सिंधुदुर्ग किल्ला माहिती.
Sindudurg Fort information in marathi
History
“आपल्या महाराष्ट्राला जमिनीवरून जास्त धोका नसून तो असेल तर समुद्रमार्गे.” छत्रपती शिवराय .
![]() |
सिंधुदुर्ग किल्ला माहिती इतिहास Sindudurg Fort information in marathi |
शिवकालीन चित्रगुप्त बखरीत उल्लेख खालील प्रमाणे,
अर्थ : समुद्रातील चौर्याऐंशी बंदरामध्ये जंजिऱ्याच्या सिद्धी व टोपी घालणाऱ्या इंग्रजांच्यावर राज्य करणारी अशी ही शिवरायांची लंका आहे.
सिंधुदुर्ग जगातील आकाशी तार्याप्रमाने आहे.
जसे मंदिराच्या प्रांगणात तुळशी वृंदावन शोभा आणते. तसेच आपल्या स्वराज्याचा सिंधुदुर्ग किल्ला अलंकार आहे, शोभा आहे.
चौदा रत्ने आहेत, त्या प्रमाणे हे पंधरावे रत्न सिंधुदुर्गाच्या रुपात छत्रपती शिवराय यांना प्राप्त झाले.
सिंधुदुर्ग किल्ला स्थान :
महाराष्ट्र राज्याच्या अती दक्षिणेस असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरास लागून असलेल्या समुद्रात किनाऱ्यापासून अर्धा मैल अंतरावर समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला आहे. या किल्यावरूनच या जिल्ह्यास सिंधुदुर्ग नाव पडले आहे.
• सिंधुदुर्ग किल्ला उंची :
सिंधुदुर्ग हा जलदुर्ग असल्याने तो समुद्री किल्ला आहे. याची समुद्रसपाटी पासून उंची २०० फूट आहे.
सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाण्याचा मार्ग :
मुंबई गोवा हायवेवर असणाऱ्या कणकवली शहरापासून पुढे गेल्यावर कसाल या ठिकाणाहून पुढे कट्टा या ठिकाणाहून- मालवण- सिंधुदुर्ग.
• कुडाळ वरून परुळे गाव मार्गे सिंधुदुर्ग एअर पोर्ट तिथून पुढे मालवण-सिंधुदुर्ग.
• कणकवली- वरवडे मार्गे आचरा तिथून पुढे मालवण- सिंधुदुर्ग
• हवाई मार्गे : सिंधुदुर्ग विमानतळावरून पुढे देवबाग व पुढे मालवण- सिंधुदुर्ग.
- मालवण हे ठिकाण समुद्रकाठी असल्याने ते एक बंदर ही आहे. समुद्रमार्गे भारताच्या पश्चिम बाजूने किनाऱ्याने ते जोडले गेले आहे.
सिंधुदुर्ग बांधणी साल :
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात २५ नोव्हेंबर १६६४ साली सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. पुढे तीन वर्षे हे काम चालू होते. इसवी सन१६६७ साली काम पूर्ण झाले.
• छत्रपती शिवराय यांच्या आज्ञेने हिरोजी इंदुलकर यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले. या कामी ३०० पोर्तुगीज अभियंते व ३००० मजूर गवंडी सिंधुदुर्ग निर्मितीचे काम सलग तिन वर्षे करत होते.
• सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. व मालवण शहरा लगत असलेल्या कुरटे बेटावर बांधला गेला आहे.
• हा किल्ला बांधताना ८०,००० होण खर्च हा फक्त तट बांधण्यासाठी केला गेला.
• या किल्ल्यास एकूण ५२ बुरुज आहेत. प्रत्यक्षात सध्या २७ बुरुज अस्तित्वात आहेत.
किल्यातील शिवकालीन आतील वास्तू, राजवाडा, नगारखाना, विहिरी, व इतर वास्तू, भुयारी मार्ग निर्मिती करण्यात आली.
ऐकूण मिळून सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी १ कोटी होन खर्च झाला.
सिंधुदुर्ग किल्यावर पहाण्यायोग्य ठिकाणे :
महादरवाजा :
मालवण किनाऱ्यावरून बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या धक्यावर उतरल्यावर दगडी फरसबंदी बांधकामावरुन चालत गेल्यावर तटबंदीच्या जवळून गेल्यावर गोमुख पद्धतीच्या बांधकाम रचनेचा दरवाजा बुरुजाच्या आतील बाजूस सुरक्षित अशा प्रकारे दिसून येतो. किल्याच्या अशा ठेवणीमुळे शत्रूस दरवाजा कोठे आहे हे लवकर लक्षात येत नसे. तसेच गोमुख बांधणीमुळे त्यावर तोफेचा मारा व वेगवान हल्ला करणे कठीण होत असे. दरवाजाच्या वरील बाजूस तीन छिद्रे दिसतात. युद्धकाळात शत्रू दरवाजा जवळ आल्यास त्यावर या छिद्रातून कडक गरम गुळाचे पाणी, किंवा कडक तापवलेले तेल ओतले जाई. त्याने शत्रू सैन्य होरपळत. किल्याचा दरवाजा उंबर व सागवाणाचे लाकूड जोडून वापरून बनवलेले आहेत. व आजही सुस्थितीत आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत. त्यांना आराम करण्यासाठी.
दक्षिणमुखी हनुमान :
महादरवाजा समोर दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. लंका दहनास हनुमान दक्षिणेस पुढा करून गेला. व रावणाचा अंत झाला. त्यामुळे लढाईस जाताना दक्षिणाभिमुख हनुमंताचे दर्शन घेऊन जाणे शुभ मानले जाते. मावळे लढाईस जाताना या हनुमंताची उपासना करून जात असतं.
जरीमरीचे देऊळ :
महादरवाज्यातून आत गेल्यावर आपणास एक देऊळ लागते. पश्चिमेकडे पुढा असलेले हे देऊळ, जर म्हणजे आजार मरी म्हणजे मारणे, मावळ्यांना निरोगी ठेवणारी देवता ही जरीमरी आरोग्य देवता म्हणून मान्यता आहे. तिची पूजा शिवकाळात व आजही इथे केली जाते.
छत्रपती शिवराय यांच्या उजव्या हाताचा व डाव्या पायाचा ठसा :
सिंधुदुर्ग किल्ला बांधकाम झाल्यावर छत्रपती शिवरायांनी हिरोजी इंदुलकर यांना बक्षीस मागण्यास सांगितले. तेव्हा स्वराज्य भक्त इंदुलकर यांनी छत्रपती शिवराय यांच्या लढाई करताना तलवार हाती धरणाऱ्या उजव्या हाताचा अन् लढताना पुढे असणाऱ्या डाव्या पायाचा ठसा मागितला. ते दोन ठसे दगडात कोरलेले येथे दिसतात.
नगारखाना :
तटावरून पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला आपल्याला नगारखाना लागतो. या ठिकाणी नगारे वाजवले जात. त्याची धून ही इशारा देणारी असे. म्हणजेच छत्रपती शिवराय आल्यावर वेगळी, मावळे आल्यावर वेगळी अन् शत्रू आल्यावर वेगळी धून वाजवून इशारा दिला जात असे.
तिकीट घर :
किल्ला पाहणीसाठी आलेल्या लोकांकडून ५ रुपये आकार इथे शासना तर्फे घेतला जातो.
तलाव :
या किल्यावर एक पाण्याचा तलाव आहे. त्यास काही लोक मुसलमान तलाव असे म्हणतात. तर काही शिवकाळात जादा पाणी साठवणीसाठी बांधलेला तलाव म्हणतात.
श्री शिव राजेश्वर देवालय :
छत्रपती शिवराय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे एक मंदिर बांधले आहे. ते मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन १६९५ साली बांधले आहे. या मंदिरात छत्रपती शिवरायांची बैठी प्रतिमा पाहायला मिळते. आजही या ठिकाणी जवळच छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ ताशा व नगारा वाजवला जातो. मात्र दर गुरुवारी फक्त नगारा वाजवला जातो. दर १२ वर्षांनी इथे रामेश्वर पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो.
म्युझियम :
या ठिकाणी बंद अवस्थेत एक म्युझियम आहे.
• किल्ल्यावरील वस्ती :
शिवकाळात गडावर काही मावळ्यांना वस्तीसाठी जागा दिल्या होत्या. त्यांचे वंशज आज ही इथे राहतात. जवळ जवळ १८ कुटुंबे तरी इथे आहेत. या ठिकाणी मांडलेले स्टॉल, व इतर सेवा ते पुरवतात. तसेच काही गाईडचे काम करतात. तर काही नोकरीनिमित्त मुंबईला आहेत.
• वैशिष्टपूर्ण नारळीचे झाड :
या ठिकाणी एका नारळीच्या बुंध्यातून दोन फांद्या फुटलेले नारळीचे झाड होते. पण वादळीवार्यात या झाडावर वीज पडून एका शाखेचे नुकसान झाले.
• महादेव मंदिर व गुप्त भुयारी मार्ग :
या ठिकाणी एक शिव मंदिर आहे. या मंदिरात एक विहिर आहे. सध्या ती बांधलेली आहे. पण शिवकाळात या ठिकाणाहून एक गुप्त भुयारी मार्ग होता. तो फक्त मोजक्याच सैन्यांना माहीत होता. तो मालवण पासून काही अंतरावर उघडतो. युद्ध काळात जर किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला तर या मार्गे स्त्रियांना व इतर मावळ्यांना सुरक्षित बाहेर काढता येत असे. हल्ली तो बंद आहे. अनेक इतिहास तज्ञांमते या ठिकाणी उत्खनन होणे गरजेचे आहे.
• सिंधुदुर्ग किल्ल्यातील पिण्याच्या पाण्याची सोय :
सिंधुदुर्ग किल्यावर पिण्यासाठी तीन विहिरी खोदल्या होत्या.
• साखरबाव : महादेव पिंडीच्या आकाराची ही विहीर आजही या विहिरीचे पाणी येथील नागरिक पिण्यासाठी वापरतात. जांभ्या दगडात बंदिस्त अशी रचना या विहिरीची आहे.
• दूधबाव : साखर बावीस लागूनच दुसरी दूधबाव विहीर आहे. पहिल्या विहिरी सारखीच या विहिरीची रचना आहे.
• दहीबाव : ही या ठिकाणची तिसरी विहीर असून ही सुद्धा बंदिस्त आहे. व हिचा ही आकार महादेव पिंडी सारखा आहे.
राजवाडा अवशेष :
दहीबावीपासून थोड्या अंतरावर राजवाडा होता. या ठिकाणी छत्रपती शिवराय, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांचे वास्तव्य होते. इंग्रजांनी हा वाडा व येथील बर्याच वास्तूंचे नुकसान केले आहे. आता फक्त इथे दोन राजवाड्याचे स्तंभ आहेत. त्या स्तंभावर हत्तीचे शिल्प आहे. व त्याच्या सोंडेवर सूर्यफुलाची नक्षी आहे.
• भवानीमाता मंदिर :
सिंधुदुर्ग किल्यावर एक कौलारू अवस्थेत असणारे एक भवानी देवी मंदिर असून. या मंदिरातील भवानी देवीची स्थापना शिवकालीन गड उभारणीवेळी केली गेली असावी असे मानले जाते. काळया पाषाणात ही मूर्ती आहे.
• टेहळणी बुरूज :
अत्यंत उंच असे तीन टेहळणी चिलखती बांधणीचे बुरुज इथे आहेत. या ठिकाणाहून संपूर्ण किल्याची देखरेख ठेवली जात असे.
येथून पुढे गेल्यावर आपल्याला एक काळा खडक लागतो. तो चुन्याचा खडक आहे. किल्ला बांधताना राहिलेला चुन्याचा ढीग तिथे होता त्याचे रूपांतर दगडात झाले.
• टेहळणी बुरूजावरुन दांडे समुद्र किनारा, पदामदुर्ग किल्ला, व विस्तीर्ण समुद्र पाहायला मिळतो.
• सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सूरक्षेसाठी छत्रपती शिवरायांनी राजकोट, पदमदूर्ग,सर्जेकोट या किल्ल्यांची बाजूस उभारणी केली होती.
• सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतागृहे :
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरुन जाताना पुढे तटबंदीस लागूनच स्वच्छ्ता गृहे बांधलेली दिसतात. जवळ जवळ ४० स्वच्छतागृहे बांधलेली आढळतात. यावरून स्वच्छते बाबत त्या काळी किती काळजी घेतली जात असे ते दिसते.
• अंधार कोठडी :
तटबंदीला लागूनच पुढे गेल्यावर एक अंधार कोठडी लागते. या ठिकाणी शत्रू व गुन्हेगार यांना डांबून ठेवले जात असे.
• किनारा दरवाजा :
किल्ल्यास लागूनच एक छोटा किनारी दरवाजा आहे. या ठिकाणी महाराणी तारबाई फिरायला येत असतं. या दरवाजाने समुद्र किनाऱ्यावर जाता येत असे. जर का शत्रू या दरवाजाने आत आला तर याच्या रचनेमुळे त्याला वाकून यावे लागत असे. व त्याला मारणे सोपे जात असे.
सिंधुदुर्ग किल्ला तटबंदी :
सागरी किल्ला बांधण्याचे शिवरायांनी ठरवले. त्यासाठी कोळी बांधवांना सांगितले. चार कोळी बांधवांनी कुरटे बेटाची ४८ एकराची जागा दाखवली. शिवरायांनी त्यांना जागा दाखवली म्हणून गावे इनाम दिली. त्या ठिकाणी जी तटबंदी असणारा किल्ला बांधला तो सिंधुदुर्ग होय. या किल्ल्यास ऐकूण तिन ते साडे तीन कि.मी. लांबीची तटबंदी बांधली आहे. या तट मध्ये जांभ्या व गारगोटीचे दगडाचा वापर केलेला आहे. तटबंदी ही समुद्री पाण्याच्या लाटेचा प्रवाह पाहून सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी नालाकृती बुरुजाची बांधणी केली आहे. ज्यामुळे लाटा दुभंगून जाते. व तटावर दाब लाटेचा कमी बसतो अन् तटाचे नुकसान होणार नाही. तसेच समुद्री लाटेच्या प्रवाहानुसार ती काही ठिकाणी नागमोडी रचनेची आहे.
तसेच तटाच्या बाहेरील बाजूस समुद्र्बुड खडक आहेत. त्यामुळे शत्रूची जहाजे ही किल्ल्याजवळ येवू शकत नाहीत.
या तटबंदीची उंची ही ३० ते ३५ फूट आहे. व रुंदी ही १० ते १२ फूट आहे. तटबंदी बांधताना सुरक्षेसाठी ५०० खंडी शिसे तटबंदीच्या पायात वापरले आहे.
जागोजागी तटावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. अशा ४२ ठिकाणी आपणास पायऱ्यांचे जिने दिसतात.
सिंधुदुर्ग किल्ल्याशी निगडित बाहेरील ठिकाणे :
• मोरयाचा दगड :
सिंधुदुर्ग किल्याची पायाभरणी करताना गणेश पूजा करताना मालवण किनाऱ्यापासून काही अंतरावर हा मोरयाचा दगड आहे. या ठिकाणी खडकात गणेशमूर्ती व दोन्ही बाजूस चंद्र व सूर्य यांची शिल्पे आहेत. या ठिकाणी पूजा करून छत्रपती शिवराय यांनी सिंधुदुर्ग तटाची पायाभरणी केली होती.
ब्रह्मानंद स्वामी समाधी :
मालवण पासून काही अंतरावर आचरा - देवगड मार्गावर ओझर या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामी समाधी आहे. तिथे गुहा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिव मंदिरातील गुप्त मार्ग या ठिकाणी खुला होतो.
हल्ली जंगली जनावरांच्या भीतीने या गुहा मुजवल्या आहेत. येथे ब्रह्मानंद स्वामी तपश्चर्या करत असत. त्यांची इथे समाधी आहे.
सिंधुदूर्ग किल्ल्याविषयी ऐतिहासक घडामोडी:
• २५ नोव्हेंबर १६६४ साली या किल्ल्याच्या बांधकामास छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने सुरवात केली गेली.
• इसवी सन १६६७ साली बांधकाम पूर्ण झाले.
• इसवी सन १६९५ साली शिवराजेश्वर मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधले.
• इसवी सनाच्या १८ व्या शतकात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
• इसवी सन १९६१ साली यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली.
• २१ जून २०१० साली भारत सरकारने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या किल्ल्याची नोंद घेतली.
• २२ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ साली साडेतीनशे वर्ष झाली म्हणून या ठिकाणी सिंधुदुर्ग महोत्सव आयोजित केला होता.
अशा या जलदुर्गास आपण एकदा तरी भेट द्यावी.
Sindudurg Fort information in marathi