तोरणा किल्ला
Torna Fort information in marathi
स्वराज्याचे प्रथम तोरण बांधले तव दारी
स्वराज्याचा प्रथम शिलेदार ही उपाधी लावायची झाली तर ती फक्त ‘किल्ले तोरण्याला'
![]() |
तोरणा किल्ला Torna Fort information in marathi |
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटातल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावाजवळ सह्याद्री पर्वत रांगेत हा वसलेला गिरिदुर्ग किल्ला आहे.
उंची :
याची सरासरी उंची १४०३ मीटर/ ४६०३ फूट आहे.
भौगोलिक दृष्ट्या स्थान:
महाराष्ट्रातील पुणे शहराच्या नैऋत्येला ५१ किलोमीटर अंतरावर वेल्हे गावाजवळ हा किल्ला असून याच्या उत्तरेला कानद नदीचे खोरे वसले आहे. पश्चिम बाजूला कानद खिंड, पूर्वेला खरीव खिंड, दक्षिण बाजूस वेळखंड नदी व यांच्या मधोमध किल्ले तोरणा वसलेला आहे.
तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
१) पुणे - सातारा रोड वरील नसरापूर गावापासून आत ६८ कि.मी. वेल्हे या ठिकाणी येऊन तिथून पायी चालत तोरणा गडावर जाता येते.
२) पुण्याहून पानशेतमार्गे वेल्हे व तिथून तोरणा.
३) पुण्याहून खानापूर मार्गे वेल्हे व तेथून तोरणा.
वेल्हे गावात आल्यावर दोन मार्गे गडावर जाता येते.
१) वेल्हे गावातून वेग्रे आळीतून एक रान वाट तोरणा किल्ल्यावर जाते. इथे जाताना एक अवघड चढण असलेली पायवाट लागते. या वाटेने जाताना एका बाजूला खोल दरी आहे. संरक्षणासाठी पुरातत्व खात्याने लोखंडी सळीचे आधार-वे तयार केला आहे. त्या वाटेने बिनी दरवाजा मार्गे तोरणा किल्ल्यावर जाता येते.
२) वेल्हे गावापासून चार – पाच किमी अंतरावर भट्टी नावाचे गाव आहे. तिथून रान वाटेने कोकण दरवाजा (पश्चिम दरवाजा) मार्गे गडावर जाता येते. जवळ जवळ तीन तास गड चढण्यास लागतात.
तोरणा किल्ला माहिती,Torna Fort information in marathi
तोरणा किल्यास तोरणा हे नाव कसे पडले?
• शिवरायांनी प्रथम हा किल्ला जिंकला व स्वराज्याचे मंगल तोरण बांधले. म्हणून यास तोरणा हे नाव पडले असावे.
• या किल्ल्याच्या परिसरात तोरण या रानमेवा जातीची बरीच झाडे पाहायला मिळतात म्हणून तोरणा हे नाव पडले असावे.
• या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे. व त्या देवीच्या नावावरून या किल्ल्यास तोरणा हे नाव पडले असावे.
असे तीन मतप्रवाह पाहायला मिळतात.
तोरणा किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणे :
बिनी दरवाजा, तोरणजाई मंदिर, महादरवाजा, कोकण दरवाजा, मेंगाई देवी मंदिर, बुधला माची, झुंजार माची, खोकड टाके, तोरणेश्वर महादेव मंदिर, चोर दरवाजा.
बिनी दरवाजा :
वेल्ह्याहून रानवाटेने वर चढून आल्यावर आपल्याला एक छोटासा दरवाजा लागतो. त्याचे नाव बिनी दरवाजा आहे. तेथून वर पायऱ्यांची ही वाट गडावरील मोठ्या दरवाजाकडे घेऊन जाते.
महादरवाजा किल्ले तोरणा :
इतर किल्ल्याप्रमाणे याही गडाचा महादरवाजा हा अत्यंत मोठा आहे. व कोणताही चुना व सिमेंट न वापरता फक्त दगडांच्या खाचेत खाच बसवून एकसंध असा हा दरवाजा काळया पाषाणात बांधलेला आहे. याच्या दरवाजावर संरक्षक टोकदार खीळे मारले आहेत. ज्याने शत्रू हल्ला करताना दरवाजावर आघात करताना तो जखमी होऊ शकेल.
या दरवाजाची बांधणी गोमुख पद्धतीची आहे.
या दरवाजातून आत आल्यावर आत पहारेकर्यांना विश्रांती घेण्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत. थोड्या अंतरावर उजव्या बाजूच्या भिंतीत दगडी पायऱ्या आहेत. ज्याचा वापर करून आपण दरवाजाच्या वरील बाजूस जाऊ व उतरू शकतो. तसेच टेहळणी करू शकतो.
तोरणजाई मंदिर :
महा दरवाजातून आत आल्यावर डावीकडे थोड्याच अंतरावर देवी तोरणजाईचे मंदिर आहे. काळया पाषाणात बनवलेली ही मूर्ती खूप सुरेख आहे. तसेच अन्य देवतांच्या मुर्त्या ही येथे पहायला मिळतात.
याच ठिकाणी छत्रपती शिवराय यांना सोन्याची नाणी व दागिने असणारे धनाचे हांडे सापडले. ज्याचा उपयोग मुरुंबदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची पहिली राजधानी बांधण्यासाठी झाला.
खोकड टाके :
तोरणजाई मंदिरापासून पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक छोटे बांधलेले पाण्याचे टाके लागते. त्याला खोकड टाके म्हणतात. याचा उपयोग गडावरील पाण्याची गरज भागवणेसाठी केला जात असे.
मेंगाईदेवी मंदिर :
खोकड टाक्यापासून पुढे आल्यावर इथे आपल्याला मेंगाईदेवी मंदिर लागते. हे एक राहण्यायोग्य ठिकाण आहे. दुर्गप्रेमी गड पाहायला आल्यावर या ठिकाणी वस्ती करतात. विश्रांती घेतात.
तोरणेश्वर महादेव :
मेंगाई देवी मंदिराच्या समोरच एक शिव मंदिर आहे. बाहेर नंदी व आत महादेवाची पिंड पाहायला मिळते. या मंदिराबाहेर पुढील बाजूस दगडात कोरलेली शिल्पे पाहायला मिळतात. त्यांना स्मृती शिळा असे म्हणतात.
कोकण दरवाजा :
तोरणेश्वराचे दर्शन घेतल्यावर थोड चढून गेल्यावर आपल्याला एक दरवाजा किल्ल्याच्या वरील भागास लागतो. तो आहे कोकण दरवाजा आजही हा सुस्थितीत असा आहे. तिहेरी खोबणीची चौकट असणारा, याच्या बाजूची तटबंदी थोडी पडलेली होती. ती पुरातत्व खात्याने दुरुस्त केली आहे. शिवकालीन बांधकाम व सध्याचे बांधकाम यातील फरक इथे जाणवतो. या दरवाजा पासूनच आपल्याला बुधला माचीकडे जाता येते. कल्पकतेचा वापर करून बळकट अशी या किल्ल्याच्या या दरवाजांची बांधणी केलेली पाहायला मिळते. आज ही याचा दरवाजा सुस्थितीत आहे. याच्या आतील बाजूस बांधीव वास्तूचे रुप पाहायला मिळते. व शिवकालीन बांधकामाचे उत्कृष्ट उदाहरण हा दरवाजा आहे.
बुधला माची :
जर का सिंहगड हा सिंहाची गुहा असेल. तर तोरणा हा गरुडाचे घरटे आहे.'
कोकण दरवाजातून बाहेर पडल्यावर एक पायवाट आपल्याला बुधला माचीवर घेऊन जाते. पुरातत्व विभागाने इथे जाण्यासाठी सुरक्षित अशी दोन्ही बाजूंनी लोखंडी रॉडचा आधार- वे बनवला आहे. तेथून पुढे गेल्यावर आपल्याला तेलाच्या बुदलीच्या आकाराचा बेलाग सुळका लागतो. तिचं आहे बुधला माची. भक्कम तटबंदी असणारी अशी ही बुधला माची, इथे पाण्याचे टाके पाहायला मिळते. या माचीच्या परिसरात खालील बाजूस बऱ्याच वेळा काही मूर्तींचे अवशेष पहायला मिळतात. इथे संशोधन व्हावे असे अनेक तज्ञ इतिहासकार म्हणतात. त्यामुळे आणखी माहिती उजेडात येऊ शकेल. या माचीला जोडून डोंगराची एक सोंड थेट राजगडाच्या संजीवनी माचीकडे जाते. या दोन किल्ल्यांना जोडण्याचे ती काम करते.
या माची खाली कारवी, निवडुंग व बांबूचे जंगल आहे. इथे जास्त प्रमाणात कारवीची झुडपे आहेत. यात औषधी गुणधर्म आहेत.
झुंजार बुरुज व झुंजार माची :
Torna Fort information in marathi
कोकण दरवाजा झुंजार माची व बुधला माची या दोन्हीकडे जाणारा दरवाजा आहे. या दरवाजा पासून आपण झुंजार बुरुजाकडे गेल्यावर तेथून सह्यगिरी पर्वताचे सुंदर दर्शन घडते. इथून लोखंडी शिडी ने खाली उतरावे लागते. अत्यंत खडा चढ जपून उतरावा लागतो. तिथून पुढे पाय वाटेने एक भुयारी दरवाजा लागतो. त्या दरवाजातून पुढे गेल्यावर बळकट अशा तटबंदीचे बांधकाम असणारी, व खोल दर्यानी वेढलेली झुंजार माची लागते. इथे पाण्याची छोटी टाकी खोदलेली दिसतात.
तसेच इथे माचीच्या बांधकामात छोटे भुयारी मार्ग व लहान दरवाजे अढळतात. येथून चोर दरवाजे ही आहेत. खोल दरीस लागून असलेल्या या दरवाजाने काटक मावळे हे संकट समयी ये जा करत असत.
अशीही झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे.
• माची ही संदेश वहनाचे काम करत असे. एखादी सूचना दुसऱ्या किल्ल्यास देताना माचीच्या बुरुजावर जाळ केला जाई. व संदेश पाठवला जात असे. दुसऱ्या किल्ल्यावरून तो संदेश ओळखला जात असे.
तोरणा किल्याचा बालेकिल्ला :
तोरणा किल्ला
किल्याचा बालेकिल्ला वरील भागात आहे. इथे काही बांधकाम केलेले दिसते. एखाद्यावेळी राहण्यासाठी खोल्या बांधल्या असाव्यात.
इथे स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवला जात असे. व संकट समई शेवटाची सुरक्षित जागा म्हणजे बालेकिल्ला
तसेच या किल्ल्यावर हनुमान बुरुज, साफेली बुरुज, भेळ बुरुज, असे बुरुज ही पाहायला मिळतात. तसेच बळकट तटबंदी व त्यास लागून छोटीशी वाट आपणास दुर्ग दर्शनास मदत करते.
• या किल्ल्याचा अजस्त्र विस्तार पाहून छत्रपती शिवरायांनी याचे नाव प्रचंडगड असे ठेवले.
• जेम्स डग्लस या पाश्चात्य निरिक्षक आपले मत तोरण्याबाबत त्याच्या उंची बाबत असे व्यक्त करतो की,
‘ जर का सिंहगड हा सिंहाची गुहा असेल. तर तोरणा हा गरुडाचे घरटे आहे.'
पुणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे.
तोरणा किल्ल्यावरील घडलेल्या इतिहासबद्दल थोडक्यात माहिती:
• किल्ला प्रथम कोणत्या राजवटीत बांधला गेला. याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला. तरी प्रथम इथे शिव उपासक राहत होते. त्या काळात म्हणजे इसवी सनच्या १२ व्या ते १३ व्या शतकात इथे काही शैव लेण्या बांधल्या गेल्या होत्या.
• इसवी सन१४७० ते ८६ या कालखंडात बहामनी वजीर मलिक अंबरने हा किल्ला ताब्यात घेतला.
• बहमनी सत्तेचे विघटन झाल्यावर हा त्यापासून निर्माण शाही निजामशाहीच्या ताब्यात गेला.
• छत्रपती शिवरायांनी प्रथम वयाच्या १९ व्या वर्षी म्हणजे इसवी सन १६४७ साली प्रथम जिंकला. व स्वराज्याचे तोरण बांधले. या किल्ल्यावर त्यांना सोन्याच्या मोहरांचे व दागिन्यांचे हांडे सापडले. त्याचा उपयोग स्वराज्याची प्रथम राजधानी निर्माण करण्यासाठी वापर केला गेला.
• पुढे या किल्ल्याची डागडुजी व बांधकाम करण्यासाठी ५००० होण इतका खर्च छत्रपती शिवराय यांनी केला.
• छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी हा किल्ला जिंकून घेतला.
• त्यानंतरच्या काळात स्वराज्याचे सचिव श्री शंकर नारायण यांनी हा परत जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला.
• सन १७०४ साली बादशहा औरंगजेब याने लढाई करून हा किल्ला पुन्हा जिंकला. मराठ्यांचा लढाई करून मुघलांनी जिंकलेला हा एकमेव किल्ला आहे. हा जिंकल्यावर औरंगजेब बादशहाने याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे देवी विजय असे ठेवले.
• मराठ्यांचे सरनोबत नागोजी कोकाटे यांनी पुन्हा हा किल्ला जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. तेथून पुढे तो कायम स्वरुपी स्वराज्यातच राहिला.
असा थोडक्यात तोरणा किल्ल्याचा इतिहास आहे.
स्वराज्याचे प्रथम तोरण ज्यावर बांधले गेले. व मराठा मावळ्यांना स्वराज्य निर्मितीच्या प्रयत्नात यश मिळवून देवून आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या गडकोटास मानाचा मुजरा.
"तोरणा किल्ला Torna Fort information in marathi"
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l