घारापुरी लेणी / एलिफंटा केव्हज
Gharapuri leni / Elephanta caves mahiti Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील मुंबई या राजधानीच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या घारापुरी बेटावर असणारी ही लेणी प्राचीन भारतीय संस्कृतीची माहिती व ओळख करून देतात.
• घारापुरी लेणी पाहायला जायचे कसे?
• महाराष्ट्र राज्यातील मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्थानक आहे. जे समुद्र , रस्ते व हवाई मार्गे आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडले गेले आहे.
• मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदर गेट वे ऑफ इंडिया येथून साधारण वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारापुरी बेटावर लेणी समूह आहे. येथे गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रातून बोटीने आपण घारापुरी या बेटावर जाऊ शकतो.
• हे ठिकाण सागरी मार्गे अनेक भारतीय बंदरांनना जोडले गेले आहे.
• मुंबई - गेट वे ऑफ इंडिया येथून पुढे – समुद्री बोटीने – घारापुरी बेट - लेणी समुहास पाहायला जाता येते.
• हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे.
• कर्नाटक राज्यातील ऐहोळ या ठिकाणी असलेल्या शिलालेखात घारापुरी या बेटाचा उल्लेख आहे. ‘पश्चिम सागराची लक्ष्मी’ असा उल्लेख आढळतो. यावरून प्राचीन व्यापारी स्थान हे ठिकाण असल्याचे दिसून येते.
• घारापुरी हे नाव कसे पडले?स्थानिक लोकांच्या विचारधारेतून असे समजते की घारापुरी हे या ठिकाणचे नाव हे गिरीपुरी किंवा अग्रहापुरी या ठिकाणाच्या जुन्या नावावरून या ठिकाणास घारापुरी हे नाव मिळाले असावे.
• जेव्हा प्रथम इंग्रज या बेटावर आले त्यावेळी त्यांनी प्रथम येथील विशाल हत्ती शिल्पाकृती केलेले पाषाण पाहिले, त्यावरून या ठिकाणास ‘एलिफंटा केव्हज’ (हत्ती लेणी) अशा नावाने संबोधले.
• घारापुरी लेणी समूह ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे :
महाराष्ट्र राज्याची तसेच भारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या शहरात आल्यावर आपण खाजगी वाहन अथवा बसने गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी प्रथम जायला हवे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय बंदर असून या ठिकाणी विस्तृत गेट उभारलेले आहे.
• हॉटेल ताज :
गेट व ऑफ इंडिया परिसरात आपणास एक आलिशान हॉटेल पाहायला मिळते. ते ताज हॉटेल भारताचे वैभव आहे.
ते पाहून आपण गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्री धक्क्यावर येऊन पोहोचतो. येथील समुद्री प्रवाशी लॉन्चचे तिकीट काढून आपण सागर सफर करत घारापुरी बेटाकडे जाऊ शकतो. घारापुरीला जाताना विशेषत सोमवार सोडून इतर वारी जाणे चांगले. कारण या दिवशी हे ठिकाण सार्वजनिक भेटीसाठी बंद ठेवले जाते.’
• धक्का व मिनी रेल्वे :
ज्यावेळी आपण समुद्री सफर करत घारापुरी या बेटावर येऊन पोहोचतो. त्यावेळी या बंदरावर उतरल्यावर चालत वरील भागात येतो. त्यावेळी येथे असणारा तिकीट कर भरून लहान रेल्वे स्टेशन जवळ येतो. भारतीय पर्यटन खात्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ही यंत्रणा उभारली असुन या मिनी म्हणजेच लहान रेल्वेतून आपण लेणी समूह असलेल्या वरील भागाकडे जाऊ शकतो.
या ठिकाणी जवळपास परिसरात तीन लहान लहान गावे वसवली गेली आहेत. त्यांची नावे १)शेत बंदर,२) राज बंदर,३) मोर बंदर आहेत.
• पायरी मार्ग:
या ठिकाणी आपणास लेणी समूहाकडून जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या शंभर एक पायऱ्या पाहायला मिळतात या पायऱ्या किंवा मिनी ट्रेनने आपण हा लेणी समूह पाहायला जाऊ शकतो. या वाटेने जाताना आपणास वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू असणारी दुकाने, खाद्य पदार्थाचे स्टॉल, उपहारगृहे पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्या भोजनाची सोय होऊ शकते.
• लेण्यांकडे :
पायरी मार्गावर शंभर एक पायऱ्या आहेत. या वाटेने आपण पुढे लेणी मार्गाजवळ येतो. या ठिकाणी आपणास तीन रस्ते भेटतात. यातील थेट समोर जाणारा रस्ता लेण्याकडे जातो. तर डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण गार्डन व तलावाकडे जाऊ शकतो. तर उजव्या बाजूच्या रस्त्याने तोफ ठेवलेल्या ठिकाणी आपण जाऊ शकतो.
समोरील मार्गाने आपण लेणी समूहाकडे जाऊ शकतो.
• लेणे क्रमांक १ :
हे लेणे उत्तराभिमुख आहे. याच्या आतील बाजुस तीन दालने आहेत. हे लेणे सर्वात शेवटी कोरले गेले आहे. मध्यभागी मुख्य सभामंडप असून या मंडपाच्या पुर्व, पश्चिम व उत्तर बाजूस निरनिराळी लेणी पाहायला मिळतात.
• पूर्वाभिमुख लेणे :
हे एक सुरेख मंदिर आहे. बाहेरील बाजूस भव्य पटांगण आहे. या पटांगणात एक सुरेख रंगशिळा आहे. आत गर्भगृह आहे. त्याच्या बाहेरील बाजूस असणारी चौकट व आतील गर्भगृहात शिवपिंडी आहे. बाहेरील बाजूस सुंदर सिंह प्रतिमा आहे. तसेच प्रवेश मार्गाच्या बाजूला भव्य शिल्पाकृती असून मुख्य गर्भगृहाची चौकट ही सुशोभित केली आहे. शेजारील बाजूस सुरेख खांब युक्त देवड्या खोदलेल्या पाहायला मिळतात. पूर्वेकडील यक्ष प्रतिनिधी शिल्पाकृतीची नासधूस झाली असून त्या मानाने पश्चिम बाजूस असलेल्या यक्ष प्रतिनिधीची मुर्ती ही बरीच सुस्थितीत आहे, चतुर्भुज असणार्या या मूर्तीच्या तिच्या पायाकडील भाग खंडित झाला आहे.
• पश्चिम बाजूची ओवरी अष्ट मात्रुका शिल्पाकृती : पश्चिम बाजूने आतील बाजूच्या ओवरीत गेल्यावर आपणास अष्ट मात्रुका शिल्पाकृती पाहायला मिळते. काही धर्मद्वेशी परकीय आक्रमणे आल्यावर येथील शिल्पाकृती भंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. येथील बऱ्याच शिल्पाकृती भंग पावलेल्या आहेत. इतर ठिकाणी मातृका देवता बसलेल्या असतात पण या ठिकाणी त्या उभ्या असलेल्या दिसून येतात. तसेच या ठिकाणी कार्तिकेय व गणेश या शिव कुटुंबातील देवता देखील शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. यामध्ये गणेश मुर्ती अर्ध पद्मासनात आहे. या लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पुर्व बाजूस असून या ठिकाणी येणारे पर्यटक उत्तर बाजूच्या लेणी पाहत अखेरीस या लेण्यात पोहोचतात.
•• उपलेणे :
• मुख्य दालनाच्या पश्चिम बाजूस उपलेणे पाहायला मिळते. या ठिकाणी एक पाण्याचे टाके खोदलेले पाहायला मिळते. येथील गर्भगृहात शिवलिंग असून बाहेरील बाजुस ओवरीच्या द्वारपाल उभे आहेत. ते काही भग्न अवस्थेत आहेत.
• उत्तर भिंत योगीराज शिव शिल्पाकृती :
उत्तर बाजूस असलेल्या शिल्पामध्ये योग साधनेत बसलेली पद्मासनात असलेली शिवमूर्ती असून त्याच्या बाजूला गरुड या वाहनावर आरूढ झालेले विष्णू देवता तसेच हंस या पक्षावर स्वार झालेले ब्रह्मदेव कोरलेले आहेत. तसेच भुजंग व रुद्राक्षधारण केलेली ध्यानमग्न शिवमूर्ती पाहून मनाला आत्मिक शांती मिळते. त्याच्या शेजारी विद्याधर, गंधर्व व इतर स्वर्गीय अप्सरा कोरलेल्या आहेत.
• श्री रावणानुग्रह मूर्ती :
पुष्पक विमानाने भ्रमण करताना रावणास कैलास पर्वत पार करता येईना. त्यावेळी कैलास पर्वत पाहण्यासाठी रावण निघाला. त्यावेळी रावणास तेथील शिवगण द्वारपाल यांनी आडवले. त्यावेळी रागाच्या भरात रावणाने संपूर्ण कैलास उचलून नेण्यासाठी प्रयत्न चालवला. त्यावेळी शिवगण घाबरले व शिवशंकरांना शरण गेले. तेव्हा शिवशंकराने आपल्या डाव्या पायाचा अंगठा खाली दाबून भर देताच. रावण त्या भारणे पर्वताखाली दाबला गेला. व शिवशक्तीचा महिमा लक्षात येऊन त्याने शिवस्तुती केली. शिव शंकर प्रसन्न झाले व त्यांनी रावणाची प्रसन्न होऊन मुक्ती केली. व त्यास आशीर्वाद दिला. तसेच त्यास वीणा व चंद्रहार खड्ग दिला व यातूनच शिवतांडव स्तोत्र निर्माण झाले. हा प्रसंग कोरलेला रावण कैलास पर्वत उचलत आहे. व शिव शंकराने आपल्या पायाने तो दाबलेला दाखवलेला आहे. ते रावणानुग्रह शिल्प या ठिकाणी कोरलेले दिसून येते.तसेच देवी देवता, गंधर्व, अप्सरा शिल्पाकृती केलेल्या दिसून येतात.
• शिव पार्वती द्युत क्रीडा शिल्प :
या दालनात असलेले पुढील शिल्प हे भगवान शिव व पार्वती यांच्या द्यूत खेळाचे आहे. यामध्ये पार्वती ही शिव शंकरास हरवते. व शिव शंकर फसवून तू जिंकलीस असे सांगतात. त्यावेळी पार्वती रुसून जात आहे. व शिव शंकर तिचा रुसवा काढत आहेत. असे शिल्प या ठिकाणी आहे.
• अर्धनारिश्र्वर शिल्प :
दालन वास्तूच्या दक्षिण बाजूस अर्धंनारिश्र्वराचे शिल्प आहे. पाच मीटर उंच असणारे हे शिल्प उजव्या बाजूस अर्धा भाग शिव तर डावा भाग पार्वती देवीचा आहे. उजव्या बाजूस शिव जटा मुकुट असून त्यावर चंद्रकोर आहे.शिवाच्या हातात सर्प, आहे. डाव्या बाजूला असणाऱ्या पार्वती देवीच्या कपाळी किरीट असून घनदाट केस रचना आहेत. निरनिराळे आभूषणे घातलेल्या देवीच्या हातात आरसा आहे. संपूर्ण एकरूप अशी रचना या शिल्पात दिसून येते.
• सदाशिव मूर्ती :
घारापुरी म्हणजेच एलिफंटा केव्हज म्हणून ओळख असलेली शिल्पाकृती म्हणजेच सदाशिव मूर्ती होय. एक शरीर व तीन मुख असणारी शिल्प रचना, पूर्वी या शिल्पात ब्रह्मा विष्णू महेश असे संबोधले जात होते. पण नंतर गोपीनाथ राव या अभ्यासकांनी ही संपूर्ण शिव प्रतिमा असल्याचे सिद्ध केले. या मूर्तीचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की उजव्या बाजूच्या मुखावर उग्र अघोरी भाव, मध्यभागीं सत्वपुरुष तर डावीकडील संहारक भाव दिसून येतात. यावरून ही शिल्पमुर्ती ही श्री शिव शंकराची संहारक, सृजनात्मक, व समन्वयक गुणांची निदर्शक आहे.
• गंगावतरण शिल्प :
त्रिमुखी शिव पाहिल्यानंतर पुढील शिल्प हे गंगावतरणाचे आहे. सगर राजा व त्याचे ६०,००० पुत्र कपिल मुनींच्या शापाने त्यांचे दगडात रूपांतरण झाले. त्यांचा उद्धार गंगेच्या पाण्याने होईल असे सांगितले. त्यासाठी अनेक राजांनी प्रयत्न केला. शेवटी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली. ती अवतरताना पृथ्वी वरील जीवांना त्रास होऊ नये म्हणून तिला प्रथम शिव शंकराने आपल्या शिरी धारण केली व नंतर पृथ्वीवर सोडली. त्याची शिल्पाकृती रचना येथे काढलेली आपणास दिसते.
• शिव पार्वती विवाह / कल्याण सुंदरमुर्ती पट :
हिमालय राजा व त्याची पत्नी आपल्या कन्येचा म्हणजेच देवी पार्वतीचा विवाह शिव शंकरासी लावून देत आहेत. असा प्रसंग कोरलेला पाहायला मिळतो. या लग्नात ब्रह्मदेव पौरोहित्य करत असलेले दिसतात. कन्यादानाचे महत्त्व येथे दिसून येते.
• अंधकासुर वध शिल्प :
पुढे आपणास आणखी एक शिल्प पाहता येते. अंधकासुराचा नाश , ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने अंधकासुर संपूर्ण जगात अक्रांत माजवू लागला त्यावेळी शिव शंकराने त्यास मारले तो प्रसंग येथे कोरलेला आहे. नील नावाचा दैत्य जेव्हा शिव शंकरावर चालून आला. त्यावेळी त्याने हत्तीचे रूप घेतले. त्यास विरभद्राने मारून त्याचे कातडे शिवास काढून दिले. ते पांघरून शिव शंकराने अंधकासुरास मारले. त्यास उचलुन घेतलेले व त्याचे रक्त खाली पडू नये म्हणून योगेश्वरी मातृका खाली गळणारे रक्त प्राशन करत आहे. व शिव अंधकासुर शव घेवून नाचत आहे. ते दृश्य शिल्पाकृत केलेले आहे.
• नटराज शिल्प :
लेण्याच्या उत्तर द्वारापाशी असलेले साडे तीन मीटर उंच असलेले नटराज शिल्प कोरलेले दिसून येते. वादन करत नृत्य करणारा शिवशंकर येथे शिल्पित केलेला दिसून येतो. या लेण्यांमध्ये सृजन व संहार करणारा शिव शंकर आपणास पाहायला मिळतो. सर्व बाजूने शिल्प मध्यभागी खांब दरवाजे असणारी व त्यामधे शिवलिंग अशी रचना तसेच अनेक यक्ष, यक्षिणी, गंधर्व, किन्नर कोरलेले हे एक शिव मंदिरच आहे. साकारातून निराकाराकडे नेणारे हे एक ज्योतिर्लिंगच भासते.
• लेणी क्रमांक २ :
लेणी क्रमांक दुसरे हे विस्तृत दालन असलेले व खांब असलेले लेणे आहे. येथे एक पाण्याचे टाके असून हे कारागिरांना राहण्यासाठी खोदले गेले असावे.
• लेणे क्रमांक ३ :
पूर्वाभिमुख असलेले हे लेणे असून यामध्ये तिन दालने आहेत. सहा स्तंभ व्हरांड्यात असून ते भग्न झाले होते यांची नविन निर्मिती व त्यांचे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाने केलेले आहे. मध्यभागीं गर्भगृह आहे. व तिन विभाग असलेले व दरवाजे असणारे दोन्ही बाजूला द्वारपाल उभा असलेले हे कोरीव लेणे आहे. सदर लेणे हे राष्ट्रकूट राजवटीच्या काळात तयार केले असावे. कारण यामध्ये असणारी स्थापत्य शैली थोडी वेगळी जाणवते.
• लेणे क्रमांक ४ :
सदर लेणे हे पुर्व दिशेस तोंड करून आहे. दर्शनी बाजूस चार कक्ष आहेत. डावी व उजवीकडे एक कक्ष असून तीन बाजूस दरवाजे आहेत. शैव, द्वारपाल, गण, व शिवलिंग असलेले हे लेणे पाहण्यासारखे आहे. याची स्थापत्य शैली ही गुप्त काळातील असल्याचे वाटते. इसवी सन सहाव्या ते सातव्या शतका दरम्यान यांची निर्मिती झाली असावी.
• लेणे क्रमांक ५ :
शेवटी बनवले गेलेले हे लेणे क्रमांक ५ आहे. हे अपूर्ण लेणे आहे. बराचसा भाग ढासळलेला असून स्तंभ अपूर्ण आहेत. या ठिकाणी एक शिवलिंग आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे हे शिवलिंग पाण्यात बुडते.
• लेणी वाटेवर तीन फाटे फुटतात एका डावीकडून वाटेने बाग व तेथील तलावाजवळ पोहोचता येते.
• उजव्या बाजूच्या वाटेने आपण चालत गेल्यावर डोंगर माथ्याला जाऊन पोहोचतो. या ठिकाणी काही रहिवासी वास्तूचे अवशेष पहायला मिळतात. तसेच हा भाग अत्यंत उंच आहे. या ठिकाणी आपणास एक तोफ पाहायला मिळते. तिची रचना पहिली की ती आधुनिक कालीन वाटते.
• या परिसरात काही बुध्द लेण्याही पाहायला मिळतात
• अशाप्रकारे घारापुरी येथे पाहण्यासारखी ही लेणी आहेत.
• घारापुरी लेणी / एलिफंटा केव्हज विषयी ऐतीहासिक माहिती :
• घारापुरी येथे एकूण सात लेण्या आहेत. त्यातील पाच शैव हिंदू लेण्या असून राहिलेल्या दोन बौद्ध धर्मीय लेण्या आहेत.
• या लेण्यांची रचना इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते इसवी सनाच्या तेराव्या शतका पर्यंत यांची निर्मिती झाल्याचे दिसून येते.
• हिंदू धर्मीय राजवटी गुप्त, सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार, या राजवटींच्या काळात यांची उभारणी झाली.
• सातवाहन काळात हे ठिकाण व्यापारासाठी प्रसिद्ध होते.
• पुढील काळात येथे शिलाहार राजांची सत्ता होती.
• उत्तर शिलाहार राजा शेवटचा सोमेश्वर याचा पराभव करून यादवांनी हा प्रदेश यादव राज्यास जोडला.
• पुढे परकीय आक्रमण काळात येथील वास्तूंची बरीचशी नासधूस झाल्याचे दिसून येते.
• पुढे हा प्रदेश इसवी सन १५३४ साली पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतला.
• पुढे मराठा राजवटीच्या काळात हा प्रदेश स्वराज्यात सामील झाला.
• इसवी सन १७७४ साली हा प्रदेश इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली आला.
• १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रदेश स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• इसवी सन १९८७ साली युनेस्को या संस्थेने जागतिक ऐतीहासिक वास्तू मध्ये या घारापुरी लेणी म्हणजेच एलीफंटा गुहांचा समावेश केला.
• अशी आहे घारापुरी लेणी / एलिफंटा केव्हजची माहिती.
Gharapuri leni / Elephanta caves mahiti Marathi