शनिवार वाडा (पुणे) माहिती
स्थान :
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक राजधानी पुणे येथे वाहणाऱ्या मुठा नदीच्या थोड्या बाजूला हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रतिनिधी पेशवे यांच्या राहण्यासाठी तसेच राज्यकारभारासाठी हा महालरुपी भव्यवाडा उभारला गेला. हा महाल उभारण्याचे श्रेय पहिला बाजीराव पेशवा याकडे जाते.
• शनिवार वाडा पहायला जायचे कसे?
पुणे हे महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र असून ते भारतातील सर्व शहरांना रस्ते, लोहमार्ग तसेच हवाई मार्गान जोडले गेले आहे. त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू आहे.
• पुणे शहरातील शनिवार पेठेत हा वाडा बांधलेला आपणास पाहायला मिळतो. या वाड्यामुळेच या ठिकाणास शनिवारवाडा हे नाव पडले आहे.
• पुणे शहरातील स्वारगेट पासून हा ३.५ किलोमीटर अंतरावर आहे.
• हा वाडा पाहण्यासाठी पर्यटकांना २५ रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागते. व हा पाहण्यासाठी आपणास सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत परवानगी मिळते.
• शनिवार वाड्यात पाहण्यासारखी ठिकाणे :
• पुणे शहरातून फिरत आपण जेव्हा शनिवार पेठेत येतो तेव्हा आपणास एक भव्य वाडा दिसतो. तो आहे शनिवारवाडा.
• ध्वज व लढावू पेशवे पहिला बाजीराव यांचा पुतळा :
शनिवार वाड्याच्या बाहेरील बाजूस आपणास मराठा साम्राज्याच्या इतिहासात पराक्रम गाजवणाऱ्या लढावू बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घडते. त्यासमोर आपणास ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. या स्तंभावर स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज दिमाखात फडफडताना पाहता येतो.
• तटबंदी :
शनिवारवाडा हा इसवी सनाच्या १८ वय शतकात बांधला गेला असल्याने तो अलीकडच्या काळातील आहे. याच्या सभोवताली सहा मीटर म्हणजे २१ फूट उंच व २८९ मीटर म्हणजे ९५०फूट लांबीची भिंत बांधली गेली आहे. ही भिंत बांधताना वाड्याच्या सुरक्षेची काळजी वाटू लागल्याने नानासाहेब पेशवे यांनी प्रथम मराठा साम्राज्याचे तत्कालीन छत्रपती शाहू महाराज यांची परवानगी घेतली. व नंतर भिंत बांधली.
• भिंत बांधत असताना पायात दगडाचा वापर केला व त्यावर पक्क्या भाजीविटांचा वापर केल्याचे दिसून येते.
• बुरुज :
वाड्याच्या सभोवती भक्कम असे बुरुज बांधले आहेत. ते एकूण नऊ बुरुज आहेत. या बुरुजावरुन टेहळणी तसेच संकटकाळी तोफांचा मारा देखील करता येत असे.
• दिल्ली दरवाजा :
शनिवार वाड्याच्या उत्तर बाजूस एक भव्य असा दरवाजा आहे. त्यास दिल्ली दरवाजा असे म्हंटले जाते. कमानाकृती चौकटीस भव्य दरवाजे बसवलेले आहेत. या दरवाजावर लोखंडी पट्टी मारलेली असून त्यावर लोखंडी टोकदार खिळे मारलेले आहेत. शत्रूने हल्ला केल्यावर अजस्त्र हत्तींच्या पासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची रचना केल्याचे दिसते. हा दरवाजा २१ फूट उंच व १४ फूट रुंदीचा आहे. दिल्ली जिंकण्याची ईच्छा तत्कालीन पेशव्यांच्या मनात होती म्हणून या दरवाजास दिल्ली दरवाजा असे नाव दिले गेले आहे. या दरवाजाची उंची इतकी आहे की एखादा हत्ती यातून अंबारीसह सहज जाईल. मोहिमेवर जाताना हा दरवाजा संपूर्ण उघडला जात असे. अन्य वेळी याच्या खालील बाजूस असणाऱ्या छोट्या दरवाजातून ये-जा होत असे.
![]() |
खिडकी दरवाजा |
• अशाप्रकारे वाड्याला आणखी चार दरवाजे पाहायला मिळतात. मात्र दिल्ली दरवाजा हा सर्वात मोठा दरवाजा म्हणजेच वाड्याचा महादरवाजा आहे. इतर दरवाजांना गणेश दरवाजा, खिडकी दरवाजा, नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा व मस्तानी किंवा अलिबहद्दुर दरवाजा अशी नावे दिली आहेत.
![]() |
नारायण दरवाजा |
• यातील वाड्याच्या एका दरवाजातून स्वर्गीय नारायण पेशवे यांचे शव नेले होते. म्हणून त्यास नारायण दरवाजा असे नाव देखील आहे.
• नगारखाना :
दिल्ली दरवाजातून आतमध्ये आल्यावर आपणास डाव्या बाजूला एक वर जाताना मार्ग पाहायला मिळतो. त्या पायरी मार्गाने वर चढून गेल्यावर आपणास उजवीकडील मार्ग हा तटावर जाणारा तर डावीकडील मार्ग हा नगारखाण्याकडे जाणारा पाहायला मिळतो.
त्या मार्गाने वरती गेल्यावर आपणास विस्तृत अशाप्रकारचे सुंदर कलाकुसर केलेले पेशवेकालीन लाकडी बांधकाम पाहायला मिळते. हा आहे नगारखाना. जो एकमेव पेशव्यांच्या वैभवाच्या खाणाखुणा आजही सांगतो. इसवी सन १८२८ साली लागलेल्या भीषण आगीत शनिवार वाड्याला लागलेल्या आगीत अनेक वास्तू भस्मसात झाल्या. फक्त ती आग नगारखान्याकडे पोहोचू न शकल्याने नगारखाना वाचला.
नगारखाना पहिला की शनिवार वाड्यातील तत्कालीन इतर वास्तूंची कल्पना येते. नगारखाण्यात उभे राहिल्यावर आपल्याला बाहेरील बाजूला पाहिल्यास आपणास पेशवे लढावू बाजीराव यांचा पुतळा दिसतो. त्याचबरोबर राष्ट्रध्वजाचे दर्शन घडते. तर दुसरीकडे पाहता आतील बाजूला असणारे वास्तू अवशेष व उद्यानाचे दर्शन घडते. व समोर आपणास सुरेख खांबांनी बनवलेला भव्य असा नगारखाना पाहता येतो.
• तटबंदी वरून जाताना आपणास जागोजागी बुरुज लागतात. त्यावरून पुण्याचे सुरेख दर्शन घडते.
• गणेश रंगमहाल (दिवाणखाना):
शनिवार वाड्यात इसवी सन १७५५ साली गणेश रंगमहाल पेशवे नानासाहेब यांनी बांधून घेतला. गणेशोस्तवात या ठिकाणी गणेश स्थापना केली जात असे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या सभामंडपात एका वेळी शंभर नर्तक नृत्य करू शकत असत. महालाच्या एका बाजूला सुंदर गणेशमूर्ती होती. पेशव्यांची गणपती देवतेवर खूप श्रध्दा होती. ते गणपतीची पूजा करत असत.
रंगमहालास दिवाणखाना म्हणूनही ओळखले जाते.
• चिमण बाग :
गणेश रंगमहालासमोर सुंदर असा बगिचा पाहायला मिळतो. ती आहे चिमणबाग या बागेत सुंदर फुलझाडे आहेत. त्यांचा सुगंध दरवळत असतो. व त्याचबरोबर सुरेख कारंजे आहेत. आठ तोटी असणाऱ्या कारंजा मुळे ही बाग खुलून दिसते. व पहात रहावे असे वाटते.
• हजारी व पुष्करणी कारंजाची निर्मिती ही सवाई माधवराव यांच्या मनोरंजनासाठी केली गेली होती. त्यामुळे शनिवार वाड्याचे सौंदर्य खुलून दिसते.
• गणेश रंगमहालातून कारंजात पडून सातवे पेशवे सवाई माधवराव यांचा मृत्यु झाला होता.
• विहीर :
कारंजा शेजारी आपणास सुंदर चौकोनी बांधीव कठडा असणारी बारव (विहीर) पाहायला मिळते.
• पेशवे निवास अवशेष :
या ठिकाणी आपणास पेशवे माधवराव, रघुनाथराव, सदाशिवराव यांची निवासस्थाने होती. त्याचे महाल अवशेष देखील पाहायला मिळतात. या ठिकाणी असणाऱ्या इमारती या सात मजली होत्या. इसवी सन १८२८ साली लागलेल्या भयंकर आगीत त्या नष्ट झाल्या.
• दुधई महाल :
मराठेशाहीतील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या बंधूंची पत्नी गोदाबाई यांसाठी एक महाल पेशवे थोरले बाजीराव यांनी बांधला. त्या महालाच्या निवासस्थानाचे अवशेष, स्नानगृहाचे अवशेष, राहण्याच्या खोल्यांचे अवशेष, तळघराचे अवशेष, पाहायला मिळतात. तसेच या परिसरात असणाऱ्या विहिरी नष्ट होत चालल्या आहेत. त्यांचे अवशेष देखील पहायला मिळतात.
• नारायण दरवाजा :
शनिवारवाड्यात घडलेली अत्यंत वाईट घटना म्हणजे गृहकलह या गृहकलहातून पेशवे नारायणराव यांची हत्या झाली. त्यांचा मृत्यू झाल्यावर ज्या दरवाजातून त्यांना नेले गेले त्या दरवाजास नारायण दरवाजा असे म्हणतात.
• मोघली चित्रशैली :
शनिवार वाड्यातील भिंतीवर आपणास सुरेख चित्रे काढलेली पाहायला मिळतात. यामध्ये गणपती, शेषनागावर विश्रांती घेत पहुडलेले विष्णू भगवान, तसेच महाभारतकालीन युद्ध प्रसंग पाहायला मिळतात. सध्या या चित्रांची दुरावस्था होत चाललेली दिसून येते.
• शनिवार वाड्यात त्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. तेव्हा गणेश दरवाजातून जमीनीमार्गे कात्रजच्या तलावातील पाणी आणण्याची योजना आमलात आणली होती. त्यासाठी आतमध्ये साठवणी हौद बांधला होता.
• शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक घडामोडी :
• इसवी सन १० जानेवारी १७३० साली पेशव्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाड्याची पायाभरणी केली.
• २२ जानेवारी १७३२ साली शनिवारवाड्याचे काम पूर्ण झाले. त्यादिवशी व पायाभरणी दिवशी शनिवार असल्याने वाड्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले. शनिवार वाड्याच्या बांधकामास त्याकाळी १६१२० रुपये खर्च आला.
• इसवी सन १७५५ साली नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या आतील भागात गणेश रंगमहाल बांधला. तसेच बाहेरील तटबंदीचे बांधकामही केले गेले.
• शनिवार वाड्यात पेशवे बाजीराव थोरले, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे, तसेच इतर पेशव्यांनी या ठिकाणाहून संपूर्ण मराठा साम्राज्याचे कामकाज पाहिले. अनेक वेळा मोहिमेवर येथूनच मराठा लष्कर गेले आहे.
• माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर ते निपुत्रिक असल्याने त्यांचे बंधू नारायणराव यांना पेशवे पद दिले गेले. पण त्यांना दिलेले पेशवे पद त्यांची चुलती आनंदी बाई यांना आवडले नाही. व त्यांनी व त्यांचे पती रघुनाथराव पेशवे यांनी कारस्थान करून भर वाड्यात नारायणराव यांचा गारद्यांकरवी खून केला.
• आजही अनेक लोक या ठिकाणी रात्रीचे नारायणराव पेशव्यांचा आवाज ऐकू येतो. ‘काका मला वाचवा' असे काही लोक म्हणतात. पण काही लोक या गोष्टीकडे मिथके म्हणून पाहतात.
• त्यानंतर मराठे शाहीतल्या बारा अधिकाऱ्यांनी एकत्र येवून बारभाईचे कारस्थान केले. व नारायणराव पेशव्यांची पत्नी गरोदर होती. तिला मुलगा झाला. त्याला पेशव्यांच्या गादिवर वयाच्या ४० व्या दिवशी बसवून कारभार नाना फडणीस यांद्वारे चालवला.
• रघुनाथराव पेशवे इंग्रजांच्या आश्रयाला गेले. व त्यांची मदत घेऊन त्यांनी मराठा साम्राज्यास आव्हान दिले. त्यातून तीन इंग्रज मराठा युद्धे झाली. यामध्ये मराठेशाहीचे नुकसान झाले.
• १७ नोव्हेंबर १८१७ साली गृहकलहाचा फायदा घेत ब्रिटिशांनी शनिवारवाड्यावर विजय मिळवत मराठ्यांचा पराभव करत पेशव्यांची सत्ता संपुष्टात आणली.
• पुढे ब्रिटिश काळात पुण्याचा कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्टसन या ठिकाणी राहत होता. तसेच पोलिस निवासस्थान व तुरुंग म्हणून देखील ब्रिटिशकाळात वापर या वाड्याचा केला गेला.
• इसवी सन १८२८ साली या वाड्यात आग लागली. त्यामुळे येथील नगारखाना सोडून इतर सर्व इमारतींचे नुकसान झाले. व शनिवार वाड्याचे वैभव लयास गेले.
• पूढे ९० वर्षे ही वास्तू दुरावस्थेत होती.
• इसवी सन १९१९ साली ब्रिटिश शासनाने या वाड्यास राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
• इसवी सन १९२३ पर्यंत या ठिकाणी कोर्टासाठी ब्रिटिश काळात वापरली जाणारी वास्तू उत्खननासाठी पाडली गेली.
• १९ मार्च १९२४ साली लॉर्ड ईज पूल ( शिवाजी पुल सध्याचा) बांधणाऱ्या केंजळ्यांनी शनिवार वाड्यात मारुती मंदिर बांधले.
• पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. सध्या शनिवार वाडा हा भारत सरकारच्या ताब्यात असून त्याची देखरेख पुणे महानगरपालिका करते.
• अशी आहे शनिवारवाड्याची माहिती.