त्रिरश्मी गुहा लेणी / पांडव लेणी नाशिक विषयी माहिती
Trirshmi guha leni / Pandav leni Nashik mahiti
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यात नाशिक शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर हा लेणे समूह आहे.
• लेणी पाहायला जायचा प्रवाशी मार्ग :
• नाशिक शहरापासून ही लेणी अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर ही लेणी आहेत.
• पुणे या शहरापासून २१९ किलोमीटर अंतरावर ही लेणी आहेत.
• मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानी पासून ही लेणी १५९ किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई व पुणे ही आंतरराष्ट्रीय स्थानके आहेत. व जवळील नाशिक हे ठिकाण रस्ते, लोहमार्ग अन् हवाई मार्गे भारतातील इतर ठिकाणांना जोडले गेले आहे.
• त्रिरश्मी लेणी परिसरात पाहण्यायोग्य ठिकाणे :
• नाशिक शहरातून आपण खाजगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून आपण या त्रिरश्मी गुहांकडे अर्ध्या तासात जाऊ शकतो.
• भव्य बुध्द स्तूप :
त्रिरश्मी गुहांकडे जाताना वाटेत आपणास एक भव्य स्तूप लागतो. जो अलीकडे नवीन बुध्द धर्मियांसाठी बांधला आहे. ज्याच्या बाहेर सुंदर बाग आहे. आतील बाजूस विस्तृत आवार आहे. मध्यभागी तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा असून त्यांची शांत मुद्रा पाहिल्यावर मनावरील ताण निवळतो.
• पायरी मार्ग :
भव्य स्तूप पाहून आपण पुढे गेल्यावर आपणास त्रिरश्मी गुहांकडे निघालेला मार्ग लागतो. या वाटेने आपण वाहन तळाकडे जाऊन पोहोचतो. तेथून पुढे पायरी मार्गानें या गुहांपर्यंत पोहोचू शकतो. पाहणी तिकीट काढून आपण गुहांच्या परिसरात पोहोचतो.
• गुहा नंबर १ व २ :
या गुहा सुरवातीच्या काळातील गुहा असून यांची निर्मिती अपूर्ण आहे. बाहेरील बाजूस पाण्याची टाकी आहे. दुसरी गुहेच्या बाहेरील बाजूस चौरसाकृती खांब आहे. त्याच्या आत ओवरी असून त्याच्या आतील बाजूस विस्तृत सभागृह असून त्याच्या आतील बाजूस ध्यान व शयन करण्यासाठी देवड्या खोदलेल्या आहेत. हे एक बुध्द विहार आहे.
• लेणी क्रमांक ३ : महादेवी लेणे
हे लेणे सातवाहन राणी गौतमी बलश्रीने खोदून घेतले आहे. या लेण्याच्या बाहेरील बाजुस पायथ्यास सहा पुरुषांची शिल्पाकृती आहे. हे लेणे एक पालखी स्वरूप बनवले असून हे पुरुष त्याचे भोई आहेत. ते प्रवेशिकेच्या दोन्ही बाजूस तीन तीन स्वरूपात आहेत. त्यावर कट्टा खोदून तयार केला असून त्यावर कुंभ आहेत. त्यावर वर्तुळाकार स्तंभ आहेत. वरील बाजूस आडवी पट्टीका आहे. स्तंभ हे चक्र, सिंह, हत्ती, वृषभ या प्राण्यांच्या नक्षीने कोरलेले दिसून येतात. त्याच्या आतील बाजूस ओसरी खोदलेली पाहायला मिळतें. ओसरीच्या पुढे आपणास लेण्यांची बाह्य भिंत पाहायला मिळते. त्यावर दोन बाजूस प्रवेश द्वारी द्वारपाल कोरलेले दिसून येतात. बाहेरील द्वराच्या पत्रिकेवर शिल्पकलेतून तत्कालीन सातवाहन राजाच्या शौर्या विषयी माहिती मिळते. शिवस्वाती सातकर्णी व त्याची पत्नी राजलक्ष्मी यांच्या जीवनातील प्रसंग कोरलेला आहे राजलक्ष्मीचे हरण नहपाण राजाने केले. त्यास हरवून राजलक्ष्मीला परत जिंकून आणले. हा संपूर्ण वृत्तान्त व वाशिष्टीपुत्र पुलकेशीचा जीवन प्रसंग कोरलेला पाहायला मिळतो.. हिंदू धर्मीय स्वस्तिक व चक्र चिन्ह देखील दिसून येते. या लेण्याच्या आतील बाजूस ४५ फूट लांब, ४१ फूट रुंद अन् १०.५ फूट उंच असे दालन आहे. या दालनाच्या आतील बाजूस लहान लहान बुध्द भिक्षुसाठी ध्यान व शयन कक्ष आहेत.
लेण्यात एक शिलालेख आहे. तो ब्राह्मी भाषेत आहे. यावरून असे समजते की हि लेणी खोदण्यासाठी या परिसरात असणाऱ्या अजकाल पकडी गावातील दोनशे निवरतणाचे शेत गौतमी पुत्र सातकर्णी याने या लेण्यातील बुध्द धर्मीय भिक्षूंना दान दिले आहे. हे विहार असून येथे ज्ञानसाधना व तप साधना करण्याचे काम बुध्द भिक्षू करत असत. याठिकाणी आणखी एक शिलालेख पाहायला मिळतो.
या महादेवी लेण्याशेजारी छोटा कक्ष आहे. ज्या ठिकाणी स्वयंपाक करण्याचे कार्य केले जात असावे.
• लेणी क्रमांक ५,६,७ :
ही लेणी अर्धवट आहेत. कोरीव काम करताना ठिसूळ दगड लागल्याने तयार करताना अडचणी आल्यामुळे ती अपूर्ण स्वरूपात आहेत.
• लेणे क्रमांक ८ :
आठ क्रमांकाचे लेणे या ठिकाणी पाण्याचे टाके जवळ असून यामध्ये देखील शिलालेख आहेत. लेण्यासाठी जमीन दान दिल्याची नोंद आढळते. लेणे व पाण्याची टाकी बांधण्यासाठी केलेले दान याचा उल्लेख आहे.
• लेणे क्रमांक ९ :
पाण्याच्या टाकी शेजारून असणाऱ्या पायरी मार्गाने आपण या लेण्यात जावू शकतो. येथे छोटीशी ओसरी व आतील बाजूस तीन कक्ष आहेत. येथे खांबावर सिंह, हत्ती, वृषभ कोरलेले आहेत.
• लेणे क्रमांक १०, ११, १२, १३:
या गुहांमध्ये बाहेरील बाजूस विस्तृत कक्ष व आत ध्यान कक्ष असलेली ही लेणी आहेत. काही अर्धवट आहेत.
• लेणे क्रमांक १४ :
या लेण्याच्या बाहेर पाण्याची लहान टाकी आहे. टाकीच्या वर एक स्त्री मुख शिल्प आहे. ही सितला माता आहे. जी कांजिण्या रोग होऊ नये. म्हणून तिची पूजा केली जाते असते. तिचे स्थान पाण्याजवळ असते. असे मानले जाते. या टाकीच्या पुढील भाग लेणी करण्यास अनुपयुक्त असल्याने तो सोडून पुढे थोडया अंतरावर पंधरावे लेणे खोदण्यास सुरवात केली.
• लेणी क्रमांक १५:
पंधराव्या लेण्यात बाहेरील बाजूस भिंत नाही. या मध्ये बुध्दमूर्ती शिल्पित केलेली आहे. यामध्ये बुद्धांच्या पायात धर्मचक्र काढलेले आहे. तसेच नागदेवता शिल्पित केलेला असून तो लवून नमन करत बसलेला आपणास पाहायला मिळतो. बुद्धांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव दिसत आहेत. डाव्या बाजूला कमलपुष्पात बसलेली बुध्द प्रतिमा शिल्पित केलेली आहे. येथे देखील नागदेवता शिल्पित केलेली आहे.
या लेणी समूहातील लेणी ही हीनयान व महायान काळात झालेली आहेत. बुद्ध मुर्ती असलेल्या मूर्ती लेणी ही महायान काळात खोदलेली आहेत. येथून नाशिक शहराचे दर्शन घडते.
• लेणे क्रमांक १६ :
सोळाव्या लेण्यात गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. यामध्ये बुध्द ज्ञानसाधना करण्याचा संदेश देत आहेत. व बाजूला सेवक चवर्या घेवून सेवा करत आहेत. बुध्द मूर्तीच्या चेहऱ्यावर शांत भावना दिसत आहेत.
• लेणी क्रमांक १७ :
हे लेणे एक विहार आहे. याच्या बाहेरील बाजूस चार स्तंभ आहेत. स्तंभाच्या वरील बाजूस हत्ती कोरलेले असून त्यावर स्त्री रुपी माहुत कोरलेले आढळतात. हत्तीच्या सुळ्याच्या जागी छिद्र आहेत. यामध्ये पूर्वी खरोखरचे मृत झालेल्या हत्तींचे हस्तीदंत लावले जात असे समजते.
खांबाच्या मागील बाजूस ओसरी असून आत विस्तृत आवार आहे. व लेण्याशेजारी लहान भिक्षू निवास व्यवस्था आहेत. येथे एक शिवलिंग स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसून येते. वृषभ, सिंह हत्ती यांची शिल्पाकृती कोरलेली या लेण्यात पाहायला मिळते. या लेण्यात एक शिलालेख पाहायला मिळतो. जो इन्द्राधीहूनी दत्त याने आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ पुण्याप्राप्तीसाठी येथील दोन कक्ष, एक प्रार्थना सभागृह अन् दोन पाण्याच्या पोरी म्हणजेच टाक्या खोदवून दान स्वरूपात दिल्या आहेत.
• लेणी क्रमांक १८ :
आठरा क्रमांकाचे लेणे हे एक चैत्यगृह आहे. बाहेरून प्रवेश करताना सुंदर नक्षी कोरलेली आहे. आत प्रकाश प्रवेशिका होण्यासाठी वरील बाजुस पिंपळ पान नक्षी असलेली संरचना आहे. चैत्याचे आतील बाजुस दोन्ही बाजूस खांब आहेत. खांबाच्या मागून प्रदक्षिणा मार्ग आहे. हा चैत्य ३९ फूट लांब,२१ फूट रुंद अन् १२ फूट उंच आहे. चैत्याच्या अंतिम क्षेत्रात स्तूप आहे. स्तूप परिपूर्ण वेदिका पट्टी व हर्मीका चौथर्यासह आहे. या चैत्यातील पाचव्या व सहाव्या स्तंभावर ब्राम्ही भाषेत शिलालेख कोरलेला दिसतो. हा एका स्त्रीने दान दिल्याचे त्याच्या वाचनावरून समजते. यावरून स्त्रिया ही त्याकाळात दानधर्म करण्याचे काम करत असत. हे समजते. या ठिकाणी प्रार्थणा केली जात असे. व स्तूप परिक्रमा ही ज्यामधे बुद्ध धर्मीय भिक्षूच्या अस्थी ठेवल्या जात. ज्यातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असे.
• लेणे क्रमांक १९ :
अत्यंत साधे व अती प्राचीन म्हणजेच सुरवातीच्या काळातील बाहेर स्तंभ असून ते लहान आहेत. छोटीशी ओसरी व त्याच्या आतील बाजूस लेण्यांची भिंत व आतील एक लहान कक्ष आहे. हवा ये जा करण्यासाठी जाळीदार गवाक्षे संपूर्ण कातळ भिंत खोदून केलेली आहेत. हे लेणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरले असल्याचे येथील शिलालेखावरून समजते. हा सातवाहन राजा कृष्ण याचा शिलालेख दान दिल्याच्या नोंदीसह आहे.
• लेणे क्रमांक २० :
विसाव्या क्रमांकाचे लेणे हे पायऱ्या चढून वर जावून पहावं लागत. हे येथील सर्वात मोठे लेणे आहे. हा एक विहार आहे. बाह्य बाजूस स्तंभ मग ओवरी त्यानंतर विस्तृत ४५ फूट लांब व ४१ फूट रुंद असे सभागृह आहे. त्यानंतर आत अनेक ध्यान कक्ष या सभगृहानंतर आणखी स्तंभ आहेत त्यावर सुंदर नक्षी कोरलेली आहे. यानंतर महायान काळात येथे पुन्हा गर्भगृह खोदलेले दिसून येते. या गर्भगृहात चक्रपाणि व पद्मपाणि रुपात बुद्ध मुर्त्या शिल्पाकृती केलेल्या आहेत. येथील ओसरीवर मागे डाव्या बाजूस यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख पाहायला मिळतो.
• लेणे क्रमांक २१ :
या लेण्याच्या वाटेत एक पाण्याचा कुंड लागतो. हे एक छोटे सभागृह आहे. किंवा साहित्य ठेवण्याची खोली असावी.
• लेणे क्रमांक २२ :
येथे एक लहान कक्ष आहे.
• लेणे क्रमांक २३ व २४:
एका अरुंद वाटेने इकडे जावे लागते. या लेण्याच्या सुरवातीस एक पाण्याचे टाके आहे. जे खूप खोल आहे. सुरक्षेसाठी यावर एक जाळीचा दरवाजा बसवलेला आपणास पाहायला मिळतो. यानंतर विस्तृत अंगण आहे.
• लेणे क्र. २३:
या लेण्याच्या बाहेर चक्रपाणि व पद्मपाणि रुपात बुध्द शिल्प कोरलेले आहेत. आतील बाजूस देखील बुध्दमूर्ती असून धम्मचक्र प्रवर्तन अवस्थेत बुध्द विराजमान दिसतात. या मूर्ती थोड्याफार प्रमाणात खंडित झाल्या आहेत. तरी देखील या मूर्तींच्या चेहऱ्यावरील सुंदरता, शांत भाव तेजस्वी नेत्र पाहिल्यावर डोळ्यांचे पारणे फिटते. या ठिकाणी अनेक शिल्पे पाहायला मिळतात. पुष्प माला घालण्यास आलेले उडणारे यक्ष, वंदन करणारी नागदेवता पाहिल्यावर एक विलक्षण आनंद होतो.
• लेण क्रमांक २४ :
तेवीस प्रमाणेच लेणे क्रमांक चोवीस आहे. येथे देखील बुद्ध मूर्ती असून त्याच्या चरणाजवळ आपणास एक घुबड पाहायला मिळते. येथे बुध्द आशीर्वाद देताना दिसतात. अशा आणखी काही शिल्पाकृती येथे पाहायला मिळतात. याठिकाणी एक मोठे शिल्प पाहायला मिळते. त्यामध्ये पाच वीर पाहायला मिळतात. या वीर चित्रावरून आपणास ही पांडव लेणी आहेत असे म्हंटले जाते. याठिकाणी मध्यभागीं बसलेला भीम व बाजूस त्याचे चार भाऊ युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आहेत असे मानले जाते. पण काही मते ही बुध्द लेणीच आहेत. तसे पाहता बुध्द काय की पांडव हा ज्याच्या त्याच्या पाहण्याचा दृष्टीकोन पण इतकी सखोल डोंगर पाषाण कोरून खोदलेली आपल्या पूर्वजांची लेणी ही भारतीय धरोहरच आहे. त्याच जतन झालं पाहिजे. शेवटी एक विशाल निद्रिस्त बुध्द आपणास पाहायला मिळतात.
• त्रिरश्मी लेण्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• त्रिरश्मी लेण्यांची निर्मिती ही इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकात तत्कालीन सातवाहन क्षत्रपांच्या काळात बुध्द धर्मीय हिनयान साधूंनी क्षत्रपांच्या आर्थिक सहकार्यातून खोदण्यास सुरू केली.
• सातवाहन काळातील सर्व राजांनी आपापल्या कारकीर्दीत या लेण्यांच्या निर्मितीस भरीव आर्थिक सहकार्य केले. हे इथल्या शिलालेखात दिसून येते.
• इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत या लेण्यातील बुध्द धर्मीय बुध्द शिल्पे ही महायान पंथियानी यांची निर्मिती केली. यासाठी स्थानिक लोकांनी देणगी दिल्याचा देखिल उल्लेख आहे.
• पुढील काळात बुध्द धर्माचा प्रभाव कमी झाला व हिंदू धर्म प्रसार पुन्हा वाढल्याने येथील लेणी खोदणे बंद झाले.
• पुढे परकीय आक्रमकांनी काही प्रमाणात येथील मूर्तींची तोडफोड केल्याचे दिसून येते.
• ब्रिटीश काळात अनेक तज्ञ इतिहासकारांनी येथील शिलालेखांचा अभ्यास करून या लेण्यांचा इतिहास दृष्टीक्षेपात आणला.
• सध्या स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात ही लेणी आहेत. व पर्यटन दृष्ट्या यांचा विकास व वापर केला जात आहे.
• अशी आहे त्रिरश्मी बुध्द / पांडव लेण्याविषयी माहिती.Trirshmi guha leni / Pandav leni Nashik mahiti