विजयदुर्ग उर्फ घेरिया किल्ला माहिती व इतिहास मराठी
![]() |
विजयदुर्ग उर्फ घेरीया किल्ला माहिती व इतिहास Vijaydurg Fort information in marathi |
भारत देशातील पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील समुद्रात उभा असणार व मध्ययुगीन इतिहासात आपल्या अजिंक्य अशा विजयाची व अस्तित्वाची ओळख करून देणारा, तसेच शत्रू सैन्याला घेरी आणणारा किल्ला, मध्ययुगीन आरमारी सत्तेचे केंद्र म्हणजे विजयदुर्ग किल्ला होय.
विजयदुर्ग किल्ल्याचे स्थान :
भारतातील पश्चिमेस असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील समुद्रात असणारा जलदुर्ग विजयदुर्ग किल्ला होय.
उंची :
हा किल्ला समुद्रात असल्याने हा जलदुर्ग किल्ला आहे. याची समुद्र सपाटी पासून उंची १०० मीटर असून उंच खडकावर हा किल्ला उभा आहे.
• खडकावरून तटबंदीची उंची ही ३६ मीटर आहे.
• विजयदुर्ग किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असून एका बाजूने जमिनीस जोडला गेला आहे.
• विजयदुर्ग या किल्याचा अवार पहाता १७ एकर क्षेत्रावर व्यापलेला हा किल्ला आहे.
पाहण्यासारखी स्थळे व त्यांची माहिती :
• विजयदुर्ग हा किल्ला घेरिया या नावाने देखील ओळखला जातो. हा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. म्हणून घेरलेला आहे म्हणून घेरीया हे नाव त्यास दिले गेले.
• पडकोट खुश्क :
विजयदुर्ग पाहताना आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा एक अरुंद अशी तटबंदी व तेथून एक मार्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी आहे. याच्या पुढील बाजूस वाघोटन खाडी आहे. व या खाडीच्या बाजूने काढलेला एक मार्ग पहायला मिळतो. तो म्हणजे पडकोत खुश्क असे म्हंटले जाते.
• लाकडी पूल :
विजयदुर्ग किल्यावर प्रवेश करण्यासाठी एक जुना लाकडी पूल होता. त्या पुलावरून किल्याच्या आतमध्ये प्रवेश केला जात असे. रोज सायंकाळी व संकटकाळी हा पूल साखळीने उचलला जात असे. व किल्ला भुभागापासून वेगळा होत असे.
• बलभीम मंदिर :
विजयदुर्ग किल्यामध्ये पुढे आल्यावर आपणास एक छोटेसे मंदिर लागते. या मंदिराच्या वरील कळस रचना मशिदींवरील घुमटासारखी आहे. आतमध्ये काळया पाषाणात हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. ती सध्या शेंदरी रंगात रंगवलेली पाहायला मिळते. शत्रचा हल्ला जरी झाला तरी इमारतीची नासधूस होऊ नये. म्हणून मशिदी सारखी रचना केली होती.
• जिबीचा दरवाजा :
विजयदुर्ग किल्यावर प्रवेश करताना प्रथम एक दरवाजा लागतो. त्यास जिबीचा दरवाजा असे म्हणतात. कारण तो सुरवातीला असतो. व शत्रू सैन्य पहिल्यांदा याच दरवाजावर हल्ला चढवतात. तेव्हा हा भक्कम दरवाजा उभा केला जातो.
• विजयदुर्ग किल्ल्याचे बांधकाम करतेवेळी त्यावरील बांधकामात दगडामध्ये खोबणी करून त्यात दुसरा दगड अडकवून बांधकाम केल्याचे पाहायला मिळते. या बांधकाम पद्धतीस हेमाडपंथी बांधणी असे म्हणतात. तसेच हे दगड जोडताना गुळ, चुनखडी, हिर्ड्याची पाने, राळ, काथ्या याचा वापर केला गेला आहे.
• कान्होजी आंग्रे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी बरीचशी माणसे बाहेर गेल्याचे पाहताच पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेण्यासाठी वॉल्टर वूडला पाठवले. त्याने तोफांचा मारा केला. पण ते तोफगोळे एखाद्या कापसाच्या बोळ्याप्रमाणे तटावर आपटले. व खाली पडले. यावरून त्या काळातील बांधकामाचे वैशिष्ट्ये दिसून येते.
• वॉल्टर वूडच्या हल्यावर मराठी कवी माधव यांनी एक सुरेख काव्य लिहिले आहे.
“ पाणियातल्या षंड जनांचे बंड पावले लया, विजयवंत गाजला चहुकडे विजयदुर्ग घेरीया.”
पाश्चात्य कवी डग्लस याने ‘ विजयदुर्ग वर डागलेले तोफेचे गोळे हे कापसाच्या गोळ्याप्रमाणे चिकटून खाली पडले.’
यावरून विजयदुर्ग किल्याची तटबंदी किती मजबूत आहे हे समजते.
• विजयदुर्ग किल्ला तटबंदी :
विजयदुर्ग किल्यास तिहेरी तटबंदी आहे. पहिली समुद्री किनाऱ्यास लागून असणारी त्यानंतर आतील बाजूस दुसरी तटबंदी त्यानंतर किल्याच्या आतील बाजूस असणारी तिसरी भक्कम तटबंदी.
तटबंदीची उंची ही ३६ मीटर असून भक्कम अशा जांभ्या म्हणजेच ल्याटेराईट दगडात बांधलेली. तसेच हेमाडपंथी बांधणीची गूळ, चुनखडी, हिर्डीचा पाला, काथ्या, राळ यांचे मिश्रण वापरून बनवलेली भक्कम अशी तिहेरी तटबंदी असणारा हा विजयदुर्ग किल्ला आहे.
• जंग्या :
किल्याच्या तटबंदीस अनेक जंग्या आहेत. शत्रूला न दिसता त्याला बंदुकीने किंवा बाणाने वेध घेण्यासाठी अनेक जंग्या जागोजागी दिसतात.
• फांजी :
फांजी म्हणजे तोफा लोड करून उडवण्यासाठी तटाच्या अधून मधून बनवलेली खोबणी होय. विजयदुर्ग किल्यावरील फांज्या डब्बल तोफा लोड करून उडवता येतील अशा होत्या.
• मराठी इतिहास निरीक्षक दांडेकर किल्याच्या तटबंदी विषयी बोलताना म्हणतात, “ किल्याची तटबंदी आपण फक्त न पाहता तिचे निरीक्षण करा, ती आपल्याला एक बहुमोल असा संदेश देते, ती सांगते, आम्ही जसे ऊन, वारा,पाऊस तसेच शत्रूचे तोफगोळे झेलत उभा आहोत. न डगमगता, तसेच तुम्ही देखील जीवनातील संकटाना न घाबरता त्यास सामोरे जायला शिका.’
• विजयदुर्ग किल्याच्या तटबंदीस बाहेरील २० व आतील बाजूस असणारे ७ असे मिळून २७ बुरुज पाहायला मिळतात.
• मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा :
तटबंदी पहात आतील बाजूस आल्यावर विजयदुर्ग किल्याचा मुख्य दरवाजा लागतो. दरवाजा म्हणजे किल्याचे महत्वाचे प्रवेश स्थान, तो गोमुख बांधणीचा आहे. गोमुख म्हणजे गाय वासराला व आपले अंग चाटताना तोंड वळवते. ती वक्र आकार ठेवणं. म्हणजे बुरुजाच्या आतमध्ये लपलेला दरवाजा, हा आतील बाजूस असल्याने यावर तोफगोळा मारून उडवणे अवघड असते. तसेच अजस्त्र हत्ती ,घोडे यांच्या मदतीने वेगवान हल्ला या दरवाजावर करता येत नसे. इतकेच नाही तर या दरवाजाच्या बुरुजात व तटबंदीमध्ये जंग्या आहेत. त्यामधून दरवाजावर चाल करून येणाऱ्या सैन्यावर बंदूक, व बाणांचा वापर करून निशाणा साधता येतो.
या दरवाजाच्या दारांवर लोखंडी खिळे बसवलेले दिसतात. यावरून या दरवाजाची भक्कमता लक्षात येते.
• नगारखाना :
मुख्य दरवाजाच्या वरील बाजूस बांधकाम पाहायला मिळते. त्या ठिकाणी नगारखाना होता. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी धून वाजवली जायची. लग्न असेल तर वेगळी, मृत्यु झाल्यावर वेगळी, जन्म झाल्यावर वेगळी, राजे आल्यावर वेगळी, शत्रू हल्ला करण्यास आल्यावर वेगळी धून वाजवली जात असे.
• सरळ तोफ :
नगारखान्यापासून जरासे पुढे गेल्यावर आपल्याला सरळ तोफ पाहायला मिळते. फांजी मध्ये तोफ ठेवून किल्यावर चालून आलेल्या शत्रूचा वेध घेता येत असे.
• खलबतखाना/ गुप्त वार्ता खोली :
स्वराज्यात तीनच किल्याच्या ठिकाणी आपणास खलबतखाने पाहायला मिळतात. एक राजगड, दुसरा रायगड अन् तिसरा विजयदुर्ग किल्यावर. खलबत खाण्याचा वापर हा महत्त्वाची गुप्त मोहीम, व माहितीवर चर्चा करण्यासाठी वापर होत असे. या खोलीतून एक चकार ध्वनी बाहेरील बाजूस ऐकू जात नसे. अशी या खोलीची रचना होती.
विजयदुर्ग हे महत्वाचे स्वराज्याचे आरमारी केंद्र होते. म्हणून या ठिकाणी खलबतखाना पाहायला मिळतो.
• पायरी मार्ग रचना :
थोडे पुढे गेल्यावर आपणास दगडी पायरी जिने पाहायला मिळतात. मराठे हे डोंगर दर्यात राहणारे त्यामुळे त्यांना उंच सखल वाटांनी जाणे सोपे जात असे. मात्र एखाद्या शत्रूने जर का किल्ला जिंकला तर त्याला याचा वापर करणे अवघड जावे यासाठी अशी रचना केलेली दिसते.
• बाहेरील अरुंद मार्ग :
तटाच्या आतील बाजूने व तटबंदीस लागून एक छोटासा मार्ग सभोवताली किल्याच्या गेलेला दिसतो. तो संकटकाळी घोड्यानी वेगाने हालचाल करत किल्याच्या सर्व बाजूने असलेल्या तोफांना दारूगोळा पुरवण्यासाठी बनवला गेला होता.
• टेहळणी बुरूज :
विजयदुर्ग किल्यावर टेहळणी करण्यासाठी जागोजागी बुरुज पाहायला मिळतात. यावरून संपूर्ण खाडी तसेच दूरवर् असणाऱ्या समुद्रावर निगराणी करता येत असे.
• दारूगोळा कोठार :
विजयदुर्ग किल्यावर संपूर्ण दगडामध्ये बांधली गेलेली खोली पाहायला मिळते. ते आहे दारूगोळा कोठार. याची संपूर्ण बांधणी ही दगडात असून याचे छप्पर देखील दगडात बांधले गेले आहे. किल्यावर हल्ला करताना शत्रू प्रथम दारूगोळा कोठार उध्वस्त करतो. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने बांधणी दिसून येते.
• फड व सदर :
आतील बाजूस किल्याच्या एक वास्तू आपणास पाहायला मिळते ती दुमजली वास्तू होती. याचे दोन भाग पाहायला मिळतात. एक फड व दुसरी सदर.
• फड :
किल्याबाहेरून आलेली व्यक्ती चौकीवरून आत आल्यावर सदरेवर जाण्याआधी इथे फडावर थांबत असे. या ठिकाणी त्याची सखोल चौकशी केली जात असे. मगच तो आतील सदरेवर जाऊ शकत असे. फडामध्ये कारकून, चिटणीस, वगैरे अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या जागा असत, तेथून कागदपत्रांचे कामकाज चालत असे. तर आतील सदरेवर सरदार, राजेरजवाडे, यांच्या बैठका होत असत.
• सदर :
फडाच्या आतील बाजूस सदर होती. या ठिकाणी छत्रपती शिवराय, सरदार, किल्लेदार तसेच येथील कामकाज सांभाळणारे यांच्या कामाचा लेखाजोखा पाहिला जाई, तसेच परिसरातील समस्या त्यावरील उपाय, किल्ल्यावरील धान्य साठा, व इतर खर्च यावर देखील चर्चा होत असे. सदर म्हणजे राज्यकारभार पाहण्याची जागा होय.
• विजयदुर्ग किल्याच्या आतील घरे :
किल्याच्या आतील घरे ही दगड, विटा , मातीची बनवलेली असत. बाहेरील तटबंदी व इतर बांधकामाच्या मानाने आतील बांधकामावर जास्त रक्कम खर्च केली जात नसे. योग्य ठिकाणी खर्च व योग्य ठिकाणी काटकसर हे शिवरायांच्या आर्थिक व्यवहाराचे गमक होते. म्हणूनच छत्रपती शिवराय यांना मॅनेजमेंट गुरू असे आधुनिक विचारवंत म्हणतात.
• धान्य कोठारे :
विजयदुर्ग किल्यावरील दारूगोळा कोठारा प्रमाणे धान्य कोठाराची वास्तू देखील दगडी चिरेबंदी स्वरूपाची पाहायला मिळते. अशी एकूण तीन कोठारे विजयदुर्ग किल्यावर आहेत. किल्ल्यावरील लोकांना तीन तीन वर्षे पुरेल इतका धान्यसाठा या कोठरांच्या माध्यमातून साठवला जात असे. शत्रूने किल्ल्यास वेढा दिला व रसद तुटली तरी किल्ल्यावरील कामकाज चालू राहतं असे.
• भुयारी मार्ग :
धान्य कोठारा जवळच एक भुयारी मार्ग आहे. या ठिकाणाहून लगेच खाडीच्या पाण्याजवळ जाता येत असे. धान्य किल्यावर तसेच रसद पोहोच करण्यासाठी याचा वापर केला जात असे. इतकेच नाही तर या भूयाराच्या तोंडाला एक मोठा दगड सुद्धा आहे. प्रतिकूल काळी हे बंद देखील करता येत असे. व त्याची रचना अशी केली होती की समुद्रातून ते दिसुही शकत नव्हते.
व आतील बाजूस प्रकाश व हवा संचार करण्यासाठी चौकोनी छिद्रे देखील ठेवलेली दिसतात. ज्याने आतील वातावरण चांगले आरोग्यदायी राहील याची काळजी घेतलेली दिसते.
• बुरुज :
विजयदुर्ग किल्यावरील बुरुजांची बांधणी करताना उंच व सखल अशी दोन्ही प्रकारची दिसते. उंच जागेवरून टेहळणी करता येत असे. व सखल भागातील बुरुजाचा भाग युद्धकाळात उपयोगी पडत असे.
• खुबलढा बुरुज :
विजयदुर्ग किल्याची सुरक्षा ठेवण्यासाठी नालाकृती वळणाचा असा चिलखती बुरूज आपणास पाहायला मिळतो. याचे वैशिष्ट्ये म्हणजे या ठिकाणी पुष्कळ जंग्या व तोफा ठेवण्यासाठी सहा फांज्या आहेत प्रत्येक फांजित दोन तोफा अशा बारा तोफा इथे बसू शकतात. त्या बुरुजाच्या माऱ्याच्या टप्यात खाडीचा प्रदेश, भुयारी मार्गाच्या मुखाचा भाग, तसेच मुख्य दरवाजाकडून हल्ला झाल्यास तेथील भाग देखील माराच्या टप्यात येतो. सर्व बाजूंनी सुरक्षा करण्यासाठी तत्पर असा हा बुरुज आहे. म्हणून यास खुबलढा बुरूज असे म्हणतात.
• पागा :
विजयदुर्ग किल्यावरील् बाहेरील बाजूस एक पागा आपल्याला पाहायला मिळते. बाहेरून एखादा सरदार व मावळे आले. तर त्यांना सदरेकडे जाण्यासाठी उपयुक्त अशा जागी ही पागा आहे. म्हणजे आतील भागात ना जाता. या ठिकाणी घोडा बांधून ते चौकी वरून सदरेकडे जाऊ शकत होते. त्यामुळे किल्याच्या आतील बाकीच्या ठिकाणास संबंध येत नसल्याने किल्याचे गुपित व अन्य ठिकाणची माहिती कोणालाही कळात नसे.
• राणीवसा :
विजयदुर्ग किल्यावर तटबंदीस लागून एक इमारत आहे. ती तिनमजली असून तो राणीवसा आहे. आतील लाकडी वस्तू नष्ट झाल्या असल्या तरी या ठिकाणी असणाऱ्या भिंती त्याची भव्यता सांगतात. तसेच या ठिकाणी अनेक हावेदार झरोक्यांच्या खिडक्या पाहायला मिळतात. हे बांधकाम बहामनी राजवटीत वा आदिलशाही शैलीतील जाणवते. कारण याची रचना मुस्लिम स्त्रियांना अनुकूल अशी आहे. या इमारतीच्या पुढे काही अंतरावर दुसरा राणीवसा पाहायला मिळतो. त्या पुढील बाजूस भक्कम तटबंदी व त्यामधे अनेक जंग्या पाहायला मिळतात.
हौद :
शिवकाळात कान्होजी अंग्रे यांच्या निवासस्थानापासी एक पाण्याचा हौद बांधलेला होता. ज्यामध्ये पावसाचे पाणी साठवले जात असे. पण जेव्हा किल्यावर हल्ला झाला तेव्हा या हौदाचे लॉक काढून टाकले. व तो रिकामा झाला. त्यामध्ये आत उतरण्यासाठी पायऱ्या सुध्दा आहेत.
• पिराची सदर उर्फ दर्गा :
स्वराज्यासाठी लढणारे मुस्लिम मावळे त्यांना त्यांच्या धर्माची उपासना करण्यासाठी म्हणजेच नमाज पठण करण्यासाठी विजयदुर्ग किल्यावर आपणास एक पिराची सदर म्हणजेच दर्गा पाहायला मिळतो.
• भोजकालीन तटबंदी :
किल्याच्या आतील भागाचे बांधकाम हे शिलाहार राजा भोजाच्या कारकिर्दीतील असल्याचे पाहायला मिळते. त्या काळातील तटबंदी आपणास पाहायला मिळते. हेमाडपंथी बांधणीची ही तटबंदी वैशिष्ट्य पूर्ण आहे. नर व मादी दगड वापरून बनवलेली ही तटबंदी आजही मजबूत आहे. आज हिला जवळ जवळ ८०० वर्ष झाले असतील.
• निशाण टेकडी :
निशाण टेकडी म्हणजे ध्वजस्तंभाची जागा. छत्रपती शिवरायांनी जर का कुठे ध्वज फडकवला असेल. तर एक तोरणा किल्ला व दुसरा विजयदुर्ग किल्यावर. ती ध्वज फडकवलेली जागा म्हणजे निशाण टेकडी होय.
• भुयारी मार्ग २ :
किल्याच्या तटबंदी जवळून एक गुप्तमार्ग जमिनीखालून थेट किनाऱ्यावरील काही अंतरावर असणाऱ्या अण्णाजी धुळप यांच्या वाड्यात खुला होतो. असे सांगितले जाते. हा इतका मोठा आहे की. यातून एक मावळा घोड्यावर बसून तसेच स्त्रिया मेण्यात बसून जात असत. संकटकाळी किल्ला जरी शत्रूच्या ताब्यात गेला तरी या मार्गाने सुरक्षित बाहेर स्त्रिया तसेच मावळ्यांना बाहेर जाता यावे यासाठी हा मार्ग बनवला गेला होता.
• शिवराय माणसे जपत असत. किल्ला गेला तरी पुन्हा घेता येईल. पण स्वराज्यातील एक मावळा महत्वाचा असा त्यांचा दंडक होता. म्हणून शिवराय वेळप्रसंगी मावळ्यांना माघार घेण्यास सांगत.
• भवानी मंदिर :
विजयदुर्ग किल्यावर एका ठिकाणी आपणास भग्न अवशेषामध्ये एक वास्तू अन् भवानी देवीची मूर्ती पाहायला मिळते. ते आहे भवानी देवीचे मंदिर. महिषासुरमर्दिनी स्वरूपात आपणाला भवानीदेवीची मूर्ती पाहायला मिळते.
• साहेबाचे ओटे किंवा हेलियमचे पाळणाघर :
इसवी सन १८१८ साली इंगर्जांकडे किल्ला आल्यावर ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सर्वे या भागात केला. तेव्हा त्यांना विजयदुर्ग किल्याचा हा उंच भाग खगोल संशोधनासाठी योग्य वाटला. याठिकाणी उभा राहून १८ ऑगस्ट १८६८ रोजी दुर्बिणीने सूर्यग्रहण पहात असताना नोर्मन लोकियर यांना ग्रहणावेळी एक पिवळसर डायमंड रिंग दिसली. त्यावर संशोधन सुरू झाले. पुढील सूर्य ग्रहणावेळी १८९८ सालीनोर्मण लॉकीयर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर तसेच त्यांचे सहकारी. यांनी गुंटूर या ठिकाणाहून दुर्बिणीने सूर्यग्रहण पाहिले असता ग्रहनावेळी आठ मिनिटांनी एक डायमंड रिंग पिवळ्या रंगात दिसू लागली. त्यावर संशोधन केले असता ती हेलियम या वायूची असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा या घटनेचा शोध विजयदुर्ग किल्यावर ज्या ठिकाणी लागला. त्या ठिकाणास हेलियमचे पाळणाघर, साहेबांचे ओटे असे म्हणतात.
• बागडी तोफ :
धातूच्या एकसमान अकराच्या रिंगा एकमेकींना जोडून बनवल्या गेलेल्या तोफेस बागडी तोफ असे म्हणतात.
दारू गोळा ठासून यामध्ये लोड केला जातो. व पाठीमागून बत्ती पेटवली असता मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होऊन तोफेचा गोळा स्पिन होत वेगाने पुढे जातो. व मोठ्या प्रमाणात आघात करतो.नुकसान करतो.
शिलाहार राजा भोज कालीन धान्य कोठी :
इसवी सनाच्या १० व्या ते अकराव्या शतकात भोज राजाच्या कारकिर्दीत या किल्याचे बांधकाम झाले. तेव्हा या ठिकाणी एक धान्य कोठार बांधले गेले. याच्या वरील बांधकाम नंतरच्या काळातील असून पायाकडील बांधकाम हे शिलाहार राजा भोज याच्या काळातील आहे.
• चूना बनवण्याची घाणी :
किल्याचे बांधकाम करण्यासाठी लागणारा चूना बनवण्यासाठी या ठिकाणी एक घाणी देखील बनवली होती.
• विहीर :
किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी या ठिकाणी एक विहीर देखील खोदली होती.
• समुद्री भिंत :
शिवरायांच्या काळात विजयदुर्ग किल्यापासून काही अंतरावर एक समुद्रात भिंत ल्याटेराईट दगडात बांधली गेली आहे. ती १२२ मीटर लांब, ५ मीटर उंच अन् ७ मीटर रुंदीची आहे. स्वराज्याची आरमारी जहाजे ही उथळ व सपाट तळ असणारी असल्याने ती ही भिंत सहज पार करत असत. मात्र पोर्तुगीज वा पाश्चात्य जहाजे ही खोल बुडाची असल्याने ती या भिंतीच्या ठिकाणावरून जाताना घर्षण होऊन फुटत असत. असा प्रकारे हल्ला करण्यास आलेली पोर्तुगिजांची तीन जहाजे पाण्यात बुडाली होती. अतिशय दूरदृष्टी ठेवून व विचारपूर्वक शिवरायांनी या किल्याची व याच्या सुरक्षेची रचना केली होती.
• डमी फोर्ट :
• विजयदुर्ग किल्ल्यावरून आपणास समोरील एका डोंगरावर एक भिंत बांधलेली दिसते. ती शत्रूला फसवणेसाठी बांधली गेली होती.त्या भिंतीस किल्ला समजून शत्रू तोफा उडवून हल्ला करेल. व यामध्ये त्याचा दारूगोळा वाया जाईल या उद्देशाने ती डोंगरावर एक भिंत उभारली गेली आहे.
• मराठ्यांची जहाज बांधणी गोदी :
विजयदुर्ग किल्याजवळी खाडी जवळील
डोंगरात डोंगर पोखरून एक गोदी तयार केली गेली होती. या ठिकाणी गुराब, गलबत, तराफ, अशाप्रकारची जहाजे बांधली जात. ४०० ते ५०० टन क्षमता असणारी ही जहाजे १०९ मीटर लांब व ७० मीटर रुंदीची असत. येथे जहाज बांधणी व दुरुस्ती केली जात असे.
ऐकीकडून निसर्ग निर्मित तासिव कडा तर दुसरीकडे बांधलेली अशी ही गोदी आहे. काही ठिकाणी दगडी बांधकाम पाहायला मिळते. या परिसरात मध्ययुगिन काळात बनवलेले दगडी नांगर देखील सापडले आहेत.
• विजयदुर्ग किल्याविषयी ऐतिहासिक घडामोडी :
• विजयदुर्ग किल्ल्याचे प्रथम बांधकाम शिलाहार राजा भोज याच्या कारकीर्दीत केले गेले. इसवी सन११९३ ते इसवी सन १२०५ दरम्यान झाले.
• शिलाहार राजवटी नंतर या ठिकाणी १२१८ पर्यंत देवगिरीच्या यादवांची सत्ता होती.
• इसवी सन १३५४ मध्ये विजयनगरच्या राजा कृष्णदेवराय याची सत्ता काहीकाळ येथे होती.
• त्यानंतर हा किल्ला बहामनी राजवटीत होता.
• बहामनी काळानंतर आदिलशहाकडे हा किल्ला आला.
• विजयदुर्ग पाण्याने वेढलेला होता म्हणून त्यास घेरीया हे नाव पडले गेले.
• इसवी सन १६५० ला ट्याव्हेरियन या व्यक्तीने इथे भेट दिली त्याने याचे वर्णन ‘विजापूरकरांचा अभेद्य किल्ला’
असे केले आहे.
• इसवी सन १६६४ साली ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान छत्रपती शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
ज्यावेळी हा किल्ला जिंकला. तेव्हा विजय नावाचे संवत्सर चालू होते म्हणून या किल्याचे नाव घेरीया बदलून विजयदुर्ग ठेवले गेले.
• मराठी आरमार दलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे, त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, यांच्या ताब्यात इसवी सन १७५६ पर्यंत हा किल्ला होता.
• इसवी सनाच्या १७०० ते १७०७ या काळात आपत्कालीन राजधानी म्हणून विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्याचा वापर महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र दुसरा शिवाजी यास गादीवर बसवून येथून राज्यकारभार केला.
• येथून पुढे हा किल्ला आंग्रे सरदारांच्या ताब्यात राहिला. कान्होजी आंग्रे यांना सरखेल ही पदवी देवून मराठी आरमाराची जबाबदारी महाराणी ताराबाईंनी सोपवली.
• दोन मराठा गादी सत्तेच्या वादात. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १३ फेब्रुवारी १७५६ साली विजयदुर्ग किल्यावर हल्ला केला. व दोन्ही सैन्य दलांशी लढताना किल्ला शत्रूच्या ताब्यात जात असताना आँग्रे यांनी दग्ध भू धोरण स्वीकारले. व या किल्याचा पाडावं झाला. किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. येथील १० लाखाचा खजिना, २५० तोफा लुटून इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतल्या.
• नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांना बाणकोट किल्ला व सात गावे देवून हा किल्ला ताब्यात घेतला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ,
• जवळ जवळ आठ महिन्यांनी विजयदुर्ग किल्ला इंग्रजांनी पेशव्यांना दिला.
• पेशव्यांनी विजयदुर्ग किल्ला व परिसराची सुभेदारी आनंदराव धुळप यांच्याकडे दिली.
• इसवी सन १६६४ ते १८१८ सालापर्यंत हा किल्ला मराठी अंमलाखाली होता.
• इसवी सन १८१८ साली हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
• ब्रिटिश या विजयदुर्ग किल्यास पूर्वेचा जिब्राल्टर असे म्हणत.
• इसवी सन १८ ऑगस्ट १८६८ साली या ठिकाणी हेलियम वायूचा शोध सूर्य ग्रहणावेळी पाहताना नॉर्मन लोकियर यांना लागला.
• १३ डिसेंबर १९१६ साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून विजयदुर्ग किल्याची नोंद केली गेली.
• विजयदुर्ग हा किल्ला सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.
• मराठ्यांचे दग्ध भू धोरण :
ज्यावेळी एखाद्या ठिकाणची सत्ता शत्रूच्या ताब्यात जात असते. त्यावेळी ऐतिहासिक महत्वाचे दस्त ऐवज तसेच महत्वाची मालमत्ता शत्रूच्या हाती लागू नये म्हणून ती आग लावून नष्ट करणे म्हणजे दग्धभू धोरण होय.
मराठी युद्ध जहाजे शत्रू इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून आंग्र्यानी ती जाळून टाकली. तसेच त्यासंबंधी असणारी कागदपत्रं देखील जाळून टाकली.
• विजयदुर्ग किल्यावर मराठी राजवटी काळात चार सरदारांनी सत्ता केली. त्यामधे कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, आनंदराव धुळप.
यापैकी संभाजी आंग्रे हे शिवभक्त, ते पायी कुणकेश्वर दर्शनास ४० किलोमीटर जात असत. पुढे वय झाल्यावर त्यानां जाणे जमेना तेव्हा महादेवाने स्वप्नात येऊनन सांगितले. की विजयदुर्ग किल्ल्यावरून दागलेले दोन तोफगोळे एकाच जागी जेव्हा पडतील. त्या ठिकाणी माझा वास असेल. तसे केल्यावर ज्या ठिकाणी ते दोन तोफगोळे पडले त्या ठिकाणी शिवमंदिर संभाजी आंग्रे यांनी बांधण्यास सुरुवात केली. पुढे त्या मंदिराचे बांधकाम गंगाधर पंत यांनी केले. व आनंदराव धुळप यांनी या ठिकाणी पोर्तुगीज जहाजावरील मिळालेली पिवळी घंटा बांधली आहे.
• विजयदुर्ग किल्यावर जाण्यासाठी मार्ग :
• विजयदुर्ग किल्यावर जाण्यासाठी रस्ते, हवाई, जलमार्ग :
• मुंबई – राजापूर – हटीवले – मार्गे विजयदुर्ग.
• कोल्हापूर – राधानगरी – फोंडा – देवगड – विजयदुर्ग.
• रत्नागिरी – पावस – कसेळी - नाटे – विजयदुर्ग.
• मुंबई पासून विजयदुर्ग हे अंतर ४४० किलोमीटर आहे.
• पणजी ते विजयदुर्ग अंतर १८० किलोमीटर आहे.
• कसर्डे ह्या ठिकाणाहून विजयदुर्ग अंतर ६० किलोमीटर आहे
• राजापूर हे ६३ किलोमीटर तर कणकवली हे ठिकाण ८० किलोमीटर अंतरावर आहे. ही रेल्वे स्थानके आहेत. तेथून विजयदुर्ग ला बस किंवा खाजगी वाहनाने जाता येते.
• कोल्हापूर हे विमानतळ जवळील विमानतळ असून ते ईथून १५० किलोमीटर अंतरावर आहे.
• विजयदुर्ग हा सागरी किल्ला असल्याने गोवा तसेच मुंबई व इतर भारताच्या पश्चिम बंदरातून या ठिकाणी आपणास जाता येते.
विजयदुर्ग किल्यावर
• ही आहे पूर्वेच जिब्राल्टर म्हणून ओळख असलेल्या विजयदुर्ग उर्फ घेरीया किल्याची माहिती व इतिहास.
• Vijaydurg Fort information in marathi