्ल्यावर आपल्याला बुद्धकालीन लेणी पाहायला मिळतात. त्यावरून हा किल्ला इसवी सनापूर्वी पासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. उदा: भाजे, बेडसे, लेणी.
• महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य व यादवकालीन राजवटीच्या ताब्यात हा किल्ला होता.
• त्यानंतर बहामनी राजवटीत हा किल्ला काहीकाळ होता.
• बहामनी कालखंडानंतर हा किल्ला तेथील सरदाराकडून इसवी सन १४८९ साली मलिक अहमद याने निजामशाहीत जिंकून घेतला.
• इसवी सन १५६४ साली अहमदनगरचा सातवा सुलतान दुसरा बुर्हान निजाम यास कैद करून या किल्यावर ठेवण्यात आले.
• इसवी सन १६३० साली हा किल्ला आदिलशहाने जिंकून आपल्या ताब्यात घेतला.
• इसवी सन १६५७ साली शिवरायांनी कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी लोहगड सुद्धा ताब्यात घेतला.
• इसवी सन १६६५ साली हा किल्ला पुरंदरच्या तहाने मुघलांकडे हा किल्ला दिला गेला.
• १३ मे १६७० साली हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.
• सुरतेहून आणलेली लूट नेतोजी पालकर यांनी लोहगडावर लक्ष्मी कोठीत ठेवली होती.
• इसवी सन १७१३ साली शाहू महाराज यांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या कर्तबगारीवर खुश होऊन त्यांच्या ताब्यात सोपवला.
• इसवी सन १७२० साली आंग्र्यांकडून हा किल्ला परत पेशव्यांनी घेतला.
• इसवी सन१७७० साली पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी हा किल्ला ताब्यात घेऊन तेथे आपला कारभारी बंडोपंत मिटकुरे याकडे दिला.
• इसवी सन १७८९ साली नाना फडणवीस यांनी या किल्यावर नारायण दरवाजा, सोळाकोनी तळे, व इतर बांधकाम करून हा किल्ला बळकट केला.
• इसवी सन १८०३ साली हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. पण दुसऱ्या बाजीरावाच्या काळात तो परत मराठ्यांनी जिंकून घेतला.
• ४ मार्च १८१८ साली इंग्रज जनरल प्रॉथर याने लोहगड किल्ल्यास वेढा दिला. पण त्यापूर्वी त्याने विसापूर किल्ला ताब्यात घेतला. लोहगड किल्ला मरठ्यांनी लढवण्याचे ठरवले. पण दुसऱ्या बाजीरावाने किल्ला इंग्रजांच्या हवाली करण्यास सांगितले. व मराठ्यांनी तो इच्छा नसताना दिला.
• २६ मे १९०९ साली ब्रिटिश कालीन भारत सरकारने हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला.
१९४७ साली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आहे.
अशी आहे लोहगड किल्ल्याची माहिती.
Lohgad Fort information in marathi