Sunday, September 29, 2024

विशाळगड किल्ला माहिती : Vishalgad Fort information in marathi

 

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi
विशाळगड किल्ला माहिती : Vishalgad Fort information in marathi


विशाळगडाचे स्थान : 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात वायव्येस सह्याद्री पर्वतात कोकण सीमेवर अनुस्कुरा घाट व आंबा घाट यांच्या दरम्यान असणाऱ्या डोंगररांगेत विशाळगड ( खेळणा) किल्ला वसलेला आहे.

•  विशाळगडाची उंची : 

विशाळगड किल्ला हा समुद्र सपाटी पासून ११३० मीटर उंचीवर आहे.

• अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे.

• नावाप्रमाणेच या किल्ल्यास नैसर्गिकरित्या कवच लाभलेले आहे.

विशाळगड किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :

• हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात असल्याने कोल्हापूर पासून हा किल्ला ७६ किलोमिटर अंतरावर आहे.

• कोल्हापूर हे घाटी शहर असून ते रेल्वे, रस्ते व विमान सेवेने जोडलेले आहे. येथे जवळच उजळाईवाडी विमानतळ आहे.

रस्ते मार्ग :

• कोल्हापूर – रत्नागिरी रोड – शाहूवाडी – मलकापूर – गजापुर मार्गे विशाळगड.

• रत्नागिरी – साखरपा – अंबा घाट मार्गे मलकापूर – गजापुर मार्गे – विशाळगड.

• पुणे – कराड – पाचवड फाटा – शेडगेवाडी – कोकरुड – मलकापूर – गजापुर मार्गे विशाळगड.

विशाळगडावर पाहण्यासारखी ठिकाणे :

• विशाळगडाच्या पायथ्याशी वाहनतळ आहे. तेथून पार्किंग करून आपण गडाकडे जाऊ शकतो. गडाकडे जाताना वाटेत एक खोल दरी लागते. जिच्यावर हल्ली एक पूल बांधला आहे. तो पूल पार केल्यावर आपणास दोन मार्ग लागतात समोर एक खडा चढ असणारी शिडीची वाट तर दुसरी उजव्या बाजूला सोपी पायऱ्यांची वाट लागते. या वाटेने आपण गडाकडे जाऊ शकतो.

प्रवेशद्वार :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi

Vishalgad Fort information in marathi

पायरी वाटेने जाताना आपणास एक दरवाजा लागतो. ज्याचा हल्ली जीर्णोद्धार केला असून त्यावर सरळ चौकट आहे. पण छत नाही. त्याची रचना इतर किल्यापेक्षा वेगळी जाणवते. या दरवाजा पासून थोड्या अंतरावर दुसरा दरवाजा लागतो. या दोन दरवाजा मध्ये मोकळी जागा आहे. जी पहारेकऱ्यांसाठी विश्रांती घेण्यासाठी ठेवली असावी. या ठिकाणी असणाऱ्या ओट्यांचे नवीन बांधकाम केल्याचे दिसते. याच्या रचनेवरून जुन्या काळातील त्या दरवाजाच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो.

तोफ :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


दुसऱ्या दरवाजातून पुढे जाताच आपणास एक पायरी मार्ग पाहायला मिळतो. त्या मार्गाने पूढे गेल्यावर आपणास एक चौथरा पाहायला मिळतो. ज्यावर मध्ययुगीन काळातील एक तोफ ठेवलेली पाहायला मिळते. आजही ऊन, वारा, पाऊस सोसत ती भक्कम उभा आहे.

मुंडा दरवाजा :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


थोडे पुढे जाताच वरील बाजूस आपणास एक भक्कम अशा बुरुज व तटबंदीच्या बांधकामात भक्कम अशा स्थितीत असलेला एक दरवाजा पाहायला मिळतो. तो आहे मुंढा दरवाजा. ज्याची चौकट ही वरील बाजूस कमानाकृती आहे. ज्यावर सुरेख कमळ पुष्पे कोरलेली आहेत. या दरवाजा समोरच पुढे दरीचे दर्शन घडते.

• घोडखिंडीत पूर्वी घोड्यांचा बाजार भरत असे. तेथून खरेदी केलेली घोडी या विशाळगडावर आणून पागेत ठेवून त्यांना ट्रेनिंग दिले जात असे.

नरसोबा मंदिर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


गडावर फिरत असताना आपणास एक दगडी बांधकाम केलेले एक जुने मंदिर लागते. ज्याच्या चौकटीवर नर्सोबा मंदिर असे लिहिलेले अस्पष्ट आढळते. याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. आतील भागात मूर्ती नसून एक विशाल शिळा आहे. पण या मंदिराची रचना पाहता ते हेमाडपंथी बांधणीचे आहे. हे जाणवते.

अहिल्याबाई समाधी :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


इसवीसनाच्या सतराव्या शतकात छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आहिल्याबाई विशाळगडावर सती गेल्या होत्या. त्यांची समाधी याठिकाणी आहे. जी त्यावरील शिलालेखावरुन समजते.

भुयारी मार्ग :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


समाधीपासून पुढे गडावरील ठिकाणे पहात जाताना आपणास एके ठिकाणी जमिनीजवळ एक भुयार दिसते. वाकून या भुयारात जसजसे जावे तसे आतील भाग अत्यंत उंच आहे. एखादा माणूस उभा राहून जाईल. पुढे सुरक्षेसाठी ते मुजवलेले दिसते. स्थानिक लोकांच्या मते ते तेथील खोल दरीत उघडते. संकटकाळी या भुयारीमार्गाचा वापर गडावरील लोक करत असतं. हा मार्ग कोकण दरवाजापर्यंत जात असे.

अर्धचंद्र विहीर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


गडावर एक अर्धचंद्र आकाराची विहीर आहे. तिच्या सभोवती कठडा बांधला असून त्यामध्ये कमानी आहेत. त्यातील तीन कमानी बंदिस्त आहेत. व एका कमानीच्या पायऱ्यातून खाली उतरून विहिरीत जाता येते.

राजवाडा अवशेष :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


अर्धचंद्र अकाराच्या विहिरीपासून पुढे थोड अंतर चालत गेल्यावर आपणास राजवाड्याच्या वास्तूचे अवशेष पहायला मिळतात. अवशेषावरून त्या वास्तूची भव्यता दिसून येते. या वास्तूच्या आतील बाजूस अनेक दालने दिसतात. 

राजवाड्याच्या मध्यभागी पंतप्रतिनिधी यांच्या बैठका होत असत. त्यासाठी मध्यभागी चौक व सभोवती उंच ज्योत्ये असणारे बांधकाम आढळते.

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


आतील बाजूस एक चौकोनी आकाराची विहीर पाहायला मिळते. जिच्या आतील बाजूस सभोवती कमानाकृती देवड्या आहेत. राजवाड्यात लागणारी पाण्याची गरज ती पूर्ण करीत असे. आजही या विहिरींना भर उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते.

वाघजाई मंदिर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


गडावर एके ठिकाणी आपणास वाघजाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. आज ते भग्न अवस्थेत आहे. मंदिरातील मूर्तीं या मोडतोड झालेल्या व भंगलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात.

• गडावर पूर्वी लहान मोठी २१ मंदिरे होती. सध्या आपल्याला फक्त ११ मंदिरे फक्त पाहायला मिळतात. यवनी आक्रमणात ती नष्ट केली गेल्याचे समजते. तसेच नंतरच्या काळात या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्याचे समजते.

राम मंदिर :


दर्ग्याजवळची एक वाट राममंदिराकडे जाते. मंदिराच्या आतील गाभार्यामध्ये प्रभू रामचंद्र, सीता ,लक्ष्मण व हनुमंत यांची सुरेख मूर्ती पाहायला मिळते.

महादेव मंदिर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi

विशाळगड किल्ला माहिती :

विशाळगडावर महादेव मंदिर आहे. एकाच पाषाणात गंगा शंकर पार्वती व गणपती असलेली मुर्ती आपल्याला पाहायला मिळतात. शंकर देवाची दाढी व मिशा असणारी एकमेव मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. या मंदिराचे गर्भगृह हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. एका दगडात दुसरा दगड खोबणी करून बसवलेला पाहायला मिळतो. हे बांधकाम अतिप्राचीन असून ते यादवकालीन वाटते. या ठिकाणी एक शिलालेख असून तो देवनागरी लिपीतील असल्याचे जाणवते. पण गाभाऱ्याच्या बाहेरील सभामंडप हा नंतरच्या काळातील असून कालांतराने त्यात बदल केल्याचे जाणवते. या मंदिराच्या खिडक्या देखील दगडात घडवलेल्या दिसून येतात.

विठल रुक्मिणी मंदिर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आहे. याची बांधणी ही बाकीच्या मंदिरासारखीच आहे.

गणेश मंदिर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


या मंदिराच्या बाजूलाच एक गणेश मंदिर देखील पाहायला मिळते. गणेश मंदिराच्या बाजूला एक पुरातन शिवपिंड पाहायला मिळते.

अमृतेश्वर मंदिर :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


गडावर भ्रमंती करताना आपणास एक सुस्थितीत असलेले एक महादेव मंदिर पाहायला मिळते. ते अमृतेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार रंगरंगोटी केल्याचे पाहायला मिळते. या मंदिराबाहेर एक भग्न तोफेचा तुकडा पाहायला मिळतो. त्यावरून तिच्या पपूर्णत्वाची ऐतिहासिकदृष्ट्या कल्पना करता येते.

पाण्याची कुंडे :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


अमृतेश्वर मंदिरा पासून थोड्या अंतरावर एके ठिकाणी काही कुंडे बांधण्यात आली आहेत. ज्यामध्ये जवळील कड्यातून पाझरून पाणी येत असते. या कुंडातील पाण्याचा वापर स्नान तसेच पिण्यासाठी केला जात असावा.

बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


गणेश मंदिराजवळील वाटेने आपण खालील बाजूस चालत गेल्यावर आपणास बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहायला मिळते.

पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून जाताना घोडखिंडीत सिद्दी जोहरच्या सैन्यास ३०० बांदल मावळ्यांच्या मदतीने रोखून धरत छत्रपती शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोहचवले यावेळी बांदल व बाजीप्रभू देशपांडे व त्यांचा भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची स्वराज्य यज्ञ तेवत ठेवण्यासाठी आहुती दिली. त्यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ या ठिकाणी त्यांच्या समाध्या बांधलेल्या पाहायला मिळतात.

• बाजीप्रभू व फुलाजी प्रभू यांच्या समाधी पासून थोड्या अंतरावर एक बांधीव विहीर आहे.

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


• राजवाडा जवळून एक बांधीव सांडपाणी वाट केलेली दिसते. जी राजवाडा व इतर भागातील वापरलेले पाणी वाहून जाण्यासाठी केली होती. आज ती मुजलेली दिसते.

पातळदरी ओढा व कमानी पूल :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


गडावरून खालील भागात एक ओढा आपणास पाहायला मिळतो. तो पूढे एका दरीत कोसळताना दिसतो. त्यावर एक कमानाकृती पुल दिसतो. जो हल्ली थोडा ढा़सळलेला आहे. पण आज जवळजवळ तीनशे ते चारशे वर्ष झाली. त्याच्या कमानी चांगल्या अवस्थेत आहेत. व आजच्या बांधकाम पुढे एक आदर्श ठेवून आहेत.

टकमक टोक :

रायगड किल्याप्रमाणे याही ठिकाणी एक टकमक टोक पाहायला मिळते. ज्या ठिकाणी राज्यद्रोही तसेच इतर खतरनाक कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जात असे.


रेहानमलिक दर्गा :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


विशाळगड परिसरात एक दर्गा आहे. जो हजरत पिर रेहान मलिक दर्गा या नावाने ओळखला जातो. जे मुस्लिम समाजाचे एक प्रार्थना स्थळ आहे. येथे मुस्लिम समाजाचे लोक प्रार्थना करण्यास तिथे येतात. 

 रेहान मलिक दर्गा. या परिसरात अनेक वस्ती व दुकाने आहेत. पण या परिसरात येणारे भक्तगण व पर्यटक प्रचंड प्रमाणात प्रदूषण करत आहेत. व परिसर व किल्याचे पावित्र्य धोक्यात आणत आहेत.

तटबंदी :

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


विशाळगडाकडे दुर्लक्ष झाल्याने या किल्यावरील वास्तू तसेच तटबंदी ढासळलेली होती. हल्ली बऱ्याच ठिकाणी डागडुजी केल्याची दिसते.

• गडावर एके ठिकाणी आकाराने छोटेसे रामेश्वर मंदिर पाहायला मिळते. 

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


• गडावर रण मंडळ टेकडी पाहायला मिळते. ज्या ठिकाणी किल्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूस चांगलीच दमछाक करता येऊ शकते. व तो माघार घेण्यास प्रवृत्त होतो.


• कोकण दरवाजा :

या गडाला पश्चिम बाजूस एक दरवाजा होता. त्या कोकण दरवाजा म्हणतात. येथून आपणास पश्चिम बाजूस बाहेर पडता येत.

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


• गड दर्शन घेऊन आपण परत शिडी वाटेने खाली येऊ शकतो.

विशाळगड किल्याविषयी ऐतिहासिक घडामोडी :

• इसवी सनाच्या १२ व्या शतकात ११९० साली पाहिला राजा भोज याने विशाळगड उर्फ खेळणा किल्ला बांधला.

• कोल्हापूर या पेठेतून कोकणातील बंदराकडे होणाऱ्या अनुस्कुरा तसेच अंबा घाटातून होणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्याची बांधणी केली होती.

• दुसऱ्या राजा भोज याने येथील बऱ्याच भागाची डागडुजी केली.

• यानंतर हा किल्ला यादव राजवटीच्या ताब्यात आला.

• इसवी सन १४५३ साली बहामनी सेनापती मलिक उल् तुजार हा कोकणातील प्रदेश व किल्ले जिंकण्यासाठी आला. त्याने प्रचीतीगडावर हल्ला केला. व शिरक्यांना हरवून त्यांचे जबरदस्ती धर्मांतर करू लागला. तेव्हा शिरक्यांनी प्रथम खेळणा जिंकून आमचा शत्रू शंकरराव मोऱ्याची सुन्नत आधी कर मग आम्ही मुस्लिम होऊ असे सांगितले. व त्यास भुलवून खेळणा किल्याच्या परिसरात आणले. प्रारंभी जंगली दरे पाहताच हबशी सैन्याने पूढे जाण्यास नकार दिला. तेव्हा त्याने आपल्या इतर फौजेस घेऊन तो शिरक्यांबरोबर निघाला. प्रथम सुलभ वाटेने नेऊन विश्वास संपादन करून शेवटी खेळण्याच्या जंगलात अडचणीच्या ठिकाणी आणून त्यांना ठेवले. यामधे मलिक तूजारचे सैन्य बेजार झाले. व मलिक ही आजारी पडला. याचा फायदा उचलून मोऱ्यांशी संधान साधून शिर्क्यांनी मलिकच्या सैन्यावर छापा टाकून त्याची कत्तल केली.

• पुढे बहामनी सुलतानाचा दुसरा सेनापती मलिक रेहान याने सात वेळा हल्ला करून खेळणा उर्फ विशाळगड घेण्याचा प्रयत्न केला सातव्या वेळी तो जिंकला व विशाळगड हा बहामनी राजवटीत आला.

• बहामनी काळानंतर तो आदिलशाहीत आला.

• २८ नोव्हेंबर १६५९ साली हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणला.

• ३ मार्च १६६० साली पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून छत्रपती शिवराय सुखरूप ३०० मावळे घेऊन विशाळगड किल्ल्यास वेढा देणाऱ्या पालवनच्या दळवी व श्रृंगारपुरच्या सुर्वे यांचा वेढा फोडून विशाळगडावर आले. यावेळी गजापुरच्या खिंडित सिद्दीच्या सैन्यांची नाकेबंदी करून जोरदार झुंज बाजीप्रभू देशपांडे व बांदल मावळ्यांनी दिली व यामध्ये त्यांना विर मरण आले.

• छत्रपती शिवराय यांनी खेळणा या किल्याचे नामांतर विशाळगड केले. व या किल्याच्या दुरुस्तीसाठी ५००० होण खर्च केले.

• इसवी सन १६८६ साली शिरक्यांनी केलेले बंड मोडून काढण्यासाठी संभाजी राजांनी कवी कलशाच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. पण त्यास शिरक्यांनी पराभूत केले. व कलशाने विशाळगड गाठला.

• इसवी सन १६८९ साली छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर दौऱ्यावर असताना ते पन्हाळा, विशाळगड मार्गे परत रायगडी जात असताना वाटेत संगमेश्वर येथे औरंगजेब सेनापतीने छापा टाकून त्यांना धोक्याने पकडले. व पुढे हाल करून मारले.

• इसवी सन १७०१ साली छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी अहिल्याबाई या विशाळगडावर सती गेल्या.

• डिसेंबर १७०१ साली औरंगजेबाने विशाळगडावर हल्ला केला. किल्लेदार परशुराम पंत यांनी सहा महिने लढा देवून ६ जून १७०२ रोजी सुरक्षेची हमी व दोन लाख रुपये घेऊन किल्ला ताब्यात दिला.

• औरंगजेब बादशहाने या किल्याचे नाव सरवरलना ठेवले.

• इसवी सन १७०७ साली महाराणी ताराबाईंनी परत विशाळगड ताब्यात घेतला.

• पुढे हा किल्ला करवीर राजवटीच्या ताब्यात होता.

• इसवी सनाच्या १८४४ साली हा किल्ला इंग्रजांनी हल्ला करून जिंकला व येथील अनेक इमारती व तटबंदी उध्वस्त केली.

• आज हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.

विशाळगड किल्ला माहिती :  Vishalgad Fort information in marathi


अशी आहे विशाळगड उर्फ खेळणा किल्याची माहिती.

Vishalgad Fort information in marathi


No comments:

Post a Comment

यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...