रांगणा किल्ला/ प्रसिद्धगड
रांगणा किल्ला माहिती
Rangna Fort information in marathi
कोल्हापूर जिल्यातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या ११ किल्ल्यांमध्ये पहिल्या नंबरवर जर कोणाला स्थान असेल ते म्हणजे रांगणा किल्यास.
उंच अशा सह्याद्री घाट माथ्यावरील निबीड अरण्यात किर जंगलझाडीने वेढलेला. घाट, कोकण व गोवा या विभागावर लक्ष ठेवून आपला वचक जर का कोणी ठेवला असेल तर तो म्हणजे गिरिराजर्षी रांगणा किल्ला होय.
![]() |
रांगणा किल्ला माहिती व इतिहास Rangna Fort information in marathi |
शिवकालातील शिवरायांचे विचार इसवी सनाच्या १७८१ सालच्या कागदपत्रात उल्लेख केल्यानुसार
‘ एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल.’
अत्यंत निबीड जंगलात अजूनही इतिहासाची साक्ष देत आपले अस्तित्व जपत हा किल्ला अजूनही कात्याळ कड्यावर उभा आहे.
• रांगणा किल्ला स्थान :
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याच्या पश्चिम टोकावर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यास लागून सह्याद्री घाट माथ्यावर रांगणा म्हणजेच प्रसिद्धगड उभा आहे.
• रांगणा किल्ला उंची :
रांगणा किल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून उंची २२२७ फूट / ६७९ मीटर भरते.
• रांगणा किल्यावर जाण्याचा मार्ग :
• महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर शहरापासून – गारगोटी मार्गे – पाटगाव धरण- तांब्याचीवाडी – भटवाडी – चिक्केवडी हे १०५ किलोमीटर अंतर असून तेथून पुढे रांगणा किल्ल्यास जाता येते.
• पाटगाव धरणाच्या मागील बाजूने एक वाट कच्च्या सडकेला जाऊन भेटते. त्या मार्गाने पुढे गेल्यावर जंगली झाडीतून व खाचखळग्याच्या वाटेने गेल्यावर पुढे एक ओढा पार केल्यावर
आपणास जवळ जवळ ८ किलोमीटर पायपीट करून किंवा जीप सारख्या वाहनाचा वापर करून गडाची सुरुवात करणाऱ्या एका चौकी अवशेष असणार्या उंबर्या पर्यंत जाता येते. तेथून गडावर पायी जावे लागते.
यामार्गे सहसा पावसाळ्यात जाणे टाळावे.
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पासून ४० किलोमीटर नारुर गावी आल्यावर पायवाटेने चालून दोन तासात गडावरील कोकण दरवाजापर्यंत आपण पोहोचू शकतो.
• रांगणा किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
रांगणा किल्यावर पाहण्यासारखी बांदेश्वर् मंदिर, उतराभिमुख गणेश दरवाजा, हनुमंत दरवाजा, निंबाळकर वाडा, निंबाळकर बावडी, तिसरा दरवाजा, रांगणाई मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गणेश मंदिर, बारमाही तळे, चिलखती बुरुज, चोर वाट , भुयार, हत्तीसोंड माची, राजवाडा सदर, कोकण दरवाजा.
स्पष्टीकरण :
पाटगाव धरणाच्या मागील बाजूने एखाद्या जीप सारख्या वाहनाने आपण खाचखळग्याच्या व जंगल झाडीने वेढलेल्या वाटेने आपण पुढे गेल्यावर एक ओढा लागतो. तो पावसाळ्यात अगदी ओसंडून वाहतो. तेथून पुढे मळवाटेने पुढे गेल्यावर जवळजवळ ८ किलोमीटर अंतर पार केल्यावर आपणास एक
दगडी उंबरा असणारी चौकी लागते. येथून गडाची खरी सुरुवात होते. गडाकडे जाताना ही चौकी पहार्यासाठी बसवली असावी. तिची आता बरीच पडझड झालेली आहे.
बांदेश्वर मंदिर :
दगडी उंबऱ्यापासून पुढे जंगल वाटेने चालत गेल्यास एक छोटेसे मंदिर पुढे लागते. ते बांदेश्वर मंदिर होय. या ठिकाणी विष्णू देवता, श्री गणेश व बांधेस्वर देवांच्या मूर्ती पाहायला मिळतात. तेथे नमन करून आपण गड भ्रमंती सुरू करावी.
• तेथून पुढे चालत गेल्यावर हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या मोकळ्या पठारावर आपण पोहोचतो. तेथून समोर आपणास काळया कातळात बनवलेला एक बुरुज दिसतो. त्यावर डौलाने फडकणार भगवा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतो.
• इतर महाराष्ट्रातील गिरिदुर्ग हे चढून जावे लागतात. मात्र रांगणा हा किल्ला याच्या विरुद्ध आहे. हा दरीत उतरून पाहावा लागतो.
• रण मंडळ स्थान :
पठारावरून किल्याच्या दरवाजाकडे जाताना कड्यास लागून असणाऱ्या चिंचोळ्या पायवाटेने जावे लागते. जाताना डावीकडे खोल दरी तर उजव्या बाजूस कात्याळ कडा व त्यावर बांधलेला बुरुज, शत्रू जर चाल करून गडाकडे आला तर वरून त्यावर दगडाचा मारा. करता येवू शकतो. तसेच तो अरुंद वाटेमुळे जास्त वेगाने,अन् संख्येने येवू शकत नाही. व तटा वरून दगडाचा मारा केल्यास शत्रू सैन्य गोंधळून तोल जाऊन दरीत ही पडू शकते. अशी योजना असणारी रणमंडळ वाट या गडास आहे.
• हा किल्ला छत्रपती शिवराय यांचा अत्यंत आवडता किल्ला होय.
• उत्तराभिमुख गणेश दरवाजा :
रणमंडळ वाटेने पुढे आल्यावर उत्तर दिशेला तोंड करून उभा असलेला गणेश दरवाजा लागतो. उजव्या बाजूस तटबंदी तर डावीकडे बुरुज असणारा हा दरवाजा. गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो. सध्या त्याची चौकट फक्त शिल्लक आहे.
• हनुमंत दरवाजा :
पहिल्या दरवाजाने पुढे चालत गेल्यावर आपणास दुसरा दरवाजा लागतो. तो आहे हनुमंत दरवाजा, या दरवाजाची रचना गोमुख बांधणीची आहे. या दरवाजाच्या उजवीकडील तट बुरुज चौकोनी तर डावीकडील गोलाकार असणारा हा दरवाजा, याच्या आतील बांधकाम ऐतिहासिक घटनांची साक्ष देते आहे. याच्या आतील बाजूस देवड्या आहेत. पहाऱेकर्यांना विश्रांती घेण्यासाठी त्या बनवल्या गेल्या आहेत.
निंबाळकर वाडा :
दुसऱ्या दरवाजातून पुढे गेल्यावर उजवीकडील बाजूस एका भग्न वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. वाड्याची उजवीकडील भिंत तग धरून आजही उभी आहे. भग्न वाड्याचे अस्तित्व सांगत चौकटीचा सांगाडा उभा आहे. आजुबाजूस भिंतीमध्ये काही झाडे उगवली आहेत. वाड्याच्या आतील बाजूस एक शिलालेख पाहायला मिळतो. तो फारशी भाषेत आहे.
निंबाळकर बावडी/ विहीर :
वाड्याच्या आत मध्ये पुढे गेल्यावर मागील बाजूस एक चिरेबंदी बांधकाम असलेली विहीर पाहायला मिळते. विहिरीत आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
तिसरा दरवाजा यशवंत दरवाजा :
निंबाळकर बावडी पाहून आपण पुढे गेल्यावर आपणास किल्याचा तिसरा दरवाजा लागतो. भक्कम अशी आडवी तटबंदी असलेला असा हा दरवाजा एक वेगळी ठेवणं दर्शवतो. एकामागून एक असे दोन दरवाजे. आतील बाजूस सुरेख देवड्या पहारेकऱ्यांना विश्रांतीसाठी बनवलेल्या आहेत. तसेच दरवाजाच्या आतील बाजूने चढून तटावर जाण्यासाठी सुंदर दगडी पायऱ्या पाहायला मिळतात. शिवकाळातील आठवण करून देतात. या दरवाजाला यशवंत दरवाजा असे देखील म्हणतात. कारण हा किल्ला सुभाना यशवंत शिंदे याने अडीच महिने लढूून जिंकून करवीर राजवटीस मिळवून दिला.
बारमाही तलाव :
तिसऱ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूच्या तटाकडेने चालत पायवाटेने गेल्यावर आपणास एक तलाव लागतो. या तलावातील पाणी वर्षभर असते. त्यामुळे या तलावास बारमाही तलाव असे म्हणतात. या तलावा शेजारी आपणास समाध्या पहावयास मिळतात.
रांगणाई मंदिर :
शिवमंदिर पासून उंच सखल वाटेने पुढे आल्यावर आपण रांगणाई देवालया जवळ येवून पोहोचतो. या मंदिराचा जि्णोद्धार राजर्षी शाहूमहाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी केला असून भव्य प्रांगणात हे देवालय आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस उंच दीपमाळ दिसून येते.
मंदिर आवारात सुबक तुळशी वृंदावन पाहायला मिळते. ते दगडात बांधलेले प्राचीन धाटणीचे आहे.
उंच चौथऱ्यावर मंदिर असून जांभ्या दगडात बांधलेले आहे. गाभाऱ्यात शस्त्र सज्ज ढाल, तलवार, त्रिशूळ घेतलेल्या अवस्थेत रांगणाई देवीची मूर्ती आपल्याला पाहता येते. देवीच्या उजव्या हातास श्री विष्णू देवतेची मूर्ती असून डावीकडे भैरव देवाची मूर्ती आहे.
या ठिकाणी एक शिलालेख ही पाहता येतो. जो फारशी भाषेत आहे. मंदिराच्या बाहेर वनखात्याने गड भ्रमंतीस आलेल्या लोकांसाठी ओवऱ्या निवाऱ्यासाठी बांधून ठेवल्या आहेत.
हनुमान मंदिर :
रांगणाई मंदिराच्या बाजूला एक छोटेसे हनुमान मंदिर असून आतील बाजूस वंदनीय अशी हनुमंताची मूर्ती आहे.
कोकण दरवाजा :
रांगणाई देवी मंदिराच्या मागील बाजूने चालत गेल्यावर आपणास एक खोल घळई लागते. पावसाचे पाणी या घळीतून वाहून जाते. या घळीच्या टोकाला एक मोरीसारखी कमान पाण्यासाठी बांधली गेली आहे. मोरीमुळे या ठिकाणी घळईत पाणी साठते. व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते.
तेथून पुढे दरीच्या टोकाला एक बुरुज लागतो. तर दुसऱ्या बाजूला गडाची तटबंदी पाहायला मिळते. या ठिकाणी आपणास पश्चिम दिशेला तोंड करून उभा असलेला कोकण दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजातून उतरून गेल्यावर आपण कोकणातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावी जाऊन पोहोचू शकतो.
राजसदर :
कोकण दरवाजा पाहून मागे रांगणाई मंदिराच्या समोर येऊन
रांगणाई मंदिराच्या समोर चालत गेल्यावर आपणास राज सदरेचे अवशेष पहायला मिळतात. एक कमान व उंच स्तंभ व सभोवताली भिंतीचे अवशेष पहायला मिळतात. तीस बाय तीस मीटर अवार असणाऱ्या या वास्तूच्या ठिकाणी संकटकाळी स्वराज्याचा कारभार पाहिला गेला आहे. एका बाजूला भिंतीकडेस झाडे उगवलेली दिसतात.
महादेव मंदिर १:
सदरेपासून पुढे गेल्यावर आपल्याला एक शिव मंदिर लागते. या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून. ते चीर्यात बांधले आहे. मंदिराच्या आत दोन शिवपिंडी आहेत. त्यातील एक पिंड दोन लिंगी आहे. दोनलिंगी शिवपिंड ही तलावाजवळील देवळीच्या छोट्या मंदिरात होती.
दुसरे शिव मंदिर :
हे मंदिर छोटेसे आहे व लाल चीर्यात बांधलेले आहे. मंदिराबाहेर एक नंदी असून आत महादेव पिंड आहे.
गणेश मंदिर :
महादेव मंदिरापासून एक पायवाट दरीच्या दिशेने जाते. त्या वाटेने पुढे गेल्यावर आपणास गणेश मंदिर पाहायला मिळते. या ठिकाणाहून जात कडेला उभे राहिल्यास आपणास निसर्गाचे रमणीय सौंदर्य पाहायला मिळते. सह्याद्रीच्या डोंगर, दर्या व त्यावरील वनसंपदा आपल्यावर मोहिनी घालते. व मन प्रसन्न करून मनावरील ताण नाहीसा करते.
हत्तीसोंड माची :
येथून पुढे चालत राहिल्यास गडाच्या एका टोकाला आपण जाऊन पोहोचतो. या ठिकाणी वाढलेल्या गवतातून जाताना सावधानता बाळगावी. एखादवेळी पायात सरपटणारा जीव येवू शकतो. या वाटेने पुढे चालत गेल्यावर एक अरुंद हत्तीच्या सोंडे सारखी वाट लागते. त्यावरून चालताना पायाकडे जपून पहात जावे लागते. तोल जरासा ढळला तरी खोल दरीत कोसळू शकेल अशी वाट. या वाटेने पुढे चालत राहिल्यावर आपण एका माचीवर येऊन पोहोचतो. ती आहे हत्तिसोंड माची.
याठिकाणी आल्यावर निसर्गाचे सुंदर रूप पाहिल्यावर चालून झालेल्या श्रमाचा परिहार झाल्यासारखे वाटते.
चिलखती बुरुज :
हत्ती सोंडेच्या टोकावर उंच भक्कम असा चिलखती बुरुज पाहायला मिळतो. असे दोन बुरुज बांधलेले आहेत. अजूनही चांगल्या स्थितीत इतिहासाची साक्ष देत उभा आहेत. माचीच्या तळापासून वीस ते पंचवीस फूट उंच असणारा हा बुरुज किल्याच्या मागून जरी हल्ला झाला तरी सज्ज असा उभा एखाद्या शिलेदरासारखा आहे.
चोर दरवाजा :
चिलखती बुरुजातून वर हत्ती सोंडेच्या ठिकाणी आल्यास तिथे माचीच्या टोकाला चोर दरवाजा आहे. छोट्या छोट्या कमानी असणाऱ्या या दरवाजाने चालत गेल्यास शेवटी दरीच्या टोकावर पोहोचतो. इथून पुढे कडा तुटला असल्याने आपणास चिलखती बुरुजात उतरता येत नाही.
उत्तर पुर्व बुरुज व भुयार :
हत्तीसोंड पाहून झाल्यावर आपण पुन्हा तिसऱ्या दरवाजा पर्यंत यायचे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने दरी टोकाकडे चालत गेल्यास पडझड झालेला बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. या बुरुजावर चढण्यासाठी डब्बल पायरी मार्ग आहे. चीक्केवाडी बाजूने येताना आपल्याला प्रथम दर्शनी हा बुरुज दिसतो.
भुयार :
या ठिकाणी असलेल्या एका बुरुजाच्या तटबंदीला खालील बाजूस एक भुयार आहे. जेथून जाणारी वाट चिक्केवाडी बाजूच्या एका दरीच्या टोकावर ते खुले होते. पण आतील बाजूस पडझड झाल्याने तिथे जाता येत नाही.
दक्षिणेला माचीजवळ केरवडे गावाला जाणारा एक दरवाजा, तर चाफेली गावाकडे जाणारा दुसरा पूर्व दरवाजा देखील या गडाला आहे.
रांगणा किल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
Rangna Fort Historical information in marathi:
• हिंदू राजा शिलाहार राजा भोज दुसरा याच्या राजवटीत रांगणा हा किल्ला बांधला गेला.
• इसवी सन १४७० साली हा किल्ला बहमनी सुलतानाचा वजीर महमंद गावान याने जिंकून बहामनी राजवटीत आणला.
तो या किल्याबाबत असे म्हणत असे की,
‘ अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दुमकी बरोबर संपत्तीही खर्च करावी लागली.
• बहामनी राजवटीच्या नाशाबरोबर हा किल्ला आदिलशाहीत आला.
• आदिलशाही काळात तो आदिलशाही सरदार वाडीचे सावंत यांच्या ताब्यात होता.
• इसवी सन १६५८ साली विजापूर आदिलशाही सरदार रुस्तुम जमान याने सावंतांकडून तो काढून घेतला.
• छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत स्वराज्यातील कोकण प्रांताचा कारभार बघणारा अधिकारी राहुजी पंडीत यांनी रुस्तुम जमान कडून रांगणा जिंकून घेतला.
• छत्रपती शिवराय आग्रा भेटीस जाऊन नजरकैदेत अडकल्याचा फायदा घेण्यासाठी आदिलशहाने रांगणा मोहीम काढून रांगणा ताब्यात घेतला.
• स्वराज्य धोक्यात असताना अशावेळी राजमाता जिजाबाई यांनी खास मोहीम काढून १५ - ०८ – १६६६ साली रांगणा सर केला. व पुन्हा स्वराज्यात आणला.
• रांगणा जिंकल्यामुळे त्याचा शुभ पायगुण असा की त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १७ – ८- १६६६ रोजी शिवराय आग्रा कैदेतून सुरक्षित सुटले.
• १२ मे १६६७ साली रांगणा जिंकण्याच्या स्वारीवर आदिलशाही कडून व्यांकोजीराजे भोसले व बहलोलखान चालून आले. व गडाला वेढा दिला. छत्रपती शिवराय यांनी स्वतः जातीनिशी जाऊन वेढा मोडून काढला.
• छत्रपती शिवराय यांनी रांगणा गडाचे महत्त्व जाणून किल्ल्यावरील बांधकाम करण्यासाठी ६००० होण इतका खर्च केला.
• मुघल बादशहा औरंगजेब याने दक्षिण स्वारीवर आल्यावर रांगणा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही.
• वारणा तहानंतर हा किल्ला करवीर संस्थानात दाखल झाला. ताराराणी व छत्रपती शाहू संघर्षावेळी ताराबाईंनी पन्हाळा सोडून रांगणा किल्यावर आश्रय घेतला. व कारभार पाहताना शाहू महाराजांच्या सैन्याने इसवी सन १७०८ साली रांगणा किल्यास् वेढा दिला. तेव्हा ताराबाईंना सिंधुदुर्ग किल्यावर पाठवून रामचंद्र पंत अमात्य व पिराजी घोरपडे यांनी गड लढवला. पावसाळा सुरू होताच. शाहू महाराज यांनी वेढा मागे घेतला.
• सावंतवाडीच्या सावंतांवर वचक ठेवण्याचे काम रांगणा किल्ला करत होता. म्हणून करवीरकरांना रांगण्याचे महत्त्व माहीत होते.
• वाडीच्या सावंतांनी रांगणा आपल्या ताब्यात घेण्यासाठी जिवाजी विश्राम यास पाठवले. त्याने किल्यावर फितुरी माजवून किल्ला धोक्याने ताब्यात घेतला.
• करवीर राज्यातील कर्तबगार अधिकारी सुभान यशवंत शिंदे याने अडीच महिने लढून हा किल्ला पुन्हा करवीर राज्यात आणला.
• करवीर राज्यातील कागदपत्रात महास्थल म्हणून या किल्याची नोंद आहे.
• वाडीच्या सावंतांनी तह करून करवीर राज्याशी एकनिष्ठ राहण्याचे ठरवले. तेव्हापासून हा किल्ला करवीर राजवटीत राहिला.
• पुढे हा किल्ला इंग्रज राजवटीच्या ताब्यात आला.
• गडकर्यांनी बंड केल्यावर पुन्हा ताब्यात घेताना इंग्रजांनी या किल्यावरील तटबंदी, दरवाजे यांची बरीच मोडतोड केली.
• पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारताच्या ताब्यात आहे.
• सध्या तो पुरातत्व खात्याच्या पुणे विभागाच्या अखत्यारीत आहे.
हल्ली काही शिवप्रेमी युवकांनी इंग्रजांनी गडकर्यांचे बंड मोडताना दरीत टाकलेल्या तोफा वर आणल्या आहेत.
• महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध गडामध्ये रांगणा हा अत्यंत कठीण, दुर्गम व आपली वेगळी ओळख ठेवून आहे. अशा या शिवरायांच्या लाडक्या प्रसिद्धगड म्हणजे रांगण्यास एकदा तरी भेट द्या.
रांगणा किल्ला माहिती व इतिहास.
Rangna Fort information and History in marathi