भुदरगड किल्ला माहिती व इतिहास
Bhudargad Fort information in marathi
![]() |
भुदरगड किल्ला माहिती व इतिहास Bhudargad Fort information in marathi Histri |
भुदरगड स्थान :
कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी शहरापासून जवळच सह्याद्री पर्वतातील उप दूधगंगा (चिकोडी) डोंगररांगेत दिमाखात उभा असणारा शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधलेला गिरिदुर्ग म्हणजे भुदरगड.
भुदरगड किल्ल्याच्या पश्चिम व उत्तर बाजूस वेदगंगा नदीचे विस्तीर्ण खोरे आहे. पूर्व बाजूस चिकोत्रा नदी वरील नागणवाडी प्रकल्प व चिकोत्रा नदी खोरे. दक्षिण बाजूस विस्तीर्ण म्हातारीचे कामत नावाचे पठार. व या सर्वांच्या मध्ये डोंगरावर किल्ले भुदरगड वसलेला आहे.
भुदरगड किल्ला उंची :
भुदरगड किल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून उंची ही ३१९० फूट असून विस्तीर्ण पठार असणारा हा किल्ला आहे.
हे पठार जवळ जवळ ८०० मीटर लांब तर ७०० मीटर रुंद आहे.
भुदरगड किल्ल्यास जवळ असणाऱ्या वस्ती/ गावे:
भुदरगड किल्याच्या पायथ्याला राणेवाडी, माडेकरवाडी, कदमवाडी, पेठ शिवापूर, शिंदेवाडी, वरेकरवाडी, जकीन पेठ, गडबिद्री, वरपेवाडी, बारवे, मुरुक्टे, पुष्पनगर ही गावे आसपास वसलेली आहेत.
• भुदरगड किल्यावर जाण्यासाठी मार्ग :
भुदरगड किल्यावर जाण्यासाठी गडाच्या आतपर्यंत डांबरी सडकेने जाता येते.
कोल्हापूर ते किल्ले भुदरगड हे अंतर ६१ किलोमीटर आहे.
• कोल्हापूरपासून गारगोटी ५० किलोमीटर अंतरावर तेथून पुष्पनगर मार्गे सरळ डांबरी मार्गाने राणेवाडी पेठशिवापुर मार्गे ११ किलो मीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे.
• गारगोटी – पालमार्गे – बार्वे – पेठ शिवापुर मार्गे किल्ले भुदरगडला जाता येते. हे अंतर १५ किलोमीटर भरेल.
• गडहिंग्लज – उत्तुर – पिंपळगाव – दिंडेवाडी – बारवे मार्गे किल्ले भुदरगडला जाता येते.
• भुदरगड किल्यावर पहाण्यायोग्य ठिकाणे :
भुदरगड किल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणांमध्ये हनुमान मंदिर, भैरवनाथाचे मंदिर, शिव मंदिर, महादेव मंदिर, पोखरधोंडी,पूर्व दरवाजा अवशेष, जखुबाई मंदिर, दुधी तळे, लहान तळे, तटबंदी, तोफ, भुयार, धान्य कोठी हौद इत्यादी.
• हनुमान मंदिर :
भुदरगड किल्याच्या उत्तरेच्या तटाखाली असणाऱ्या पेठ शिवापूर गावातून गडाकडे येताना रस्त्याच्या उजव्या बाजूस बाहेरील तटबंदी खालील बाजूस एक हनुमान मंदिर पाहायला मिळते.ते अती प्राचीन. असून हनुमंत ही देवता बलोपासनेचे प्रतीक आहे.
गुप्त भुयारी मार्ग :
भुदरगड किल्याच्या हनुमान मंदिरापासून पुढील बाजूस झाडीतून तटा खालील बाजूपासून एक भुयारी मार्ग गुप्त रित्या असल्याचे सांगितले जाते. हा मार्ग पाल या गावातील घनदाट राईत खुला होतो. असे सांगितले जाते. सुरक्षेसाठी सद्या हा मार्ग बंद केला आहे. मुजवला आहे. या मार्गाचा वापर जर गडावर हल्ला झाला तर किल्यावर रसद पोहोचवण्यासाठी केला जात असे. तसेच किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला. तर सुरक्षित बाहेर जाता येत असे.
• शिलाहार राजा भोज दुसरा पाल या ठिकाणी शिकार करण्यास जात असे. तो त्या ठिकाणी पाल म्हणजे झोपडी बांधून राहत असे. म्हणून त्या ठिकाणास पाल हे नाव पडले.
• भैरवनाथ मंदिर :
हनुमान मंदिराच्या पासून वर गडावर गेल्यावर आपणास डांबरी रस्त्याने थेट भैरवनाथ मंदिरापर्यंत जाता येते. या गडावरील हे प्राचीन मंदिर असून ते हेमाडपंथी बांधणीचे आहे. लाल चिर्यात सुंदर सभामंडप आतील बाजूस दोन मोठी दालने आहेत.
त्या आतील बाजूस गाभारा असून गाभाऱ्यात काळया पाषाणात कोरलेली सुरेख भैरवनाथाची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूस यात्रेकरूंना राहण्यासाठी ओवऱ्या आहेत. हा किल्ला जेव्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. तेव्हा मुघलांची पताका या मंदिरास दान केली. ती आजही येथे पाहायला मिळते. मंदिराच्या पुढील प्रांगणात अनेक लहामोठ्या देवी देवतांच्या भग्न मूर्ती पाहायला मिळतात. त्या पुढील बाजूस दोन उंच दीपमाळा आपणास पाहायला मिळतात. दरवर्षी माघ कृष्ण नवमीला येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येतात.
तोफगाडा :
भैरवनाथ मंदिरा पुढे दीपमाळेच्या पुढील बाजूस एक तोफगाडा असून तो एका चिरेबंदी चौथर्यावर ठेवला आहे. त्याच चौथर्याच्या एका बाजूस तोफ गाड्याला लावायची जुनी भग्न दगडी चाके ही पाहायला मिळतात. येथून पुढील बाजूस वेदगंगा नदी व तिच्या खोऱ्याचा प्रदेश पाहायला मिळतो. तसेच गारगोटी शहराचे दर्शन ही घडते.
भुदरगड किल्ला तटबंदी :
या किल्याची तटबंदी अत्यंत भक्कम अशी आहे. हल्ली या किल्यावरिल तटबंदीचे बांधकाम दुरुस्ती करण्यात आली आहे. जागोजागी टेहळणीसाठी बुरुज, तटावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत, जागोजागी असणारे प्राचीन दरवाजे मुजवले गेलेले दिसतात. तटाच्या बाजूस काही अंतराने जागोजागी स्वच्छतागृहे पाहायला मिळतात.
चोरवाट:
तसेच तटाबाहेर जाण्यासाठी चोरवाटा देखील आहेत. पण सुरक्षेच्या कारणास्तव आता बंद केल्या आहेत.
चिलखती बुरुज दुहेरी बुरुज :
किल्याच्या तटबंदीस दुहेरी बांधणीचा टेहळणी साठी बांधलेला चिलखती बुरुज आहे.
पुरातन वाड्याचे अवशेष :
भैरवनाथ मंदिरापासून थोडे पुढे आल्यावर एका बाजूला आपणास जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.
धान्य कोठार खुला हौद :
भैरवनाथ मंदिरा जवळील बाजूस थोड्या अंतरावर आपणास खुले बांधीव चौकोणी धान्य कोठाराचा हौद दिसतो. पूर्वी तो बंदिस्त झाकलेला होता. हल्ली फक्त बांधीव बांधकाम दिसून येते. तो खोल जमिनीत आहे. येथे पूर्वी धान्य ठेवले जात असे.
गडावर लागणा-या शिबंदीसाठी या धान्याचा तसेच इथे राहणाऱ्या लोकांची अन्नाची गरज भागवण्यासाठी या ठिकाणी धान्य साठा केला जात असे.
सदर :
भैरवनाथ मंदिरापासून दुधीतळ्याकडे जाताना आपणास एक वास्तू लागते. हल्ली त्या ठिकाणचे पडलेले बांधकाम दुरुस्त केले आहे. त्या ठिकाणी सदर होती. जिचा वापर राजेरजवाड्यांच्या बैठका व चर्चा करण्यासाठी केला जात असे.
शिव मंदिर :
सदरेला लागूनच एक मंदिर आहे. मंदिराच्या सुरवातीस छत्रपती शिवराय यांचा एक पूतळा असून हा पुतळा भालजी पेंढारकर यांनी इसवी सन १९४५ साली बसवला आहे.
त्यामागे गाभारा आहे. गाभाऱ्यात शिव पिंड आहे. ही वास्तू करवीर संस्थानाने दुरुस्त केली आहे. तिचा जीर्णोद्धार केला आहे.
अंबामाता मंदिर/ भवानी मंदिर :
शिवमंदिर समोरील बाजूस काही भग्न अवशेष दिसतात त्या ठिकाणी पडलेल्या खिंडारात आपल्याला अंबा माता मंदिर पाहायला मिळते. भवानी देवी म्हणजेच अंबामाता , शस्त्र सज्ज अशी देवीची मूर्ती आहे.
दुधी तळे :
शिवमंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर आपणास एक विशाल पाण्याचे तळे लागते. भुदरगड किल्यावर असणारा सर्वात मोठा पाण्याचा साठा म्हणजे दुधी तळे होय.
याच्या पाण्याचा रंग पांढरा दिसतो म्हणून यास दुधीतळे म्हणतात. या पाण्याचा वापर गडावर शेती करण्यासाठी केला जातो.
भैरवी मंदिर :
तळ्याकाठी एक देवीचे मंदिर देखील आहे. ते हेमाडपंथी बांधणीचे आहे.
महादेव मंदिर :
दुधी तळ्याच्या काठावर पलीकडील बाजूस आपल्याला एक प्राचीन महादेव मंदिर पाहायला मिळते. याची बांधणी हेमाडपंथी धाटणीची आहे. एका दगडाच्या खोबणीत दुसरा बस वून याची बांधणी केली आहे.
जखुबाई मंदिर :
दुधी तळ्यापासून एक वाट जकिन पेठ या गावाकडे जाते. त्या वाटेस लागूनच थोडे अंतर पुढे गेल्यावर म्हातारीच्या कामताच्या दिशेने थोडे चालत गेल्यावर तिथे जमिनीत खालील बाजूस एका छोट्या भुयारात पायऱ्या उतरून गेल्यावर जखुबाई देवी मंदिर आतमध्ये आहे. एका बाजूने आत व दुसऱ्या बाजूने बाहेर जाता येते.
पोखर धोंडी पूर्व दरवाजा अवशेष :
जखूबाई मंदिराकडे जाताना एक पाटी लागते. तेथून पुढे गेल्यावर तटाची पडलेली बाजू दिसते. त्या बाजूला चालत गेल्यावर आपणास एक १०० चौरस फूट शिळेत कोरलेली खोली दिसते. तिला पोखर धोंडी असे म्हणतात. मोठ्या खडकात ती खोदली आहे.
तिथेच जवळपास आपल्याला पूर्व दरवाजाच्या चौकटीचे अवशेष पाहायला मिळतात. ब्रिटिश काळात येथील गडकर्यानी बंड केले. तेव्हा पूर्व दरवाजा बाजूने हल्ला करून तोफेचा मारा करून या बाजूची तटबंदी व दरवाजा उध्वस्त केला होता. त्याचे अवशेष पाहायला मिळतात.
लहान तळे :
दुधी तळ्याच्या समोरील बाजूस काही मंदिरे दिसतात तसेच काही वाड्यांचे अवशेष देखील पाहायला मिळतात. तेथून पुढे चालत गेल्यास आपणास काही अंतरावर एक छोटे तळे देखील पाहायला मिळते. त्या तळ्याच्या काठावर छोटी छोटी त्या काळातील थडगी पाहायला मिळतात. तसेच लहान लहान शिवपिंडी देखील पाहायला मिळतात. तसेच समाध्या सुध्दा आहेत. हे तळे खूप खोल आहे.
• भुदरगड किल्याविषयी ऐतिहासिक घडामोडी :
• भुदरगड हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला. त्याच्या नावावरून या किल्ल्यास भुदरगड हे नाव दिले गेले.
• त्यानंतर हा किल्ला बहामनी सुलतानाच्या ताब्यात होता.
• त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता.
• इसवी सन १६६७ साली हा किल्ला छत्रपती शिवराय यांनी स्वराज्यात आणला.
• पण थोड्याच काळात हा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला.
• इसवी सन १६७२ साली परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. या लढाईत मोघल सरदार मरण पावला. त्यावेळी सापडलेल्या मोघलांच्या निशाणी भैरवनाथ मंदिरास मराठ्यांनी दान दिल्या. त्या आजही तिथे पाहायला मिळतात. तसेच शिवरायांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली. व या ठिकाणी प्रबळ लष्करी ठाणे बनवले.
- छत्र पती शिवराय यांचे येथे जास्त वास्तव्य जरी नसले. तरी स्वराज्याचा विजयमार्ग या किल्याच्या पायथ्याला असणाऱ्या वेदगंगा नदी काठाने जातो. दक्षिणेतून परत महाराष्ट्रात येताना छत्रपती राजाराम महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते.
• इसवी सनाच्या १८ व्या शतकात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी शिबंदीतील पहारेकरी फितवून हा किल्ला ताब्यात घेतला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता.
• त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आला.
• इसवी सन १८४४ साली करवीर संस्थानातील ब्रिटिश सरकारच्या ताब्यातील किल्यावर येथील गडकऱ्यांनी बंड केले. व ते ताब्यात घेतले. यामध्ये भुदरगड व समानगड किल्ल्यावरील गडकर्यांचा देखील समावेश होता.
• १३ ऑक्टोंबर १८४४ रोजी ब्रिटिश जनरल डोलोमोटी याने लष्करी कारवाई केली. त्याने तोफांचा मारा करून बरीचशी तटबंदी पाडली. तसेच पूर्व बाजूच्या दरवाजाचे नुकसान केले. त्यामागे पुढे कधी गडावर बंड होऊ नये असा उद्देश होता. व बंड मोडून काढले.
• इसवी सन १९४५ साली या किल्यावर शिवमंदिरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना भालजी पेंढारकर यांनी केली.
• इसवी सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• सद्या हा किल्ला महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग पुणे यांच्या अखत्यारीत आहे. गडाची व येथील वास्तूंची बरीचशी दुरुस्ती केली गेली आहे.
अशी आहे भुदरगड किल्याची माहिती व इतिहास.
Bhudargad Fort information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l