देवगिरीचा किल्ला (दौलताबाद किल्ला) किल्ला माहिती
Devgiri Fort information in marathi
दक्षिण भारत प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून मान्यता पावलेला मध्य महाराष्ट्रातील एक गिरिदुर्ग म्हणजे देवगिरी. अत्यंत जुना व आपली इतिहासात एक वेगळी छाप या किल्ल्याने सोडली आहे. ज्यास युद्धात जिंकणे केवळ अशक्य, जिंकले असेल तर फक्त फंदफितुरीने.
![]() |
देवगिरीचा किल्ला (दौलताबाद किल्ला) किल्ला माहिती Devgiri Fort information in marathi |
• महाराष्ट्र राज्यातील सात आश्चर्यात ज्याचा समावेश आहे तो म्हणजे 'देवगिरीचा किल्ला '
• सभासद बखरीत उल्लेख खालील प्रमाणे,
‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरचा सकोट दुर्ग खरा,पण उंचीने थोडका’
• देवगिरी किल्यावर जाण्यासाठी मार्ग :
देवगिरी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यात असून संभाजीनगर पासून याचे अंतर १५ किलोमीटर आहे.
• संभाजीनगर ( औरंगाबाद) हे ठिकाण महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात येते. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालते. तसेच हे ठिकाण अन्य रस्त्यांद्वारे महाराष्ट्र तसेच इतर राज्यास जोडले गेले आहे. तसेच या ठिकाणी रेल्वेने देखील जाता येते. या ठिकाणी आल्यावर बस किंवा खाजगी वाहनाने आपण देवगिरी किल्ला पाहायला जाऊ शकतो.
• देवगिरी किल्यास् दौलताबाद किल्ला, सुरगिरी या नावाने देखील ओळखले जाते.
• देवगिरी किल्यावर पाहण्यासारखी स्थळे :
• महाकोट व महाद्वार:
![]() |
देवगिरीचा किल्ला (दौलताबाद किल्ला) किल्ला माहिती Devgiri Fort information in marathi |
संभाजीनगर येथून आपण वेरूळच्या लेण्याजवळून पुढे देवगिरी किल्ल्याजवळ पोहोचतो. तेथील प्रवेश शुल्क भरून आपण फरसबंदीवरून चालत किल्याच्या प्रथम दरवाजा जवळ येऊन पोहोचतो. उंच व भव्य असा दरवाजा लागतो. ज्याच्या बाजूस भव्य अशी तटबंदी व बुरुज पाहायला मिळतो. हा किल्याचा प्रथम भाग असून यास महाकोट असे म्हणतात. या ठिकाणी असणाऱ्या दरवाजाची दारे ही जवळ जवळ नऊशे वर्ष जुनी असून त्यावर सुरक्षेसाठी लोखंडी कवच खिळ्यात लावले आहे. तसेच त्यावर हत्ती, उंट यांचा मारा होऊ नये म्हणून टोकदार पोलादी खिळे मारलेले आहेत.
• धर्मशाळा इमारत देवड्या :
महाकोट दरवाजातून आत आल्यावर आपल्याला आतील बाजूस पहारेकरी निवास व्यवस्था दिसून येते. तेथून पुढे गोमुख बांधणी रचना पाहायला मिळते. जर का शत्रूने मुख्य द्वार जिंकले तर पुढे वेगाने येता येवू नये यासाठी अशी रचना केल्याचे जाणवते. तेथून पुढे एक मोठा चौक लागतो. ज्याच्या भोवती अनेक देवड्या पाहायला मिळतात. ज्या बाहेरून आलेल्या लोकांना विश्रांती तसेच त्यांची तपासणी करण्यासाठी त्या काळी बांधल्या गेल्या होत्या. राजास भेटायला येणार लोक येथे विसावा घेत असत. आज त्यांमध्ये तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात. प्रत्येक तोफ वेगवेगळ्या बांधणीची तसेच घडण असणारी दिसून येते.
भिंतीत घुसलेले तोफगोळे :
अनेक तोफा असणाऱ्या चौकातील भिंतीत अनेक तोफगोळे अडकलेले पाहायला मिळतात. जे काढताना फुटू नये म्हणून तसेच ठेवलेले किल्ल्यातील तटबंदीत अडकलेले पाहायला मिळतात.
• बावन्न दरवाजे :
देवगिरी किल्ल्यास बावन्न दरवाजे असलेले पाहायला मिळतात. यातील बरेचसे दरवाजे फसवे आहेत. शत्रूला चकवा देण्यासाठी बनवले गेल्याचे दिसतात. जे भिंतीतील कपाटाचे तर काही उघडताच खोल ६० ते ७० फूट खड्यात प्रवेश करताच पडणारे आहेत.
• दुसरे महाद्वार :
किल्यात थोडे पुढे गेल्यावर आपणास दुसरे महाद्वार लागते. त्याची रचना वरील दरवाजा सारखी आहे. हा देखील ९०० वर्षापूर्वीचा दरवाजा असावा.
• रण मंडळ स्थान:
दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर काटकोन वळणाचा मार्ग लागतो जो उंच बुरुज व तटबंदी जवळून जातो. ज्याच्यावर बुरुज तसेच तटबंदीवर थांबून येणाऱ्या शत्रूवर हल्ला करता येऊ शकतो. दगड, बाणांचा वर्षाव करता येऊ शकतो. हे एक रणमंडळ स्थान आहे. येथून पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा व एक काटकोन वळणाचा रस्ता आहे. जे दुसरे रण मंडळ स्थान आहे. जेथून जाते वेळी हल्ला करणाऱ्या शत्रूचा वेग कमी होऊन त्याचा वेध घेता येऊ शकतो. तसेच या मार्गावरून पुढे आणखी एक दरवाजा लागतो.
• हत्ती कुंड :
पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याचा मोठा कुंड लागतो. जो जवळ जवळ वीस फूट खोल असेल. या ठिकाणी सैनिकांना पोहण्याचे तसेच हत्ती, उंट, घोडे यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी याचा वापर केला जात असे.
• भारत माता मंदिर प्रांगण :
हत्ती कुंड जवळच आपणास भारत माता मंदिराचे प्रांगण पाहायला मिळते. अत्यंत विस्तृत असे हे प्रांगण असून सभोवती बाजारपेठेसाठी बनवलेली देवड्यांची रचना पाहायला मिळते. या ठिकाणी पूर्वी बाजार भरत असे. देश विदेशात होणाऱ्या व्यापाराचे हे एक केंद्र होते.
भारत माता मंदिर :
प्रांगणाच्या पुढील बाजूस आपणास भारत मातेच भव्य मंदिर पाहायला मिळते. ज्या ठिकाणी अनेक स्तंभ पाहायला मिळतात. विस्तृत सभामंडप, अनेक स्तंभावर उभे मंदिर व आतील बाजूस सुरेख भारत मातेची मूर्ती आपणास पाहायला मिळते. भारतातील हे एकमेव भारत मातेचं मंदिर आहे. इसवी सन १९४७ नंतर भारत सरकारने या ठिकाणी असणाऱ्या या मंदिरात भारत मातेची मूर्ती स्थापन केली.भारतमाता मंदिरात यादव काळात संगीत, शास्त्र, नृत्य यांची साधना केली जात असे. याची बांधणी हेमाडपंथी असून यादवांच्या वैभवाचे दर्शन देते.
• चार मिनार :
भारतमातेच्या मंदिरापासून पुढे गेल्यावर आपणास एक उंच चार मजली मिनार व त्या खाली चांदमहाल पाहायला मिळतो. हा परिसर सुंदर अशा बागेन नटलेला आहे. ही मिनार २०० फूट उंच असून इसवी सन १४३५ साली अल्लाउद्दीन बहमनी याने तिची निर्मिती केल्याचे समजते. परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी तिची निर्मिती केली असावी.
• कालाकोट महाद्वार :
चार मिनार पासून पुढे आल्यावर आपल्याला कालाकोट महाद्वार लागते. ज्याला मृत्यचा दरवाजा किंवा मृत्यूचा सापळा देखील म्हंटले जाते. जेथून आत प्रवेश केल्यावर अनेक फसवे दरवाजे, तसेच चक्रव्यूह रचना असणाऱ्या वाटा आहेत. येथून पुढे किल्याचा आतील मार्ग अत्यंत कठीण आहे. येथे शत्रू येऊन चकव्यात फसतो.
• कालाकोटच्या बाहेर एक प्राचीन मंदिर आहे. ज्यामध्ये आज मूर्ती नाही आहे. याची बांधणी हेमाडपंथी असून ते यादवकालीन वैभवाची साक्ष देते.
• मुघल कालीन कर रांजण :
काळाकोट दरवाजातून आत आल्यावर आपणास बाजूला असणाऱ्या एका देवडीत एक दगडी रांजण पुरलेला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी व्यापारी तसेच इतर कर गोळा केले जात होते. इतकेच नाही तर अशी रांजणे अनेक आपणास पाहायला मिळतात. जी कर गोळा करण्यासाठी मध्ययुगात मोघल राजवटीत वापरली जात होती.
• चिनी महाल :
देवगिरी किल्यातील कालाकोटाच्या आतील बाजूस पुढे चालत गेल्यावर एक महाल लागतो. त्यास चिनी महाल असे म्हणतात जो चिनीमाती पासून बनवला गेला आहे. ज्याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जात होता. या ठिकाणी अनेक हिंदू, तसेच मोघल राजांना तसेच सरदार, उमराव यांना कैद करून ठेवले जात असे.
• मेंढा तोफ बुरुज :
चिनी महाल पाहिल्यावर आपण किल्याच्या आतील भागात आलो की एक उंच भक्कम असा बुरुज लागतो. त्या बुरुजावर एक मोठी तोफ आहे. तिच्या खालील बाजूस मेंढा या प्राण्यांच्या तोंडाची आकृती कोरलेली दिसते. म्हणून तिला मेंढा तोफ असे देखील म्हणतात. या तोफेची मारक क्षमता खूपच मोठी आहे. म्हणून या तोफेस किल्ला शिखर तोफ देखील म्हणतात. याचा अर्थ आहे. किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ असे देखील म्हणतात.
• खंदक :
येथून पुढे आपल्याला मुख्य किल्यात प्रवेश करण्याआधी एक खोल खंदक लागते. जे ७० फूट रुंद व ८० फूट खोल आहे. यामध्ये पाणी असून. पूर्वी यामध्ये मगरी व सापांचे वास्तव्य होते. व येथून मुख्य किल्ल्यास संपर्क करण्यासाठी एक चामडी पुल मध्ययुगात होता. जो शत्रू हल्यावेळी दोरखंड कापून बंद केला जात असे. व किल्याचा संपर्क बंद केला जाई. व या खंदकाच्या आतील बाजूस उंच कात्याळ नैसर्गिक कडा आहे. व त्यावर हा किल्ला उभा असलेला पाहायला मिळतो. ज्यावर चढणे केवळ अशक्य
• दगडी जिना :
औरंगजेब बादशहाने या खंदकाच्या आतील भागात जाण्यासाठी दगडी जिना मार्ग तयार केला होता. तो आजही अस्तित्वात आहे. तसेच हल्ली एक लोखंडी पूल देखील बांधलेला दिसून येतो. ज्याने किल्यात जाणे सुकर झाले आहे.
• किल्याच्या आतील लहान प्रवेशद्वार :
खंदक पार केला तरी देखील शत्रूला किल्ला घेणे अवघड होते. कारण आतील बाजूस किल्ला हा डोंगरातील खडक पोखरून त्यात मार्ग व चकवा देणाऱ्या खोल्या केल्याचे दिसते. येथून पुढे एक अरुंद वाट पाहायला मिळते. जीच्यातून संपूर्ण अंधार पाहायला मिळतो. ज्यातून गुप्तपणे हल्ले देखील करता येतात. व शत्रुची अडवणूक देखील करता येते. येथून पुढे आल्यावर एक मोकळे आवार लागते. जेथील छप्पर तुटलेले आहे. नाहीतर हा संपूर्ण अंधारी मार्ग किल्यावर जाण्यासाठी होता.
• टुरिस्ट शिडी मार्ग :
किल्याच्या चकव्यामार्गात किल्ला पाहायला आलेले लोक फसू नयेत म्हणून भारत सरकारने या छप्पर पडलेल्या खुल्या भागात एक जिना निर्माण केला आहे. ज्याच्या साहाय्याने पर्यटक फसव्या वाटेत न अडकता थेट किल्याच्या वरील भागात जाऊन पोहोचू शकतात.
• चोर वाट :
एखादा शत्रू किल्याच्या वरील भागात येताना जवळील चोरवाट वापरून जर का आला. तर त्याची गर्दन मारून जवळील अरुंद वाटेने नेहुन त्याला खंदकात फेकता येवू शकेल अशी सापशिडी सारखी रचना या किल्याच्या आतील बाजूस आढळते.
• यादवकालीन चकवा चक्रव्यूह :
किल्याचा आतील भाग डोंगर पोखरून आतील बाजूस अनेक चकवा देणारे चक्रव्यूह बनवले गेलेले आहेत. त्यामुळे अनेक शत्रू सैन्य या चकव्यात फसतात. व हे मार्ग एका ठिकाणी एकत्र येतात. या ठिकाणी संपूर्ण अंधार असे. त्यामुळे अनेक शत्रू सैन्य यामध्ये अडकून एकमेकाशी लढून मरण पावत. किल्याच्या सुरक्षेसाठी अशी रचना यादव काळात केली गेली होती. येथून एक वाट किल्याच्या वरील बाजूस येते जी संकटकाळी बंद केली जात असे. किंवा त्यातून विषारी वायू धूर सोडून शत्रू सैन्यास गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला जात असे.
• गणेश मंदिर :
चकव्यातून वर आल्यावर पायरी मार्गाने वर चढुन गेल्यावर किल्याच्या वरील बाजूस एक मंदिर लागते. ते गणेश मंदिर आहे. जे एकमेव हिंदू मंदिर सुस्थितीत या किल्यावर आहे.
• बारागिरी महाल :
किल्याच्या अत्यंत वरील भागात आपल्याला एक महाल पाहायला मिळतो. तो बारागीरी महाल आहे. अत्यंत सुरेख बांधणी असणारा हा महाल बादशहा शहाजहान याने बांधला असून बादशहास लागेल अशा सोयींनी सज्ज असा हा महाल आहे. उंच जागी असल्याने या ठिकाणी अत्यंत शांत व थंड वारे वाहते.बारागीरी महालाच्या आत राहण्यायोग्य सुखसुविधा तसेच स्नानगृह ही पाहायला मिळते.
• काली टेकडी गुंफा :
किल्याच्या वरील भागात एक काली टेकडीचा भाग आहे. येथे संत एकनाथांचे गुरू जनार्दन पंत यांची समाधी पाहायला मिळते. ती एका बंधिस्त गुहेत असून आपणास एका छोट्या खिडकीतून दर्शन घ्यावे लागते.
• दुर्गा तोफ ( धूळधाण तोफ)
किल्याच्या वरील टोकास एक अत्यंत मोठी पंचधातूने बनलेली तोफ पाहायला मिळते. तिचा आवाका खूप मोठा आहे. अत्यंत लांब पल्याची मारक क्षमता असणार्या या तोफेची धास्ती शत्रूस असल्याने. डेरा टाकताना शत्रू किल्ल्यापासून लांब टाकत असे. एखादा कोट आपल्या एका माऱ्यात धुळधाण करण्याची क्षमता या तोफेत आहे.
देवगिरी किल्ला कधीही कोणीही युद्धात जिंकला नाही. तो फंद फितुरीने जिंकला गेला. या किल्ल्यास देवगिरी, इंद्राची अंबरी, दुर्गम अंबरकोट, निजामशाही वजीर, महाकोटा, कालाकोट किल्ला या नावाने देखील ओळखले जाते.'
• देवगिरी किल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• देवगिरी हा किल्ला अत्यंत प्राचीन असून या ठिकाणी अनेक हिंदू राजांनी राज्य केले. त्यामधे बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मोर्य घराणे, शुंग, सातवाहन, शक, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट या प्राचीन राजवटीच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने इसवी सन ७५६ ते इसवी सन ७७२ या काळात देवगिरी किल्ला बांधला.
• इसवी सनाच्या १२ व्या शतकात या ठिकाणी यादव घराण्याची सत्ता होती. यादव राजा पाचवा भिल्लम याने देवगिरी वर आपली राजधानी नेली.
• भिल्लामा नंतर या राजवटीतील सिंघण राजा, त्यानंतर त्याचा नातू कृष्ण राजा झाला, कृष्ण राजानंतर त्याचा भाऊ महादेव, महादेव नंतर त्याचा पुत्र आमण्णा राजा झाला. पण कृष्ण राजाचा वारसदार त्याचा पुत्र रामचंद्र याने बंड करून सत्ता हस्तगत केली. रामचंद्र हा येथील शेवटचा हिंदू राजा झाला.
• इसवी सनाच्या १३ व्या शतकाच्या सुरवातीला अल्लाउद्दीन खिलजी याने अचानक स्वारी देवगिरीवर केली. त्यावेळी किल्यातील सैन्य कमकुवत होते. धान्य किल्ल्यातील संपले तेव्हा राजा रामचंद्र याने तह केला. त्यावेळी दुसरीकडे स्वारीवर गेलेले सैन्य घेऊन राजपुत्र शंकरदेव हा चाल करून आला. युद्ध चालू असताना जादा कुमक येत आहे अशी अफवा अल्लाउद्दीन खिलजीने पसरवली व शंकरदेवच्या सैन्याने माघार घेतली. व अशा पद्धतीने धोक्याने अल्लाउद्दीन खिलजीने विजय मिळवून तह घडवून बरीच लूट मिळवली. अनेकांना गुलाम बनवले. व तो दिल्लीला गेला.
• या स्वारी नंतर देवगिरीच्या यादवांचे महत्त्व लयास गेले परत मलिक काफूर याच्या स्वारीमुळे १३१० साली यादव सत्ता पूर्ण लयास गेली.
• अल्लाउद्दिन खिलजी नंतर मुहम्मद तुघलक याने आपल्या सुलतान असतानाच्या कारकीर्दीत त्याने आपली राजधानी १३२६ साली दिल्लीहून देवगिरीला (दौलताबाद) हलवली. पण प्रशासकीय तसेच भौगोलिक खडतर वास्तव्यामुळे त्याने पुन्हा राजधानी दिल्लीला हलवली. याच काळात या किल्याचे नाव दौलताबाद ठेवले गेले. व पंचधातूने बनलेली धूळधाण तोफ अफगाणी करागिरांकडून बनवली गेली.
• इसवी सन १३४७ पासून हा किल्ला अल्लाउद्दिन हसन गंगू बहामनी याच्या ताब्यात आला.
• पुढील काळात बहामनी सत्तेचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या निजामशाहीत हा किल्ला दाखल झाला.
• निजामशाही १६३६ साली नष्ट झाल्यावर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. या ठिकाणी मुघल बादशहा शहाजहान याचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्याने बारगीर महाल बांधला
• इसवी सनाच्या १७ व्या शतकाच्या अखेरीस औरंगजेब बादशहाचे वास्तव्य होते.
• मुघलांच्या नंतर हा किल्ला हैद्राबाद निजामाकडे होता. १९५० साली निजामाचे राज्य खालसा केल्यावर हा स्वतंत्र भारतात किल्ला दाखल झाला.
• इसवी सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारताच्या ताब्यात आला. इसवी सन १९५० साली या ठिकाणी भारतमाता देवीची मूर्ती स्थापन केली आहे.
• २८ नोव्हेंबर १९५१ साली या किल्यास् राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
• हल्ली हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.
अशी आहे देवगिरी(दौलताबाद) किल्याची माहिती.
Devgiri Fort information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l