वासोटा किल्ला (व्याघ्रगड)
• स्थान :
भारतदेशातील पश्चिम भागात असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत असणारा उंच, दुर्गम व जंगलाने वेढलेला असा गिरिदुर्ग म्हणजे वासोटा होय. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या महाबळेश्वर कोयना डोंगररांगेत कोयना नदीवर बांधलेल्या हेळवाक येथील धरणाच्या शिवसागर ब्याकवाटर क्षेत्रात वासोटा किल्ला वसलेला आहे.
वासोटा किल्याची ऊंची :
वासोटा किल्याची सरासरी उंची ही ४२६७ फूट/ ११७१ मीटर आहे.
• किल्याचा वरील भाग हा अंडाकृती असून सहा एकरात हा किल्ला पसरलेला आहे.
• वासोटा किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• वासोटा किल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
• कोकणातील चिपळूण – चोरवणे गाव येथपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. तेथून नागेश्वर सुळका व तेथून पुढे वासोटा किल्ला.
• सातारा शहरातून – कास पठारमार्गे – बामणोली गाव – तेथून शिवसागर जलाशयामध्ये असणाऱ्या लॉन्चने वनखात्याच्या परवानगीने पलीकडे गेल्यावर मेट इंदवली गावाचे अवशेष असणाऱ्या किनारी उतरून सरळ जंगली मार्गाने पुढे गेल्यावर एक ओढा आहे तो पार करून जंगलातून वर चढून गेल्यावर कार्वीचे जंगल तेथून पायरी मार्गाने आपण भग्न महादरवाजाजवळ येतो तेथून गडावर जाऊ शकतो.
• वासोटा किल्यावर पाहण्यासारखी स्थळे:
• सातारा मधून आपण कास पठारावर पोहोचलो की तेथील निसर्गरम्य अशा परिसराचा आनंद अनुभवून थेट कोयना खोऱ्यात असणाऱ्या बामणोली या गावी पोहोचतो. बामणोली हे कोयना नदीवर असलेल्या धरणाच्या बॅक वॉटर भागात किनारी असणारे गाव. या ठिकाणी आपल्याला लाँच मिळू शकते. जी या पाण्याच्या पलीकडे असणाऱ्या वासोटा किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलापर्यंत पोहोचवू शकते.
पण या ठिकाणी जाताना आपल्याला फॉरेस्ट खात्याची परवानगी घ्यावी लागते. तेथून पलीकडे आल्यावर कोयना धरणामुळे उठलेल्या मेट इंदवली गावातील घरांचे अवशेष पहायला मिळतात.
तिथून पुढे गेल्यावर आपणास कोयनेच्या उगम भागात व वासोटा किल्याच्या पायथ्याशी असणारे जंगल लागते. अत्यंत घनदाट आहे हे सह्याद्री पर्वतातील जंगल, येथून जाताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे कारण या परिसरात रानगवे, अस्वले, वाघ, व इतर रानटी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे जाणवते. तेव्हा एखादा ग्रुप व गटाने या किल्यावर फिरायला व पाहायला जाणे कधीही चांगले.
जंगलात असणाऱ्या थेट सरळ मार्गाने पुढे जंगली वाटेने चालत पुढे गेल्यावर आणखी एक ओढा लागतो. तो खूप मोठा ओढा त्याच्या काठाला एक भग्न अवस्थेत असणारे मंदिर त्यामध्ये असणारी हनुमंत व गणेश मूर्ती जिचे दर्शन घेतले की मनाला एक समाधान मिळते.
अरण्यातून प्रवास करताना मनातील भय दूर करणाऱ्या व संकट नाशन करणाऱ्या व शौर्य उत्पन्न करणाऱ्या या देवता आहेत. त्यांचे दर्शन घेतल्यावर मरगळलेल्या शरीरात देखील चेतना येते.तेथून पुढे आपणास पुढे कार्वीचे जंगल लागते. ते पार केल्यावर आपणास गडावर जाणारा पायरी मार्ग लागतो.
• वासोटा किल्ला प्रवेशद्वार :
किल्याच्या कात्याळ पायरी मार्गाने वर चढून गेल्यावर आपल्याला एक पडझड झालेल्या अवस्थेतील एक दरवाजा पाहायला मिळतो. त्याच्या अवशेषांवरून त्याची भव्यता दिसून येते.
- महादरवाजाच्या भग्न असलेल्या अवशेषांवरून या किल्याची भक्कम रचना लक्षात येते. एकामागे एक असे दोन दरवाजे या ठिकाणी होते. तसेच आतील बाजूस असणाऱ्या भग्न वर्तुळाकार अडणा अडकवायच्या दगडाच्या होलातून दरवाजाची भक्कमता लक्षात येते. आतील बाजूस पहारेकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत.
- हनुमान मंदिर :
भग्न प्रवेश दारातून किल्यावर आल्यावर पूर्व दिशेला असणाऱ्या तटबंदीच्या कडेने पाहणी करत चालले की आपणास किल्याखालील तटाचे व घनदाट अरण्याचे दर्शन घडते. तसेच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे दर्शन घडते. हे निसर्गाचे भव्य दर्शन पाहिल्यावर एक वेगळेच समाधान व शांती लाभते.
• पाण्याचे टाके :
सुरेख निसर्गाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके लागते. या टाक्याच्या मध्ये एक भिंत आहे. त्यामुळे त्याचे दोन भाग होतात. या ठिकाणी पिण्यायोग्य पाण्याचा हा साठा आपणास पाहायला मिळतो.
तटबंदी मुळे या टाक्याचे जे दोन भाग झालेत त्यातील एका भागाची खोली कमी आहे. तर दुसरे खूपच खोल असल्याचे जाणवते.
• नागेश्वर सुळका :
कोकण कड्याकडील तटाच्या भागात उभे राहिल्यास आपणास उंच असे दोन सुळके पाहायला मिळतात. त्यातील एक सुळका नागेश्वर सुळका आहे.
नागेश्वर सुळक्याकडे जाणारी एक वाट गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलामधून जाते. या ठिकाणी एका गुहेत असणारे शिवलिंग आहे. त्यावर वर्षभर येथील छताच्या चिरेतून पाणी गळत असते. दरवर्षी कोकणातले लाखो भाविक या ठिकाणी महाशिवरात्रीला दर्शनास येत असतात. या पर्वताचे शिखर नागाच्या फणीसारखे दिसते म्हणून यास नागेश्वर सुळका असे म्हणतात.
त्याच्या आलिकडे आणखी एक सुळका आहे, तो ही तसाच उंच त्यास तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे म्हंटले जाते. अशा या उंच सुळक्यावरून खाली उतरायचे धाडस केवळ पाण्याची धार करेल. व वर चढण्याचे धाडस फक्त वाऱ्याची झुळूक करेल. अशा या परिसराच्या मदतीने हिंदवी स्वराज्य टिकवण्याचे काम कोणी केलं असेल तर फक्त छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी.
• महादेव मंदिर :
नागेश्वर सुळक्याचे दर्शन घेतल्यावर मागे एका कडेने आल्यावर शिलाहार कालीन बांधणी असणारे एक सुरेख महादेव मंदिर आपणास पाहायला मिळते. संपूर्णतहा पाषाणात बांधणी असणारे, व सुरेख कळस असणारे मंदिर येथे आल्यावर नमन करून पुढे जावे वाटते.
• जुना तुरुंग अवशेष :
शिव मंदिर दर्शन घेवून आपण थोडे पुढे गेल्यावर आपणास एक भग्न इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी मध्ययुगीन काळात अनेक कैदी ठेवले जात असत. काही लोक त्यांना निवासी वास्तू देखील समजतात.
• सदर / वाडा अवशेष :
भग्न वास्तूंचे दर्शन घेऊन आपण पुढे आल्यावर आपणास एक चौथरा असणारी एक पाया असणारी वास्तू पाहायला मिळते ती आहे एक सदर वजा वाडा असणारी वास्तू आहे. तिच्या पायाभूत अवशेषावरून तिची मध्ययुगातील भव्यता दिसून येते.
- या ठिकाणी अनेक झाडेझुडपे वाढल्यामुळे काही ठिकाणी अनेक अवशेष पहायला मिळत नाहीत.
• दक्षिणटोक व जुना वासोटा डोंगर :
पुढे दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला जुन्या उंच वासोटा डोंगराचे दर्शन घडते. या ठिकाणी अत्यंत उंच असा हा सह्याद्री पर्वताचा भाग पाहताच मनाला एक वेगळा आनंद मिळतो. अत्यंत उंच ठिकाण व खाली खोल दरी व दरीत असलेली घनदाट झाडी, अगदी रम्य असे हे वातावरण आहे. याला जुना वासोटा असे म्हणतात.
• कोकण कडा/ बाबूकडा :
कोकणाच्या बाजूला असणारा वासोटा किल्याचा उंच कडा ज्या ठिकाणी उभारले असता खालील दरीची भयानकता दिसून येते. या कड्याला कोकणाकडील बाजूस आहे. म्हणून कोकण कडा असे म्हणतात. त्याचे दुसरे नाव बाबूकडा देखील आहे.
बाबू कडा कोकणच्या बाजूस आहे. अत्यंत उंच अशा कात्याळी सह्याद्रीचे व त्यांच्या दरीचे दर्शन तो घडवतो.
• वासोटा किल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• प्राचीन काळी महर्षी वशिष्ठ यांचे एक शिष्य या ठिकाणी राहत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंचे नाव या ठिकाणास दिले.
• वशिष्ठ नावाचा पुढे प्राकृत महाराष्ट्री भाषेत व नंतर मराठीत वासोटा असे रूपांतर झाले असावे.
• ज्ञानेश्वरी ग्रंथानुसार वसने म्हणजे राहणे यावरून वास करणारा म्हणून या ठिकाणास वासोटा नाव पडले असावे.
• इसवी सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजा भोजाने या ठिकाणी प्रथम किल्ला बांधला.
• पुढे हा किल्ला बहामनी राजवटीत आला.
• बहामनी राजवटी अस्तानंतर हा किल्ला आदिलशाहीत राजवटीत दाखल झाला.
• आदिलशाही सरदार मोरे जे जावळी खोऱ्याचे जहागीरदार होते. त्यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सनाच्या १६ व्या शतकात होता.
• १६ व्या शतकात चंद्रराव मोरे यांच्या स्वराज्याच्या कार्यास होणारा विरोध मोडून काढून संपूर्ण जावळी मोऱ्यांच्या ताब्यातून स्वराज्यात सामील करून छत्रपती शिवराय यांनी घेतली.
• जावळी जिंकली तरी देखील वासोटा किल्ला हा दूरवर अरण्यात असल्याने स्वराज्यात दाखल झाला नव्हता. व छत्रपती शिवराय यांनी आपले पायदळ पाठवून ६ जून १६६० साली जावळी खोऱ्यातील वासोटा किल्ला स्वराज्यात जिंकून घेतला.
• अफजलखान स्वारीचा बीमोड केल्यावर छत्रपती शिवराय यांच्या दोराजी नावाच्या सरदाराने राजापूरावर हल्ला चढवला. व तेथील इंग्रज वखारवाल्यांना अफजलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितले नाही. तेव्हा तेथील त्यांच्या गिल्फर्ड नावाच्या अधिकाऱ्यास त्यांनी अटक केली. व कैद करून आणून वासोट्यावर ठेवले.
• इसवी सन १६६१ रोजी स्यामुअल व फ्यारन हे अरबी चाचे कोकण समुद्र किनारपट्टीवर हल्ला चढवून तेथील मुली पळवत होते. व अरबस्तानात विक्री करत होते. शिवरायांनी समुद्र लांघुन एडनला गलबत पाठवून त्यांना पकडून कैद करून वासोटा किल्यावर कैदेत ठेवले व त्यांचा चांगला पाहुणचार घेतला होता.
• इसवी सन १६६१ साली वासोटा किल्ल्यावर २६००० रुपये सापडले होते.
• पेशव्यांच्या काळात औंधचे पंतप्रतिनिधी यांच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता.
• या नंतर इसवी सन १७०६ साली ताई तेलनीच्या ताब्यात हा किल्ला काहीकाळ होता.
• ताई तेलनीच्या ताब्यात असणारा वासोटा किल्ला काढून घेण्यासाठी पेशवे दुसरा बाजीराव याचा सेनापती बापू गोखले यांनी या किल्यावर इसवी सन १७३० साली हल्ला चढवला. तेव्हा ताई तेलनीने चिवट प्रतिकार देवून हा किल्ला सात ते आठ महिने निकराने लढवला. मग शेवटी बापू गोखल्याने शेजारील डोंगरावरून तोफांचा मारा केला. शेवटी ताई तेलनीने गड बापू गोखल्यांच्या ताब्यात दिला.
• ताई तेलनीच्या चिवट प्रतिकारने त्याकाळी बापू गोखले या सेनापतीला बरेच झुंजवले.तेव्हा एक पद्य प्रसिद्ध झाले.
“ श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा ,ताई तेलिन मारी सोटा ,सांभाळ बापू गोखल्या तुझा कासोटा.”
• पूढे हा किल्ला इंग्रज मराठा युद्धानंतर इसवी सनाच्या १८१८ साली इंग्रजांच्या ताब्यात गेला.
• अशी आहे वासोटा किल्याची ऐतिहासिक माहिती आहे.
Vasota Fort information in marathi