रामशेज किल्याची माहितीRamshej Fort information in marathi
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरापासून उत्तर दिशेला १५ किलोमीटर अंतरावर असलेला सपाट प्रदेशावरील उंच गिरिदुर्ग म्हणजे रामशेज किल्ला होय.
• वनवासात नाशिक परिसरात प्रभू रामचंद्र राहत असताना या ठिकाणी निद्रा घेण्यासाठी जात म्हणून या ठिकाणास रामाची शेज ( शेज म्हणजे अंथरून) असे नाव पडले.
• रामशेज किल्याची उंची :
या किल्याची उंची ३२०० फूट आहे. हा सह्याद्री पर्वतातील एक गिरीदुर्ग आहे.
रामशेज किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• मुंबई – नाशिक - नाशिक पेठ मार्ग – आसेवाडी येथून गडावर जाता येते.
• नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी पासून १० मैल अंतरावर रामशेज किल्ला आहे.
• पुणे तसेच मुंबई हून आपण नाशिकला जाऊन तेथून आपण रामशेजला जाऊ शकतो.
• पुणे – नाशिक रामशेज अंतर २३०किलोमिटर आहे.
• मुंबई – नाशिक – रामशेज अंतर १८० किलोमिटर आहे.
• पंचवटी पासून रामशेज किल्ला १० किलोमीटर अंतरावर आहे.
• रामशेज किल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे :
नाशिक पेठ रस्त्यावरील आशेवाडी गावात आल्यावर आपणास किल्ल्याकडे जाताना एक भव्य कमान लागते. तेथून पुढे आपण गाडी तळावर गाडी पार्क करून गडाच्या दिशेने चालत जाऊ शकतो.
• पायरी मार्ग :
पायरी मार्गाने तसेच कात्याळ खडक पाय वाटेने आपण गड चढू लागल्यावर पाऊण तासात आपण गडावर पोहोचू शकतो.
• रामशेज गुहा :
किल्यावर चढून जाताना आपणास किल्याच्या वरील भागात एक गुहा लागून असणारे मंदिर पाहायला मिळते. हे ठिकाण रामशेज या नावाने ओळखले जाते. वनवासात असताना प्रभू रामचंद्र हे या परिसरात वास्तव्य करताना झोप घेण्यासाठी येथील गुहेच्या ठिकाणी येत असतं. त्या ठिकाणी एक मंदिर बांधले आहे. ते प्रभू रामाचे मंदिर आहे. येथील शांत व प्रसन्न वातावरण मनाला वेगळी शांती देवून जाते.
आतील गाभाऱ्यात प्रभू रामचंद्र, सितादेवी, लक्ष्मण व हनुमान भगवंताची सुरेख मूर्ती पाहायला मिळते.
• श्री गुरुदेव दत्त व माता दुर्गेची मूर्ती देखील आपणास पाहायला मिळते.
याा ठिकाणी एक शिलालेख कोरलेला दिसतो त्यावरून या मंदिराची बांधणी ही पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या काळात झाल्याची जाणवते.
• पाण्याचे टाके :
मंदिराच्या बाजूस लागूनच एक भूमिगत कात्याळात खोदलेले एक पाण्याचे बांधिस्त टाके आहे. जे मंदिर बांधताना तसेच पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेले आहे. पावसाळ्यात साठलेले हे शुद्ध पाणी वर्षभर पाणीपुरवठा करण्याचे काम करते.
• महादरवाजा :
मंदिराच्या पुढेच एक महादरवाजा होता. त्याचे अवशेष फक्त शिल्लक असल्याचे पाहायला मिळतात. या ठिकाणाहून किल्यात प्रवेश मिळत असे.
• खाणकामाचे अवशेष व टेहळणी खोली :
महादरवाजामधून आत गेल्यास पश्चिम बाजूस एक अर्धवट पायरी उतारावर एक खोली दिसते. त्यामध्ये आतील बाजूस कमानाकृती छोट्या देवळ्या दिसतात. त्या खोलीत लागूनच एक कमानाकृती दरवाजा आहे. त्यातून खाली उतरून गेल्यावर आपल्याला कमानीखाली खोल्या आढळतात. या ठिकाणचे कठीण कात्याळी दगडी चिरे काढून काढून किल्याच्या तटाचे बांधकाम केल्याचे जाणवते व ते काढून झालेल्या या जागेत धान्यसाठा व रसद साठवण करण्यासाठी या जागेचा वापर केला जात असावा. हे जाणवते.
• चूना घाणी :
या ठिकाणाहून थोडे पुढे गेल्यावर आपणास एक चूना बनवण्याची घाणी पाहायला मिळते. जी दगडी बांधकाम पक्के करण्यासाठी लागणारा चूना निर्माण करण्यासाठी तयार केली गेली होती.
• नवीन महादरवाजा :
चूना निर्माण करण्याची घाणी जवळच एक खालील बाजूस कात्याळ खोदून तयार केलेला व थोडे काम अर्धवट असलेला एक महादरवाजा पाहायला मिळतो. कात्याळ खोदून पायरी मार्गाने उतरून या ठिकाणी जावे लागते. पुढे जाताना छिन्नी हातोडा वापरून बनवलेल्या नवीन महादरवाजाचे प्रवेशद्वार हे एक वैशिष्टपूर्ण नमूना आहे. अत्यंत अरुंद असा हा मार्ग बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात होते. या दरवाजाचे ठिकाण पाहता गोमुखी बांधणीची रचना करता येत नसल्याने याचे तोंड उत्तरेकडे केल्याचे दिसते.
* या दरवाजातून आत आल्यावर अरुंद कात्याळी मार्गात पूर्व दिशेकडे जाणारा खोदून केलेला त्याखाली जाणारा मार्ग दिसतो. जो पायऱ्या खोदत बनवला गेला आहे. पण पुढे अपूर्ण असा आहे. कारण हा बनवला जात असताना मुघल आक्रमण चालून आले. व त्यामुळे या ठिकाणचे काम अर्धवट अवस्थेत राहिले गेले. पण वरून कात्याळ खोदून कसे बांधकाम केले जाते याचा उत्तम नमुना पाहायला मिळतो.
- विस्तृत पठार :
महादरवाजाने पुढील अरुंद पायरी मार्गाने गडावर गेल्यास आपण पठारी भागात येतो. बाजूने उंच कडे असणारा हा भाग व वरील सपाट प्रदेश पाहिल्यावर गड चढण्याचे सार्थक होते.
• रामशेज किल्याची तटबंदी :
रामशेज किल्याची तटबंदी बांधताना अनेक घडीव दगड या किल्याच्या वरील भागातून काढले गेले. हल्ली बराच तटबंदी व इतर भाग ढासळला असून आता त्याचे अवशेष पहायला मिळतात.
• पाण्याच्या टाक्या :
तटबंदी तसेच इतर इमारती बांधकाम करताना लागणारे दगड काढण्यासाठी ज्या सखल भागात खुदाई केली गेली. त्या ठिकाणी अनेक पाण्याची टाकी तयार झालेली पाहायला मिळतात. जी किल्ल्यावरील लोकांच्या पाण्याची गरज पूर्ण करतात. यामध्ये साठलेले पाणी अत्यंत चांगले आहे. यातून दुहेरी उद्देश साध्य झाल्याचे दिसते.
• वायव्य दिशा चोर दरवाजा :
गडाच्या वायव्य दिशेला एक भूमिगत खुदाई करत निर्माण केलेला चोर दरवाजा आपणास पाहायला मिळतो. ज्याचा उपयोग संकटकाळी केला जात असे. विशेषतः रसद पुरवठा करण्यासाठी तसेच बाहेर संकटकाळात जाण्यासाठी, गुप्त संदेश पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जात असे. याची जडण घडण पहाता बाहेरील बाजूने हा दरवाजा कुठे आहे हे जराही लक्षात येत नाही. तसेच दरवाजा तटाच्या खालून दिसू नये अशी रचना होती.
• भवानी माता मंदिर :
किल्याच्या वरील भागात पठारावर एक छोटेसे मंदिर लागते. ते भवानी देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर त्रिशूल असून आतील बाजूस देवीची मूर्ती पाहायला मिळते.
• दुहेरी तटबंदी :
गडावर एके ठिकाणी आपणास दुहेरी तटबंदी पाहायला मिळते. जी किल्यास अधिक मजबूत करते.
• बुरुज :
या किल्यावर जागोजागी अनेक बुरुज सुरक्षेसाठी बांधले होते. पण काळाच्या ओघात ते ढासळलेत, लुप्त होत आहेत.
• चौक्या :
रामशेज किल्यावर जागोजागी वेगवेगळ्या दिशेने चौक्यांचे अवशेष पाहायला मिळतात. कारण किल्यावर प्रवेश करताना या ठिकाणी चौकशी होऊनच आत मध्ये प्रवेश मिळत असे
• किल्लेदार वाड्याचे अवशेष :
गडाच्या वरील भागात आपणास किल्लेदार वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. तसेच जागोजागी इतर इमारतींचे देखील अवशेष पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी किल्लेदार तसेच शिबंदी तील माणसे राहत होती.
• टेहळणी बुरूज :
किल्यावर आजूबाजूला निगराणी करण्यासाठी टेहळणी बुरुज असल्याचे पाहायला मिळतात अलीकडे त्यांची दुरवस्था जरी दिसत असली तरी त्यांची मोक्याची जागा व तेथून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश यावरून टेहळणी बुरूजाचे महत्त्व प्रतिबिंबित होते.
• ध्वजस्तंभ :
रामशेज किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम बाजूस असणाऱ्या पठारी भागात कड्यास लागून असलेल्या भागात आपणास एक ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. जो हिंदवी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून आजही उभा आहे.
• शिव गुहा मंदिर :
रामशेज किल्याच्या डोंगरी भागात एक गुहा आहे. पावसाळी दिवसात गुहेच्या छताच्या भागातून पाण्याची धार कोसळत असते. जी थेट शिवपिंडीवर पडताना पाहायला मिळते. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे.
• बालेकिल्ल्याच्या भागात अनेक भग्न वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी उभे राहून सभोवती टेहळणी केल्यास आपणास सातमाळा डोंगररांग, त्रिंबक डोंगररांग, भोरगड, रोहिडगड व आजूबाजूच्या डोंगराचे दर्शन घडते.
- रामशेज किल्ल्याच्या विषयी ऐतिहासिक माहिती :
• रामशेज या किल्यावर त्रेतायुगात प्रभू रामचंद्र यांचा रहिवास होता.
• या ठिकाणी हा किल्ला प्रथम कोणी बांधला याबाबत माहिती जास्त जरी मिळत नसली. तरीदेखील या ठिकाणी अनेक हिंदू राजांच्या राजवटींनी राज्य केले. यामध्ये सातवाहन, वाकाटक, चालुक्य, यादव यासारख्या राजवटी या परिसरात राज्य करत होत्या.
• मुस्लिम बहामनी व निजामशाही राजवटीच्या काळात हा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता.
• पुढे शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात दाखल करण्यात आला.
• छत्रपती संभाजी राज्यांच्या काळात या किल्ल्याने आपल्या अस्तित्वाची चुणूक इतिहासाला दाखवण्याचा पराक्रम केला
• छत्रपती शिवरायांच्या मृत्यू नंतर दक्षिणेतील हिंदवी स्वराज्य जिंकण्याच्या इच्छेने इसवी सन १६८२ साली मुघल बादशहा औरंगझेब दक्षिणेत दाखल झाला. तेव्हा त्याने आपला एक सरदार शहाबुद्दीन यास ४००००० सैन्य घेऊन रामशेज किल्ला घेण्यासाठी पाठवले. त्यावेळी गडावर मराठा मावळे ६०० च्या आसपास होते. त्यास वाटले आपण सहज किल्ला जिंकू पण या ठिकाणी असणारा धाडशी किल्लेदार हा अत्यंत जागरूक होता. मराठा विरांनी छापा मार युद्धतंत्राचा अवलंब केला. किल्ल्याजवळ मुघल सैन्य येताच त्यांवर दगड, धोंड्यांचा वर्षाव करून त्यांना मराठे जेरीस आणत. दगड मारण्यात पटाईत असणारे मराठा सैन्य कित्येक मुघल सैन्यांची डोकी फोडत असत. रात्रीच्या वेळी मुघल छावणीत घुसत व त्यांचे धान्य पळवणे, दारूगोळा पळवणे असे प्रताप करत. मुघलांनी तोफांचा मारा केला की तो किल्याच्या कात्याळी भागावर पडे, काहीवेळा लांबच पडे. तेव्हा मराठे लाकूड तसेच चामडे वापरून तोफा बनवत व मुघली छावण्यांवर तोफ गोळे डागत व भारी नुकसान करत. त्यांना सळो की पळो करत असतं. काही केल्या किल्ला ताब्यात येत नव्हता. व वरून मुघल बादशहा औरंगझेब याची विखारी पत्रे येत असत. शेवटी चिडून त्याने आजूबाजूच्या परिसरातील झाडे तोडून त्याचा उंच मचाण असलेला दमदमा तयार केला. व त्यावर तोफा चढवल्या व दुसऱ्या दिवशी किल्यावर तोफगोळे डागण्याचा मनसुबा घेऊन मुघल सैन्य गाफील राहिले. रात्रीचे मराठ्यांनी हल्ला करून दमदमा पेटवून दिला. व शहाबुद्दीन खानाचा बेत उधळून लावला. मराठ्यांनी वारंवार मुघलांच्या किल्ला ताब्यात घेण्याच्या योजनांना सुरुंग लावून खीळ घालण्याचा प्रयत्न केले.
• शहाबुद्दीन खानाला परत बोलावून मुघल बादशहाने आपला दुसरा लढवय्या सरदार फत्तेखानास रामशेज किल्ला जिंकण्यास पाठवले. तेव्हा त्याने २०,००० सैन्य घेऊन किल्यावर चढाई केली. तेव्हा किल्ल्यावरील मराठ्यांनी गोफण गुंड्याचा मारा केला. किल्ल्यावरून खाली येणाऱ्या दगडांनी बरेच मुघल सैन्य मारले जाऊ व जखमी होऊ लागले. मराठ्यांनी फत्तेखानाच्या फौजेस देखील जेरीस आणले. फत्तेखान तोफांचा मारा करी, पण बरेचशे तोफगोळे हे किल्ल्यापर्यंत पोहोचत नसतं. एखादा तोफगोळा किल्याच्या बुरुजावर आदळे. बुरुज ढासळला की फत्तेखान आनंदाने हसे. मात्र रात्रीच्या अंधारात मराठे संपूर्ण बुरुज पुन्हा बांधून काढत, यासाठी अपार कष्ट घेत. सकाळी उठून बुरुज सुस्थितीत पाहून फत्तेखान निराश होई. व त्याला वाटे की एका रात्रीत एवढा मोठा बुरुज बांधणे शक्य नाही. या मराठ्यांना जादूटोणा येत असेल. तेव्हाच ते हे अवघड काम करत असतील. बरेच महिने झाले किल्ला काही हाती येत नव्हता. बरेच मोगल सैन्य मारले जाऊ लागले. व दारूगोळा देखील वाया जात होता. शेवटी एका सरदाराने त्यास मराठे जादूटोणा करतात. तर आपण एक तांत्रिक बोलावून पाहू असे म्हणाला, सुरवातीस फत्तेखानाचा विश्वास बसला नाही. पण किल्ला ताब्यात कोणत्याही परिस्थितीत घ्यायचा या इराद्याने एका तंत्रिकास बोलावले. तांत्रिक म्हणाला, की त्याने बड्या बड्या भूत प्रेतांना कब्ज्यात घेतले. हे मराठे काय चीज आहेत. व त्याने त्यासाठी सोन्याचा नाग करून मागितला. त्याच्या मागणीनुसार फत्तेखानाने सोन्याचा नाग बनवून दिला. मंत्र तंत्र फुकत तो गडाकडे निघाला. फत्तेखान व त्याचे मुघल सैन्य त्या मांत्रिकाच्या मागून जाऊ लागले. किल्याचा पाठीमागून ते किल्ल्याजवळ येताच वरून एक गोफणीचा दगड वेगाने आला. व जोरात मांत्रिकाच्या छाताडावर बसला. मांत्रिक डोळे पांढरे करून एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नाग जाऊन पडला. व फत्ते खानाला पळता भुई थोडी झाली.
• पहिली व दुसरी योजना फसल्यावर फत्तेखानने नवीन योजना सुरू केली. त्याने किल्यावर तोफांचा मारा पुढील दरवाजाकडून सुरू केला. पण तोफेचा एकही गोळा दरवाजा पर्यंत पोहोचत नव्हता. मराठ्यांना गाफील ठेवून किल्याच्या मागील बाजूने काही मुघल सैन्य घेऊन किल्ला सर करायचा असे त्याने ठरवले. पण मराठे खूप चलाख होते. त्यांच्या गस्ती पथकाच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी इतर शिबंदीतील मावळ्यांना सावध केले. व वरून दगड गोटे भिरकावू लागले. कित्येक मुघल सैन्य घायाळ होऊन खाली कोसळले. तसेच पेटते तेल टाकलेले कापडी बोळे मराठ्यांनी टाकून अनेक मोघल सैन्यांना भाजून काढले. हा मारा सहन न झाल्याने मुघलांनी माघार घेतली.
• फत्तेखानाच्या फजीती नंतर कासिमखानाला रामशेज किल्ला घेण्यासाठी पाठवले. त्याने संपूर्ण नाकेबंदी केली. कडक पहारा ठेवून अन्नधान्य व अन्य रसद पुरवठा खंडित केला. किल्ल्यावरील रसद संपत आली. छत्रपती संभाजी राजे यांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांच्याद्वारे रसद पुरवठा करण्यासाठी जबाबदारी दिली. पण कडक बंदोबस्तामुळे ते अशक्य होते. किल्यावरील मराठ्यांची उपासमार होऊ लागली. एके रात्री जोराचा पाऊस झाला अन् चिखल झाला. तेव्हा वेढा सैल पडला. त्यावेळी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांनी किल्यावर रसद पोहचवली. दुसऱ्या दिवशी मराठे ताज्या दमाने प्रतिक्रिया करण्यास किल्यावर तयार होते. अशा तर्हेने कासिमखान ही किल्ला जिंकू शकला नाही.
• रामशेज किल्ल्याच्या त्या काळातील किल्लेदाराबाबत इतिहासकारांचे वेगवेगळे मत आहे. काही मते रामशेजचे किल्लेदार हे सूर्याजी जेधे होते, काहिमते गोविंद गायकवाड, तर काही म्हणतात की रंभाजी पवार हे त्याकाळी किल्लेदार होते.
• हा किल्ला सलग सहावर्षे मराठ्यांनी अजिंक्य ठेवला.
• या किल्लेदाराचा चिलखत पोशाख , रत्नजडित कडे व नगद देवून सत्कार छत्रपती संभाजी महाराज यांनी केला
• यानंतर दुसरा किल्लेदार या किल्यावर ठेवला गेला. तेव्हा किल्ल्यावरील रसद संपल्यावर किल्लेदाराने तह करून किल्ला मोघलांच्या ताब्यात दिला. तेव्हा छत्रपती संभाजीराजे नाराज झाले.
• औरंगजेब बादशहाने या किल्याची डागडुजी करून दारूगोळा व धान्यकोठार भरले. व तोफा ही ठेवल्या. व किल्याची मजबुती करून रहिमगड नाव ठेवले. काही दिवसांनी मराठ्यांनी पुन्हा चढाई करून अवघ्या ३०० मावळ्यांनी हा किल्ला परत घेतला.
• यानंतर ब्रिटिश कारकिर्दीपर्यंत हा किल्ला स्वराज्यात राहिला. पुढे ब्रिटीश अंमलाखाली गेला.
• सध्या रामशेज किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• ही आहे रामशेज किल्याची माहिती
Ramshej Fort information in marathi