राजमाची किल्ला माहिती मराठी
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगररांगेत स्थित राजमाची किल्ला आहे.
• उंची :
समुद्रसपाटीपासून हा किल्ला ८३३ मीटर उंचीवर आहे.
• डोंगर रांग :
सहयाद्री पर्वताच्या लोणावळा, खंडाळा या उपरांगेत राजमाची किल्ला आहे.
• मुंबई – पुणे रोडवरील लोणावळा या ठिकाणाहून १५ किलोमिटर अंतरावर राजमाची आहे.
• राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• पुणे – मुंबई मार्गावरील लोणावळा येथून तुंगार्ली मार्गे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावी तेथून किल्यावर हे अंतर १५ किलोमिटर आहे.
• रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून कोंदिवडे तेथून पुढे खरवंडी येथून पुढे पाऊल वाटेने खडा चढ चढून राजमाची वर जाऊ शकतो. खरवंडीपर्यंत गाडीवाट आहे.
• लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव तेथून पुढे फणसराई तेथून पुढे राजमाची जवळचे गाव उधेवाडी येथून पुढे राजमाची गडावर जाऊ शकतो. हा मार्ग थोडा कच्चा व थोडा पक्का असा आहे
• राजमाची किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• पुणे – मुंबई महामार्गावरील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणाहून आपण स्वतःच्या दोनचाकी किंवा चार चाकी गाडीने थोड्या कच्च्या-पक्क्या वाटेने राजमाची या गावी येतो. हे कोकण विभागातले एक सुंदर गाव. या ठिकाणी दोन एकमेका शेजारी दोन किल्ले उभा असलेले दिसतात. ते आहेत राजमाचीचे दोन बालेकिल्ले. एक श्रीवर्धनगड तर दुसरा आहे मणरंजनगड
• श्रीवर्धन गड :
राजमाची येथून आपणास समोर एक बेलाग् सुळका असलेला गड दिसतो. तो आहे श्रीवर्धनगड. राजमाची गावातून एक पायवाट या गडाच्या दिशेने जाताना दिसते. ही पायवाट दगडी चिरेबंदी बांधलेली दिसते.
• या वाटेने जाताना आपल्याला वाटेत एके ठिकाणी आपणास एक कात्याळ गुहा लागते. तिथे गेल्यावर आतील बाजूस पाण्याचे टाके पाहायला मिळते. तेथून पुढे ही वाट भैरवनाथ मंदिराकडे जाते.
• भैरवनाथ मंदिर :
तेथून पुढे चालत गेल्यावर आपणास एक मंदिर लागते. मंदिराच्या परिसरात सुंदर दीपमाळ, अश्व वीरगळ तसेच इतर देवतांच्या मुर्त्या आढळतात. तसेच दोन तोफा ही ठेवलेल्या दिसतात. भैरवनाथ ही देवता संकट नाश करणारी वीर हिंदू देवता. या मंदिराच्या समोरील बाजूस असणारी वाट ही श्रीवर्धन गडावर जाते. तर दुसरी मंदिराच्या मागील बाजूने आपणास मणरंजन गडाकडे घेऊन जाते.
• श्रीवर्धनगड
• दगडी पायरी मार्ग :
भैरवनाथ मंदिराच्या समोरील वाटेने चालत गेले असता आपणास एक सुरेख पायरी मार्ग लागतो. त्या वाटेने पुढे चालत गेल्यावर पुढे जसजसे वर चढून जाऊ तसतसे सुंदर बाजूच्या दरीचे दर्शन घडू लागते.
• काही अंतर चालून पुढे गेल्यावर कात्याळीं पायवाटेने वर चढून जावे लागते. अत्यंत खडा पण सुलभ चढ आहे हा. या मार्गाने आपण गडाच्या बुरुज व महादरवाजा पर्यंत पोहोचतो.
• बुरुज व महादरवाजा :
आजही सुस्थितीत असणारा पुढे संरक्षक बुरुज व त्याच्या आतील बाजूने गोमुख बांधणीचा रस्ता आपणास लागतो. या वाटेने पुढे आतील भागात आपणास एक भग्न अर्धवट पडलेला दरवाजा लागतो. तो आहे. गोमुख बांधणीचा दरवाजा हा जरी ढासळला असला तरी याचे अवशेष याची ऐतिहासिक भक्कमता दर्शवतात. या ठिकाणी पडलेल्या अवशेषात हेमाडपंथी बांधणीचे अवशेष पहायला मिळतात. नर व मादी दगड रचना दिसते. हा किल्याचा महादरवाजा आहे. याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्या पाहायला मिळतात. तसेच दिवे लावण्यासाठी छोट्या देवळ्या सुद्धा पहायला मिळतात. एका बाजूला उंच कडा तर दुसरीकडे भक्कम तटबंदी असणारी अरुंद वाट. या वाटेत पावसाळ्यात खूप पाणी साचते.
• पाण्याची टाकी :
येथून पुढे छोटासा पायरी मार्ग गडाच्या वरील भागात घेऊन जातो. पुढे आपल्याला कात्याळात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. ज्यातील पाणी मध्ययुगात गडावरील राहणाऱ्यांची गरज भागवत असे.
• खोदिव कात्याळ गुंफा :
किल्याच्यावरील भागाकडे जाताना वाटेत आपणास डोंगराचा एक कड्याचा भाग लागतो. संपूर्ण काळया कात्याळी कड्यात खोदलेल्या प्राचीन गुंफा लागतात. त्या गुंफा बाहेर बांधलेल्या भागाचे अवशेष पाहायला मिळतात. येथे लागोपाठ लागून तीन मोठ्या खोल्या खोदलेल्या पाहायला मिळतात. बाहेरील चौकट व सुरेख अशा छनी हातोडा वापरून तयार केलेल्या या खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत दिवे लावण्यासाठी देवळ्या तयार केलेल्या दिसतात.
• पडके वाडे व इमारतींचे अवशेष :
कात्याळ खोली पाहून आपण किल्याच्या वरील भागाकडे जाताना आपणास वाटेत बरीच झुडपे वाढलेली दिसतात. तेथून पुढे गेल्यावर आपणास काही इमारती, वाडे, सदर यांचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात येथील बऱ्याच इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. येथे पायाभूत इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. इमारतींच्या जोत्यावरून तत्कालीन वास्तूंच्या कल्पना येतात. राजे राजवाडे, शिपाई, सरदार यांच्या तसेच शिबंदीतील मावळ्यांसाठी येथे इमारती बांधलेल्या होत्या. तसेच बैठक सदर ही होती. ज्या ठिकाणी बऱ्याच राजकीय, युद्ध व अन्य घडामोडींवर चर्चा होत असे.
• शिवलिंग :
या ठिकाणी एक शिवलिंग ही पाहायला मिळते.
• तटबंदी :
काळाच्या ओघात किल्याची तटबंदी बऱ्याच ठिकाणी ढासळली आहे. पावसाळी दिवसात बऱ्याच प्रमाणात त्यावर गवत व तण वाढलेलं दिसतं. तरीदेखील बराच भाग अजूनही शाबूत असून तत्कालीन वैभवाच्या खाणाखुणा सांगतो. जागोजागी तटबंदीवर चढून जाण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या आहेत.
• कोकण दरवाजा :
गडाचा कोकण बाजूचा दरवाजा काळाच्या ओघात बराच नासधूस झालेला आहे. या बाजूने घोडी आणली जात असत.
• ध्वजस्तंभ :
थोडे पुढे एका टोकास गेल्यावर आपणास ध्वजस्तंभ लागतो. हा किल्याचा वरील भाग आहे. जेथे भगवा ध्वज जोमाने फडफडताना दिसतो.
• दुहेरी चिलखती बुरुज:
गडफेरी पूर्ण करत आपण शेवटी दुहेरी तटबंदी असणाऱ्या चिलखती बुरुजावर जाऊन पोहोचतो. संपूर्ण दगडात बांधलेला भक्कम चिलखती बुरुज आजही गडाची राखण करताना पाहायला मिळतो. या बुरुजात जागोजागी जंग्या व फांज्या पाहायला मिळतात.
• जंग्या :
ज्यातून किल्यावर आक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर बंदूक व बाणाने निशाणा साधता येतो.
• फांज्या :
ज्यामधून तोफेचा मारा करता येतो.
• भुयारी मार्ग :
चिलखती बुरुजाच्या दुहेरी तटबंदी मध्ये उतरून जाण्यासाठी बुरुजाच्या खालील बाजूस अत्यंत अरुंद असा भुयारी मार्ग आहे. त्यातून आपण खालच्या तटबंदीवर जाऊ शकतो.
• चोरवाट :
किल्यावर हल्ला झाल्यास किल्याच्या बाहेर सुरक्षित जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग देखील येथे पाहायला मिळतो. जो किल्याच्या बाहेर जाण्यासाठी मदत करतो.
• गुहा :
दुहेरी चिलखती बुरुजातून खाली उतरल्यावर आपण एका बाजूला चालत गेल्यास तिथे आपणास एक छोटीशी गुहा पाहायला मिळते.
• मोठे टाके :
दुहेरी चिलखती बुरुज पाहून परत जरा वाट वाकडी करून दुसऱ्या बाजूने जाताना आपणास एक मोठे टाके लागते. ज्यामध्ये स्वच्छ निर्मळ पाणी पाहायला मिळते. भर उन्हाळ्यात देखील येथे पाणी पाहायला मिळते.
• तेथून पुढे आपण थेट कात्याळ खोली जवळ येऊन पोहोचतो. व पुढे गड उतरणीस लागतो.
• श्रीवर्धनगड हा उंच जागी असल्याने या किल्ल्यावरील बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास ठाणे, पुणे जिल्ह्यातील सुरेख सहयाद्री पर्वताच्या लोणावळा खंडाळा रांगा व इतर ठिकाणांचे दर्शन घडते. यामध्ये लोहगड, तुंग, खंडाळा, माथेरान, सोमगिरी, मोरगिरी, ढाक, कोरीगड, घनगड, कर्नाळा, इशाळगड, प्रबळगड, नागफणीकडे, तसेच कातळदरा धबधब्याचे दर्शन घडते.
• दुहेरी तटबंदी :
या गडाला दुहेरी तटबंदी आहे. जी गडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधली गेली आहे.
• मणरंजन गड :
राजमाचीच्या समोर आपणास श्रीवर्धन गड व त्याच्या पलीकडे मणरंजन गड आपणास पाहायला मिळतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या उदेवाडी गावातून आपण या गडाकडे जाऊ शकतो.
• मोठे टाके :
उधेवाडी गावातून मणरंजन गडाकडे जाताना रानातील पायवाटेने पुढे गेल्यावर कात्याळामध्ये खोदले गेलेले एक टाके लागते. ज्याच्या मध्ये एक खांब देखील आहे.
• पूढे रान वाटेने चढून वर गेल्यावर आपणास जागोजागी खडकात खोदलेल्या पायऱ्या तसेच छोटी वाट लागते. त्या वाटेने जसजसे चढावे तसे गडाच्या खालील प्रदेशाचे सुरेख दर्शन घडते. पावसाळ्यात श्रावण महिन्यात तर गवत खूप वाढलेले असते. रंगीबेरंगी गवत फुलाने हा परिसर पाहण्यासारखा असतो.
• बुरुज :
चढून वरील बाजूस आल्यावर आपणास एक मोठा बुरुज लागतो. बुरुजाच्या बाजूने आपण आतील बाजूस गेल्यावर गोमुख मार्ग दिसतो.
• महादरवाजा :
गोमुख वळणाने आतमध्ये गेल्यावर आपणास किल्याचा कमानाकृती दरवाजा लागतो. सध्या कात्याळ चौकट उभी असून त्यावर सुरेख वरील बाजूस नक्षी पाहायला मिळते. कमानाकृती रचना व वर असणारी फुल नक्षी पहिल्यावर तसेच दरवाजाच्या चौकटीचे तासिव नात्रे बघून तत्कालीन शिल्पकाराने कौतुक करावेसे वाटते. दरवाजातून आतील बाजूस गेल्यावर सुंदर अशा पहारेकर्यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात. आजही महादरवाजा या किल्याची शोभा वाढवत उभा आहे.
• महादरवाज्यातून पुढे गेल्यावर आपणास पठारी चढ असणारा प्रदेश लागतो. पावसाळी दिवसात याठिकाणी गवताचे व त्यातील फुलांचे दर्शन घडते.
• छप्पर नसलेला वाडा :
पुढे चढून गेल्यावर आपणास एक वाडा आजही सुस्थितीत पाहायला मिळतो. त्याचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे. फक्त वरील बाजूस छप्पर पाहायला मिळत नाही. आतील बाजूस दगडी चौथरे, दरवाजाच्या वरील बाजूस सुंदर गणेश मूर्ती पाहायला मिळते. आतील दालन पाहिल्यावर त्याच्या तत्कालीन भव्यतेची कल्पना येते.
• पाण्याचे टाके/तलाव :
तेथून पुढे गेल्यावर आपणास एक मोठे पाण्याचे खोदलेले टाके लागते. ज्यातील पाणी आज उदेवाडी गावची पाण्याची गरज भागवते. भर उन्हाळ्यात देखील ते आठत नाही.
• पाणी टाके :
![]() |
पाण्याची टाकी |
पुढे चालत गेल्यावर आणखी पाण्याचे छोटेसे टाके लागते. गडाची तटबंदी व इतर बांधकाम करताना ही दगडे काढताना निर्माण केलेली दिसतात.
• तटबंदी :
किल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. पण दुर्लक्षित असल्याने बऱ्याच अंशी ढासळलेली पाहायला मिळते. त्यावर रान गवत उगवलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर दोन चार बुरुज सुस्थितीत असलेले पाहायला मिळतात.
• मणरंजन गड हा श्रीवर्धन पेक्षा लहान आहे. याच्या तटबंदीवरून सुरेख श्रीवर्धन गडाचे दर्शन घडते. इतकेच नाही तर ढाक, कर्नाळा, ईर्शाळगड, नागफणीकडे, प्रबळगड देखील पाहता येतो. येथून परत आलेल्या वाटेने गड उतरून आपण परतू शकतो. चढाई सोपी असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात.
• गोधनेश्वर मंदिर :
राजमाचीच्या दोन्ही बालेकिल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर आपण राजमाचीच्या पठारावरील गोधनेश्वर मंदिर दर्शन घेतल्याशिवाय हा प्रवास संपत नाही. या मंदिर परिसरात एक विशाल तलाव आहे. तलावाच्या पश्चिम बाजूस सुंदर असे हे हेमाडपंथी बांधणी असणारे गोधनेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरास विशेषत अनेक खांब आहेत. संपूर्ण काळया पाषाणात कोरलेल्या या खांबाची सुरेख रचना पहात राहावे असे वाटते. या मंदिरास लागूनच गोमुख व त्याखाली एक कुंड आहे. गोमुखातून कुंडात बारमाही पाणी पडत असते. गाभाऱ्यात सुरेख महादेव पिंड आपणास पाहायला मिळते. गो म्हणजे गाई हेच धन म्हणजे संपत्ती तिचे रक्षण करणारी देवता. म्हणजे गोधनेश्वर होय. हे मंदिर जमिनीमध्ये खोदून तयार केले आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडपात गणेश व नंदी देवता. यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते.
• कोंढाणे लेणी :
गोधनेश्वर देवाचे दर्शन घेऊन आपण जेव्हा कर्जत या ठाणे जिल्ह्यातील गावाकडे जाताना वाटेत कोंढाणे गावाजवळील डोंगराच्या कुशीत कोरीव गुहा आपणास पाहायला मिळतात. हे ठिकाण कोंढाणे गावाच्या आग्नेय बाजूस दोन किलोमीटर अंतरावर आहेत.
त्या ठिकाणी सुरेख व नाजूक कलाकुसर असलेली लेणी आहेत. ही बौद्ध धर्मातील हिनयान पंथाच्या अनुयायांनी निर्माण केली आहेत. या ठिकाणी चैत्यगृह देखील पाहायला मिळतात. तसेच धर्म प्रसारकांना रहाणेसाठी खोल्या देखील त्यावेळी तयार केल्या होत्या. सुरेख स्त्री- पुरुष शिल्पे वरील जाळीदार कमानाकृती नक्षी लक्षवेधून घेते. सदर लेणी ही इसवीसनाच्या पूर्वी २र्या शतकात निर्माण केली गेली.
• राजमाची किल्ल्याच्या विषयी ऐतिहासिक माहिती :
• राजमाची हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेलेला किल्ला आहे. या परिसरात आढळणारी लेणी व याच्या बांधकामात थोडेफार साम्य आढळते.
• त्यानंतर मुस्लिम राजवटीत हा किल्ला बहमनी राजवटीखाली आला.
• बहमनी राजवट नष्ट झाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत दाखल झाला.
• इसवी सन १६५७ साली हा किल्ला कल्याण प्रांत जिंकल्यावर छत्रपती शिवराय यांनी या किल्याचे व्यापारी स्थानावरील महत्त्व जाणून स्वराज्यात दाखल करून घेतला.
• इसवी सन १६८९ पर्यंत छत्रपती संभाजीराजे असे पर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता.
• इसवी सन १७०४ साली औरंगजेब बादशहाने स्वारी करून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात घेतला.
• लगेच मराठी मावळ्यांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला.
• इसवी सन १७१३ साली छत्रपती शाहू महाराज यांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला.
• इसवी सन १७३० साली हा किल्ला पहिल्या बाजीराव पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला.
• पुढे एक दोन संघर्ष सोडता हा किल्ला पेशवाईत राहिला.
• इसवी सन १८१८ साली झालेल्या ब्रिटिश मराठा युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
• २६ एप्रिल १९०९ साली ब्रिटिश सरकारने हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषीत केला.
• सध्या १९४७ सालानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• सोपी चढाई, सुरेख रचना यामुळे अनेक पर्यटक राजमाची किल्ला पाहायला येत असतात.
अशी आहे राजमाची किल्याची माहिती.
Rajmachi Fort information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l