सज्जनगड किल्ला माहिती व इतिहास मराठी
Sajjangad Fort information and Histry in marathi
![]() |
सज्जनगड किल्ला माहिती व इतिहास मराठी |
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पश्चिम बाजूस घाटमाथ्यावरील जिल्हा सातारा या जिल्ह्यातील सातारा शहरापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने व निवासाने पवित्र पावन भूमी म्हणून या किल्ल्यास वेगळे धार्मिक स्थान म्हणून मान्यता आहे.
• सज्जनगड किल्ल्यास इतर कोणत्या नावाने ओळखले जाते : अश्वलायन ऋषींच्या वास्तव्यामुळे अश्वलायनगड म्हणून देखील ओळखले जाते. तसेच परळी गावावरून परळीगड, अस्वल नावाच्या प्राण्यांचा पुर्वी वावर होता म्हणून अस्वलगड, नवरसतारा अशी नावे सज्जनगडाला आहेत.
• सज्जनगड उंची , परीघ अन् पायऱ्या : सज्जनगड किल्याची सरासरी समुद्रसपाटीपासून उंची ही ३३५० फूट /३१८ मीटर उंच आहे.
• गडाचा परीघ हा १६६८ मीटर तर गडाला ७५० पायऱ्या आहेत.
• सज्जनगड पायथा उंची ही १००० फूट आहे.
• सज्जनगड हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस सह्याद्री पर्वताची पसरलेली उपरांग शंभुमहादेव या डोंगर रांगेच्या तीन उप फाट्यापैकी उरमोडी नदीच्या खोऱ्यात उरमोडी धरणाजवळील उंच डोंगरात हा किल्ला वसलेला आहे.
• सज्जनगडाचा आकार हा शंकूच्या आकाराचा असून त्याच्या उत्तरेला महाबळेश्वर, प्रतापगड रायगड किल्ले,दक्षिणेस कळंब, पश्चिमेस रत्नगिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण शहर ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा किल्ला, पूर्वेस काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे.
• सज्जनगडावर जाण्यासाठी मार्ग :
• मुंबई – पुणे – सातारा – सज्जनगड
• कोल्हापूर – कराड – सातारा – सज्जनगड.
• कोकणातील पोलादपूर – आंबेनळी घाटातून महाबळेश्वर- सातारा – सज्जनगड.
• सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथून बसेस सज्जनगडला जातात.
• सातारा ते सज्जनगड हे अंतर १० ते १२ किलोमिटर आहे.
• सज्जनगडावर जाण्याचे पायथ्यापासूनचे मार्ग
१) सातारा ते परळी गाव १० k.m. तेथून पायरी मार्गाने गडावर जाता येते.
२) सातारा – परळी रोड वरील गजवाडी पासून कातळ कडा – तेथून पायरी मार्गाने सज्जनगडावर जाता येते.
• सज्जनगडावर पाहण्यासारखी ठिकाणे :
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडाला सज्जनगड असे नामाभिधान मिळाले, परळी गावातून जेव्हा आपण पायरी मार्गाने गड चढू लागल्यावर आपणास वाटेवर अकरा मारुतीच्या छोट्या मुर्त्यांचे वाटेच्या पायरीमार्गाच्या बाजूने दर्शन घडते. समर्थ रामदास स्वामींनी अकरा मारुतींची स्थापना केली होती. त्यांची ती प्रतीके आहेत.
• मारुती मंदिर :
पायरी मार्गाने चढून जात असताना वाटेत एक छोटेसे मारुतीचे मंदिर लागते. त्याच्या समोरील बाजूस कामधेनू मंदिर आहे. यामध्ये गोमाता आपल्या वासराला दूध पाजतानाची शिल्परुपी मूर्ती आपणास पाहायला मिळते.
• छत्रपती शिवराय महाद्वार :
पायरी मार्गाने गडावर जाताना आपणास प्रथम एक प्रवेशद्वार लागते. त्याचे नाव छत्रपती शिवराय महाद्वार आहे. अत्यंत भक्कम अशा बुरूजास लागून असणारा हा दरवाजा भगव्या रंगात रंगवला असून याचा नवीन बसवलेला दरवाजा देखील सुरेख आहे. याच्या दरवाजावर लोखंडी खिळे मारलेले आहेत. तसेच सुरेख कलाकुसर देखील पाहायला मिळते.
• समर्थ दरवाजा :
पहिल्या दरवाजातून पुन्हा पायरी मार्गाने पुढे चढून गेल्यावर आपणास दुसरा दरवाजा लागतो. हा भक्कम दरवाजा अत्यंत भव्य आहे. याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधलेल्या आहेत. तसेच याची बांधणी व वरील घुमट पाहून आदिलशाही राजवटीकालीन बांधकाम शैलीची ओळख होते.
• या ठिकाणी एक फारशी भाषेत शिलालेख आढळतो. त्याखाली मराठी भाषेत त्याचा अनुवाद लिहिला गेला आहे.तो खालीलप्रमाणे
‘ ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.
तू विवंचना दूर करण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस.
तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात.
परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाजाचा पाया तीन जनदिलाखर या तारखेला तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले.'
• घोडाळे तलाव :
समर्थ दरवाजातून पायरी मार्गाने पुढे गेल्यावर आपणास एक तलाव लागतो. या तलावाचे पाणी शेवाळलेले दिसते. याच्या सभोवताली असणाऱ्या तटबंदीचे बांधकाम पडझड झाली आहे. या तलावातील पाण्याचा वापर गडावरील घोड्यांना पाणी पाजणेसाठी तसेच धुण्यासाठी केला जात होता. म्हणून त्यास घोडाळे तलाव असे म्हणतात, हल्ली याचे पाणी कपडे धुण्यासाठी स्थानिक लोक वापरतात.
• घोडळे तलाव पाहून पुढे गेल्यावर आपणास लोकमान्य टिळक स्मृती कमान लागते.
• उपहारगृह व धर्मशाळा इमारत :
कमानीतून पुढे गेल्यावर आपणास उपहारगृह तसेच धर्मशाळा अन् भक्त निवास लागते. या ठिकाणी आपणास मोफत राहण्याची व जेवणाची सोय होते.
• सोनाळे तळे :
भक्त निवासा जवळच आपणास एक तळे लागते. त्याचे नाव सोनाळे तळे असून, किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी ते काम करते.
• श्रीधर कुटी :
सोनाळे तलावाशेजारी आपणास एक इमारत पाहायला मिळते. ती समर्थ रामदास शिष्या श्रीधर स्वामींचे वास्तव्य तिथे होते. त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी व त्यांचा शिष्य श्रीधर याच्या पादुका पाहायला मिळतात.
• समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर :
सज्जनगडावर रामदासस्वामीचे वास्तव्य होते. त्यांनी दासबोध, व मनाचे श्लोक लिहिले. आपल्या कार्यातून हिंदू धर्म व वैदिक संस्कृती विचार सर्वत्र पसरवले. शके १६०३ साली माघ नवमीस स्वामींनी समाधी घेतली. त्या समाधीवर राममूर्ती ठेवून मंदिर बांधले होते. तेच हे मंदिर मंदिरात रामदासस्वामी समाधी, भव्य असे सभामंडप, मंडपात हनुमंत मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता यांची पंचधातूची मूर्ती, रामदासस्वामी मूर्ती, भुयारात समर्थ रामदास स्वामींची समाधी, समाधी मागे एक पितळी पेटी, दत्त पादुका, बाहेरील बाजूस समर्थ शिष्या वेण्णा हीचे वृंदावन पाहायला मिळते.या मंदिराचा व समाधीचा जीर्णोद्धार छत्रपती संभाजीराजे यांच्या आज्ञेने रामचंद्रपंत अमात्य यांनी केला.
• समर्थ मठ :
समाधी पासून जवळच थोड्या अंतरावर आपणास समर्थ मठ पाहायला मिळतो. या वास्तूचा जीर्णोद्धार केला आहे. या ठिकाणी आपणास आतील बाजूस शेजघर असणारी खोली पाहायला मिळते. त्या ठिकाणी एक पलंग असून तंजावर मठाचे मेरू स्वामी यांनी समर्थ रामदास स्वामींचे काढलेलं चित्र, रामदासस्वामीनी वापरलेल्या वस्तू गुप्ती,दांडा,सोटा,कुबडी, पिकदानी, बदामी अकाराचा पानडब्बा,पाण्याचे दोन हांडे, तांब्या, स्वामींची वल्कले, वेताची काठी, मारुती मूर्ती, लांब तलवार, अशा धार्मिक व रामदासस्वामीच्या जीवनातील वस्तू पाहायला मिळतात तसेच दासबोध ग्रंथ ही पाहायला मिळतो.
• ब्रह्मपिसा :
समर्थ मठापासून पश्चिम बाजूस एका ओट्यावर शेंदूर फासलेले गोटे पाहायला मिळतात. त्यांना ब्रम्हपिसा असे म्हणतात.
• धाब्याचा मारुती :
सज्जनगडाच्या पश्चिम टोकास एक मंदिर पाहायला मिळते. ते धाब्याचा मारुतीचे मंदिर आहे. मंदिरात आतील बाजूस आपणास हनुमंत मूर्ती पाहायला मिळते. या मारुतीची स्थापना समर्थ रामदासस्वामी यांनी केली.
• पुरातन वास्तू / मशीद :
किल्याच्या एका बाजूला एक पुरातन बहामनी काळातील एक जीर्ण दुरावस्थतेत असलेली वास्तू आपणास पाहायला मिळते. तिची घुमट आकाराची रचना पाहून ती एक मशीद असल्याचे जाणवते.
• रामघळ :
गाय मंदिर, तसेच मारुती मंदिरापासून कड्याच्या कडे कडेन चालत गेल्यावर जवळ जवळ १०० मीटर अंतर चालून गेल्यावर एक गुहा लागते. तिला रामघळ असे म्हणतात. या ठिकाणी स्वामी रामदास तसेच त्यांचे शिष्य तप साधना करण्यासाठी जात असतं. अत्यंत शांत व एकांतवास येथे लाभतो.
• वीरगळ :
सज्जनगडवर अनेक स्वाऱ्या आल्या. तेव्हा तेथील किल्लेदाराने तसेच तेथील सैन्यानी आलेल्या हल्याला समर्थपणे तोंड दिले. त्यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱी वीरगळ आपणास या ठिकाणी पाहायला मिळते.
• अंगलाई मंदिर :
समर्थ रामदास स्वामी अंगापुर येथील कृष्णा नदीच्या डोहात स्नान करण्यासाठी जात त्यावेळी नदीच्या डोहात त्यांना प्रभू रामाची व अंगलाई देवीची मूर्ती मिळाली. ती त्यांनी सज्जनगडावर आणली. त्यांनी इथे अंगलाई देवीचे मंदिर बांधले..
• धर्म ध्वज :
अंगलाई मंदिरा समोरील बाजूस एक ध्वज उभा दिसतो. तो धर्मध्वज मानला जातो. हिंदू धर्माचे तो भगवा ध्वज प्रतीक आहे.
• सज्जनगड पायथ्यापाशी असणाऱ्या गावात केदारेश्वर व विरूपाक्ष देवाची मंदिरे पाहायला मिळतात. या मंदिरातील बारीक नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.
• सज्जनगड हा किल्ला उंच अशा कड्यावर आहे. त्याची तटबंदी ही नैसर्गिक आहे. काही ठिकाणीच बांधली गेलेली आहे. त्यात पश्चिम बाजूने गडावर आक्रमण होऊ नये म्हणून तोंड उघडलेल्या मारुतीचे मंदिर आपणास पाहायला मिळते.
• सज्जनगडावर आजही रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या किल्याचा दरवाजा बंद ठेवला जातो.रात्री ९ नंतर गडावर प्रवेश बंद केला जातो.
• सज्जनगड किल्याविषयी ऐतिहासिक घडामोडी :
• सज्जनगड या किल्यावर पूर्वी प्राचीन काळी अस्वलायन ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या किल्ल्यास अश्र्वलायन गड असेही म्हणतात.
• इसवी सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने प्रथम या ठिकाणी गडाचे बांधकाम केले.
• इसवी सन १३५८ पासून हा किल्ला बहमनी सुलतानाच्या ताब्यात होता.
• त्यानंतर हा किल्ला बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर आदिलशाहीत आला.
• ३ एप्रिल १६७३ साली हा किल्ला आदिलशहा कडून छत्रपती शिवराय यांनी जिंकून घेतला.
• किल्याची डागडुजी केल्यावर छत्रपती शिवरायांच्या विनंतीने रामदासस्वामी सज्जनगडावर वास्तव्यास आले.
• इसवी सन१६७९ च्या पौष पौर्णिमेला शिवराय सज्जनगडावर रामदास स्वामींच्या दर्शनास आले.
• इसवी सन १६८२ साली राममूर्तीची स्थापना समर्थ रामदासांनी केली.
• २२ जानेवारी १६८२ साली रामदास स्वामींचे सज्जन गडावर देहावसान झाले.
• २१ एप्रिल रोजी फते उल्लाखान याने सज्जनगडाला वेढा दिला.
• ६ जून १७०० साली हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. त्याचे नाव नवरसतारा ठेवले गेले.
• इसवी सन १७०९ साली सज्जनगड पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला.
• इसवी सन १८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. तिथून पुढे हा किल्ला इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली गेला.
• १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र भारत देशात सज्जनगड किल्याचा समावेश झाला.
• अशी आहे सज्जनगड किल्याची माहिती.
Sajjangad killa information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l